Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

प्रथमच राखीव झाल्याने माळशिरसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
माळशिरस, १३ जुलै/वार्ताहर

 

माळशिरस मतदारसंघ साठ वर्षानी प्रथमच राखीव झाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे, तर लवकरच निवडणुका असल्याच्या पाश्र्वभूमीवर राजकीय हालचालींना तालुक्यात वेग आला आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वी या तालुक्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघास जोडलेली खुडूस, निमगाव, चांदापुरी, पठाणवस्ती, तरंगफळ, गारवाड, पिलीव, फळवणी, काळमवाडी, तांदूळवाडी, मळोली, कोळेगाव, शिंगोर्णी, बचेरी अशी चौदा गावे पुन्हा या मतदारसंघास जोडली आहेत.
या तालुक्यातील महाळुंग मंडळातील महाळुंग, वाघोली, वाफेगाव, बाभूळगाव, नेवरे, उंबरे (वे), कोंढारपट्टा, जांबूड, बोरगाव, श्रीपूर, लवंग, तांबवे, संगम, गणेशगाव अशी गावे माढा मतदारसंघास जोडली आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून, या प्रवर्गातील मोठय़ा संख्येने असणारा समाज तालुक्यातील श्रीपूर, बोरगाव, अकलूज, माळशिरस, नातेपुते या गावातून आहे. तालुक्यात आरपीआय (आठवले गट), दलित स्वयंसेवक संघ, दलित महासंघ, दलित कोब्रा, भीमशक्ती, अखिल भारतीय होलार समाज संघटना आदी विविध संघटनांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे तालुक्यात दलित चळवळ कार्यकर्त्यांनी तेवत ठेवली आहे. त्या कार्यकर्त्यांना आता प्रथमच आमदार होण्याची संधी आली आहे.
चळवळीत हयात घालविलेले कार्यकर्ते असताना मतदारसंघ राखीव झाल्याचे समजताच या प्रवर्गातील अनेक धनदांडगे तालुक्यात अवतरताना दिसत आहेत.
ज्यांना तालुक्यातीलच काय, पण गावातीलही लोकांच्या ओळखी मोडलेले अनेक मोहरे आता समाजातीलच काय पण इतरांच्याही बहुतेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.
चळवळीतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कार्यकर्ते डावलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात १९५७ पासून मोहिते पाटील घराण्याचे प्रश्नबल्य असल्याने हे धनदांडगे त्यांच्या मागेपुढे वावरताना दिसत आहेत.
मात्र दलितांच्या रेशन कार्डसारख्या प्रश्नापासून त्यांच्यासाठी झटणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून अशा धनदांडग्यांना उमेदवारी दिल्यास ते श्रेष्ठींनाही त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र आहे.