Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘सत्तेवर न आल्यास विकासासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करीन’
सातारा, १३ जुलै/प्रतिनिधी

 

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजाच्या उत्थानासाठी काम केले आहे. बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. जनता निश्चितपणे कौल देईलच पण नाही दिलाच तर रस्त्यावर उतरून सामान्यजनांच्या हिताच्या विकासाच्या प्रश्नावर पूर्वीसारखा संघर्ष करेन, असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी जाहीर केले.
सातारा येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनच्या कामाचा प्रश्नरंभ चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते व कोनशिला अनावरण खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित केलेल्या शानदार सोहळ्यात ते बोलत होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील, विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे समाजकल्याणचे प्रभारी संचालक शशिकांत सावरकर, विभागीय समाजकल्याण अधिकारी उमाकांत कांबळे, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील, नगराध्यक्षा वैशाली महामुनी, भीमशक्तीचे बाळासाहेब शिरसाट, पार्थ पोळके, विशेष समाजकल्याण अधिकारी अशोक कांबळे, सम्राटचे संपादक बबन कांबळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
चंद्रकांत हांडोरे म्हणाले की, फुले, आंबेडकर पँथर चळवळीत पंचवीस-तीस वष्रे आपण काम केले आहे.सामाजिक न्यायमंत्री म्हणून हे खाते जनताभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे.
शेवटचा माणूस सक्षम झाला पाहिजे. सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेल्या तीनशे योजना आहेत. त्या आमच्या माणसाला माहीतच नाहीत. हे खाते जनताभिमुख व्हावे, सर्व योजना समाजाला कळाव्यात या उद्देशाने खात्यांतर्गतची सर्व कार्यालये व महामंडळे एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्यायभवन प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्नरंभी पुणे विभागीय समाजकल्याण अधिकारी उमाकांत कांबळे यांनी सामाजिक न्यायभवन उभारण्याचा हेतू विषद केला.
बाबासाहेबांचे अतूट नाते : उदयनराजे
उदयनराजे म्हणाले की, सामाजिक न्यायभवन साताऱ्यात उभे राहात असल्याने त्यासाठी ४ कोटी ६५ लाखांचा निधी मिळाला ही आनंदाची बाब आहे. संसदेच्या प्रश्नंगणात उभारण्यात आलेल्या पुतळ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले व यशवंतराव चव्हाण हे पाच पुतळे प्रेरणा देणारे आहेत. त्यांचे विचार जीवनात आत्मसात केले तर देशाला फार मोठा सामाजिक न्याय मिळेल.
बाबासाहेबांचे व आमच्या राजघराण्याचे सातारकरांचे अतुट नाते होते, असे सांगून ते म्हणाले की, थोरले प्रतापसिंह महाराजांनी दूरदृष्टीने सर्वात प्रथम राजवाडय़ात मुलींसाठी शाळा सुरू केली. त्यांच्या कार्याची बरोबरी करता येणार नाही. त्यांनी जगातील सर्व देशांच्या राज्यघटना अभ्यासून भारताची घटना लिहिल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला, उपेक्षितांना न्याय मिळतोय व न्याय काय असतो ते कळतेय.
पियुष सावंत व विजय मांडके यांचा चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष समाजकल्याण अधिकारी अशोक कांबळे यांनी आभार मानले.