Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

निवड रद्द झालेल्या उमेदवाराचा अर्ज अवैध
इचलकरंजी, १३ जुलै / वार्ताहर

 

जातीची वैधता तीन महिन्यांत सिध्द केली नाही म्हणून ज्यांची पालिकेवरील निवड जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली होती त्या रश्मी जितेंद्रसिंग हजारे यांनी त्याच मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पूर्वीच्या निर्णयाने त्यांना सहा वर्षे निवडणुकीस अपात्र ठरविण्यात आल्यामुळे त्याचाच आधार घेऊन श्रीमती हजारे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.
२००६ सालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ मधून रश्मी हजारे यांनी काँग्रेसच्या तिकिटावरून निवडणूक लढवून तीजिंकली होती. मात्र जातीची वैधता तीन महिन्यांत सिध्द केली नाही म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हजारे यांची निवड रद्द करून कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, असे सूचित केले होते. त्यानंतरही हजारे यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले होते.
न्यायालयातील प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर प्रभाग क्रमांक १९ मध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
ज्या मतदारसंघातून आपली निवड अवैध ठरवली त्याच मतदारसंघातून पुन्हा श्रीमती हजारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तथापि उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याचा निर्णय प्रश्नंताधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिला. यापूर्वी श्रीमती हजारे यांच्या जातीय दाखल्याबद्दलच्या निर्णयाची नोंद राजपत्रात झालेली नाही. त्यामुळे त्या नव्याने निवडणूक लढवू शकतात असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. पण विजयसिंह देशमुख यांनी हा युक्तिवाद मान्य केला नाही.