Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सांगली स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ११ जणांची चमकदार कामगिरी
सांगली, १३ जुलै/प्रतिनिधी

 

सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंनी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ११ पदके मिळवून दुहेरी यश संपादन केले, तर ठाणे येथे झालेल्या राज्य मॅरेथॉन स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली.
पुणे येथील कै. बाबुराव सणस क्रीडांगणावर मुलींच्या, तर बालेवाडी येथे दि. १० व ११ जुलै रोजी मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या. त्यात २० वर्षाखालील गटात मुलांत सागर माळी याने तिहेरी उडीत दुसरा, तर डेकॅथलॉन खेळप्रकारात प्रथम व अंकुश कलगुटगी याने डेकॅथलॉन खेळप्रकारात दुसरा, मुलींत इंदुताई मरगळे हिने दहा हजार मीटर धावणे तिसरा, फायेका पठाण हिने तिहेरी उडीत दुसरा, तर मंगल पारधी हिने तीन हजार मीटर धावणे पाचवा, १८ वर्षाखालील मुलांत संतोष माळी याने बांबू उडीत प्रथम, विवेक साळुंखे याने ऑक्टॅथलॉन खेळप्रकारात प्रथम, तर प्रीतम कांबळे याने उंचउडी व तिहेरी उडीत चौथा, मुलींत सुनीता पाटील हिने हेप्टॅथलॉन खेळप्रकारात प्रथम व तिहेरी उडीत तिसरा, श्रृती सावंत हिने हेप्टॅथलॉन खेळप्रकारात दुसरा व १०० मीटर अडथळा शर्यतीत चौथा, अनुसया डवरी हिने ८०० मीटर धावणे तिसरा, तर रेणुका चवरे हिने तीन हजार मीटर धावणे चौथा क्रमांक मिळविला. या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंनी एकूण ११ पदके मिळवली.
तसेच ठाणे येथे झालेल्या राज्य मॅरेथॉन स्पर्धेत इंदुताई मरगळे हिने २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर नववा क्रमांक मिळविला. १८ वर्षाखालील गटात रेणुका चवरे, अनुसया डवरी व मंगल पारधी या अनुक्रमे सहाव्या, सातव्या व आठव्या क्रमांकांवर राहिल्या. १४ वर्षाखालील गटात मोनिका पाटील हिने तिसरा, धनश्री गौर हिने सातवा, तर खुल्या गटात दहा किलोमीटर स्पर्धेत अरुण काळेल याने अकरावा क्रमांक मिळविला. या सर्व खेळाडूंचा अतिरिक्त जिल्हाधिकारी डी. एस. पाटील व सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्वाना स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सचिव प्रश्न. एस. एल. पाटील व अविनाश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.