Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

लोकसत्ता ‘यशस्वी भव’चे केळघर येथे स्वागत
सातारा, १३ जुलै/प्रतिनिधी

 

दहावी परीक्षेचे टेन्शन संपुष्टात आणणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ मालिकेस मुंबई-पुणे महानगरातील शाळांतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असताना आता खऱ्या अर्थाने त्याची गरज असलेल्या ग्रामीण भागातही त्याचे स्वागत झाले.
मेढा महाबळेश्वर मार्गावरील दुर्गम अशा केळघर घाटातील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यामंदिरात झालेल्या कार्यक्रमात सातारच्या राजमाता सुमित्राराजे सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त सचिन पाटील व राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते ‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ मालिका योजनेतील पहिल्या पन्नास अंकांची भेट शाळेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी आकाश ज्ञानेश्वर जाधव (रा. भोगवली, ता. जावली) व मिताली श्रीकांत सुर्वे (रा. डांगरेघर) यांना प्रश्नतिनिधिक स्वरूपात देण्यात आली. ‘लोकसत्ता’च्या योजनेचे शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांनी जोरदार स्वागत केले. याप्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र गाढवे, इंडियन एक्स्प्रेस ‘लोकसत्ता’चे वितरण व्यवस्थापक दीपक क्षीरसागर, वितरण अधिकारी प्रशांत हिंगमिरे, ‘लोकसत्ता’चे जिल्हा प्रतिनिधी दिनकर िझब्रे, सातारा शहरातील वितरक शशिकांत बनकर, शाळेचे पर्यवेक्षक निवास साळुंखे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाच्या भवितव्याचा जाणीवपूर्वक विचार करून सामाजिक बांधीलकीच्या भावनेने लोकसत्ता ‘यशस्वी भव’ योजनेसाठी प्रश्नयोजकत्व स्वीकारल्याने हा उपक्रम दुर्गम भागात पोहचवण्याचे चांगले काम झाले असल्याचे सुमित्राराजे सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त सचिन पाटील यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
रयतच्या या शाळेत केळघर परिसरातील डोंगरदऱ्यातील रेंगडी (९ कि.मी.), करोशी, गाठवली, कुरळोशी आदी पाच-सहा कि.मी. अंतरावरून मुले शिक्षणासाठी पायी येत असल्याची माहिती पर्यवेक्षक निवास साळुंखे यांनी दिली.
स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र गाढवे यांनी ‘लोकसत्ता’च्या योजनेचे स्वागत करून विद्यार्थी याचा फायदा घेतील, असे सांगून सुमित्राराजे सांस्कृतिक प्रतिष्ठानचे जयेंद्र चव्हाण व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
‘इंडियन एक्स्प्रेस- लोकसत्ता’चे वितरण व्यवस्थापक दीपक क्षीरसागर यांनी यशोगाथा उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, मुंबईतील नामवंत शाळेतील ज्येष्ठ अनुभवी शिक्षक, मुख्याध्यापक यांचे पॅनेल ‘यशस्वी भव’ मालिका चालवत असून, त्याचा अनेक शाळांना निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपयोग होत असल्याने ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. याशिवाय दीडशे रुपये किमतीची स्वतंत्र पुस्तिका मोफत देण्यात येणार आहे. त्यामध्ये अभ्यासाबाबत विशेष मार्गदर्शन तज्ञांद्वारे मिळणार आहे.‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी दिनकर झिंब्रे यांनी ‘लोकसत्ता’च्या वैभवशाली परंपरेची माहिती दिली. उपशिक्षक अनिल शेटे यांनी आभार मानले. पत्रकार संजय दळवी वितरक संदीप गाढवे यावेळी उपस्थित होते.