Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गावित आणि पिचड यांच्या पुतळय़ांचे सोलापुरात कोळी समाजाकडून दहन
सोलापूर, १३ जुलै/प्रतिनिधी

 

विस्तारित क्षेत्रातील कोळी समाजाच्या विरोधात शक्तिप्रदर्शन केल्याबद्दल आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र कोळी समाज, सोलापूर शाखेच्या वतीने सोमवारी करण्यात आले.
कोळी समाजाच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.
यातील चौदा उपोषणार्थीपैकी दहा उपोषणार्थीची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरीही शासनाकडून कोळी समाजाच्या रास्त मागण्यांबाबत कसलीही दखल घेण्यात आली नाही. त्यातच सातत्याने आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि माजी मंत्री मधुकर पिचड हे विस्तारित क्षेत्रातील कोळी समाजाच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत असल्याबद्दल त्या दोघाजणांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात केल्यामुळे एकच खळबळ उडाली.
कोळी समाजाच्या मागण्यांबाबत शासन जागे न झाल्यास समाजातील १०० कार्यकर्ते व कर्मचारी आत्मदहन करून आंदोलन तीव्र करतील, असा इशारा समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पंचप्पा हुग्गे, मल्लिकार्जुन कोळी आणि कमल ढसाळ यांनी एका पत्रकान्वये दिला आहे.