Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘उजनीचे हक्काचे पाणी मराठवाडय़ाला देणार नाही’
सोलापूर, १३ जुलै/प्रतिनिधी

 

कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे पाणी उजनी धरणा आल्याशिवाय उजनीतून एक थेंबही पाणी मराठवाडय़ाला जाऊ देणार नाही. त्यासाठी आपण आत्मदहन करण्याची वेळ आली तरी आपण मागे हटणार नसल्याचा निर्धार सोलापूर जि.प.चे माजी अध्यक्ष नारायण खंडागळे यांनी केला. श्री. खंडागळे पुढे म्हणाले की, उजनी धरणाचे हक्काचे पाणी सोलापूर जिल्ह्य़ातील तालुक्यांना अद्यापही मिळालेले नाही. असे असताना उजनीचे पाणी पळविण्याचा दावा मराठवाडय़ातील सर्वपक्षीय नेतेमंडळी करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कृष्णेचे पाणी उजनी धरणात आल्याशिवाय उजनीचे पाणी मराठवाडय़ास नेणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व पक्षांचे नेते पाणी प्रश्नी मूग गिळून गप्प आहेत, याचेच आपणास दु:ख आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा सव्‍‌र्हेही अद्याप झाला नाही; परंतु उजनीचे पाणी मराठवाडय़ाकडे वळविण्याच्या योजनेच्या सव्‍‌र्हेक्षणाचे काम जोरात सुरू असून, या कामांच्या निविदा विधानसभा आचारसंहिता लागण्याअगोदर निघण्याची शक्यता असून, हे काम सुरू झाल्यास सोलापूर जिल्हा भकास होण्यास वेळ लागणार नाही. उजनीच्या पाण्यावरील शेती उद्ध्वस्त होणार आहे. मराठवाडय़ास पाणी देण्यास आमचा विरोध नाही, मात्र कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे पाणी उजनीत आल्याशिवाय आम्ही उजनीतील पाणी देऊ देणार नसून प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला