Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘फेरीवाल्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करा’
कोल्हापूर, १३ जुलै / प्रतिनिधी

 

राष्ट्रीय धोरणानुसार फेरीवाल्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, शहरात महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्तेविकास प्रकल्पाअंतर्गत ज्या ८ रस्त्यांचा समावेश आहे त्या रस्त्यांशेजारी असणाऱ्या फेरीवाल्यांचे तिथे आसपास योग्य पुनर्वसन करण्यात यावे, असे ठराव कोल्हापूर फेरीवाले युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड.गोविंदराव पानसरे हे होते.फेरीवाल्यांकरिता कायदा होऊन त्याची अंमलबजावणी त्वरित होण्यासाठी आगामी काळात फेरीवाल्यांनी संघर्षासाठी तयार रहावे, असे आवाहन अ‍ॅड.गोविंदराव पानसरे यांनी यावेळी बोलताना केले. महाराष्ट्र सरकारने फेरीवाल्यांसाठी कायदा करावा, परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त ठराव झाला असून त्याला मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी मिळण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी फेरीवाल्यांचे नेते दिलीप पवार म्हणाले की, फेरीवाल्यांनी आपल्या प्रश्नांसाठी आलेली मरगळ झटकून कामाला लागावे. यावेळी घरेलू मोलकरीण संघटनेच्या राज्याध्यक्षा सुशीला यादव, भारतीय महिला फेडरेशनच्या सचिव उमा पानसरे, कोल्हापूर फेरीवाले युनियनचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांचे भाषण झाले. सुनील मालप यांनी प्रश्नस्ताविक केले. अजय एकबोटे यांनी आभार मानले. यावेळी फेरीवाले युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब प्रभावळे, इम्तियाज पठाण, सुमन घोसे, विठ्ठल येडगे यांच्यासह सभासद उपस्थित होते.