Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

माढा क्रॉसिंग भागातील दुरुस्तीसाठी नऊ कोटीची तरतूद
सोलापूर, १३ जुलै/प्रतिनिधी

 

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने गळतीग्रस्त अडीच किलोमीटरची पाईपलाईन बदलण्यासाठी ९ कोटी ४२ लाख रुपये मंजूर केले आहेत. यामुळे बार्शी-कुर्डूवाडी संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या माढा क्रॉसिंग भागात सतत होणाऱ्या गळतीमुळे बार्शीकरांवर येणाऱ्या कृत्रिम पाणीटंचाईच्या संकटाला कायमस्वरुपी पूर्णविराम मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगेश सोपल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोपल या वेळी म्हणाले की, बार्शी-कुर्डूवाडी संयुक्त पाणीपुरवठा अर्थात उजनी योजना ७ एप्रिल १९९७ पासून कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत कुर्डूवाडी ते बार्शी दरम्यान रिधोरे, माढा क्रॉसिंगनजीक ७०० मि.मी. व्यासाच्या अडीच कि.मी. लांबीच्या पीएमसी गुरुत्ववाहिनीमधून मोठय़ा प्रमाणात गळती होत असल्याने बार्शीकरांवर कृत्रिम पाणीटंचाईचे संकट कायम असायचे.
माजी मंत्री सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बार्शी नगरपरिषदेवर सत्ता आल्यापासून सोपल यांनी सातत्याने जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा करुन अडीच किलोमीटर जलवाहिनी बदलण्यासाठी १०० टक्के शासन अनुदानातून हे काम हाती घेण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणाच्या वतीने विहित प्रस्ताव सादर करण्यात आला होता. २५ जून २००९ च्या शासन निर्णयान्वये या कामासाठी ९ कोटी ४२ लाख ५८ हजार ३०० रुपयांना मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्रात राज्य शासनाच्या वतीने एकमेव बार्शीसाठी १०० टक्के शासकीय अनुदानाची अशा प्रकारची योजना मंजूर झालेली आहे.
या कामात कुर्डूवाडी-बार्शी दरम्यानची पीएमसी पाईपलाईन बदलून त्याऐवजी एमएस पाईपलाईन टाकण्यासाठी ४ कोटी ७५ लाख रुपये, कंदर (ता.करमाळा) येथील पंपिंग मशिनरी बदलण्यासाठी ३ कोटी ७४ लाख रुपये आणि कुर्डूवाडी पंपमध्ये सेंट्रीफ्युगल पद्धतीचे बुस्टर पंप बसविण्यासाठी ६३ लाख ४९ हजार रुपये, असे ९ कोटी ४२ लाख ५८ हजार ३०० रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच याच शासन निर्णयान्वये सध्या महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणकडे देखभाल दुरुस्तीसाठी असणारी ही योजना बार्शी नगरपरिषदेकडे हे काम पूर्ण झाल्यानंतर हस्तांतरित करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे बार्शी नगरपरिषदेची वार्षिक सुमारे २५ लाख रुपयांची बचत होणार आहे.
मुख्य अभियंता म.जी.प्रश्न.कडून सदर अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरीही नुकतीच मिळाली असून, म.जी.प्रश्न. सोलापूरकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
सर्वसाधारणपणे पाच महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होईल. यामुळे अलीकडच्या काळात निर्माण झालेले कृत्रिम पाणीटंचाई आणि बार्शी हे समीकरण बंद होईल, असेही सोपल म्हणाले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बार्शी नगरपरिषदेच्या वतीने जलसंपदामंत्री अजित पवार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांचे बार्शीकरांच्या वतीने आभार मानण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात येईल, असे उपनगराध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी या वेळी सांगितले.