Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आजीच्या खुनाच्या आरोपातून नातू निर्दोष
शास्त्रीय पद्धतीने पुरावा जमविल्याचा पोलिसांचा दावा पोकळ
कोल्हापूर, १३ जुलै / प्रतिनिधी

 

अतिशय शास्त्रीय पध्दतीने तपास करून भक्कम परिस्थितीजन्य पुरावा गोळा केल्याचा दावा केला गेलेल्या शांताबाई पाटील खून खटल्यातून तिचा नातू अभिषेक शिरीष पाटील याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.बी.महाजन यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली. शाहुपुरी पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात दाखल केलेला पुरावा अतिशय ठिसूळ पायावर उभा असल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.
दिनांक ३ एप्रिल २००८ रोजी नागाळा पार्क परिसरात राहणाऱ्या श्रीमती शांताबाई पाटील यांच्या डोक्यात बत्ता घालून खून केल्याची आणि विरेन शिरीष पाटील यास जखमी केल्याची फिर्याद शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात शांताबाई पाटील यांचा नातू अभिषेक पाटील यानेच खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. आजीने दूरदर्शन पाहण्यास मनाई केली तसेच संगणकावर अश्लिल चित्रफिती पाहतो म्हणून वारंवार रागाने बोलली या कारणावरून अभिषेकने आपली आजी शांताबाई हिचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला. गेल्या वर्षी नागाळा पार्क परिसरात झालेल्या या खूनप्रकरणाने खळबळ उडाली होती.
या खटल्यात पुढे आलेला एकूणच पुरावा हा नकारात्मक होता. या खटल्यातील १४ साक्षीदार बचाव पक्षाला फितूर झाले होते. १८ साक्षीदार हे केवळ ऐकीव माहितीवर उभे करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात घरातील कोणत्याही वस्तूवर संशयीत आरोपीसह कोणाचेही ठसे आढळले नाहीत. रक्ताचा गट स्पष्ट होऊ शकला नाही. घटनास्थळी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. मात्र संशयीत आरोपी घटनास्थळी असूनही पोलिसी श्वान हा नागाळा पार्क येथील फ्लॅटपासून कनाननगर झोपडपट्टीपर्यंत गेला होता. पोलिसांनी पंचांना घेऊन वस्तू जप्त करण्याचा प्रयत्न केला. पण पंचासमक्ष गुन्ह्य़ातील वस्तू जप्त करता आली नाही. असे अनेक नकारात्मक पुरावे पुढे आले.
बचाव पक्षाच्या वकिलांनी श्रीमती शांताबाई पाटील यांचा बाहेरून कुणीतरी त्यांच्या खोलीत प्रवेश करून चोरीच्या उद्देशाने हल्ला केला आणि त्यातच श्रीमती
शांताबाई पाटील या मृत्युमुखी पडल्या. या खटल्यातील संशयीत आरोपी अभिषेक पाटील याचा या खुनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असा युक्तिवाद केला होता. न्यायालयाने तो ग्राह्य़ धरून अभिषेक पाटील याची निर्दोष मुक्तता केली. या गुन्ह्य़ाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक जी. पी. दाभाडे यांनी केला होता. बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. पी. के. चौगले यांनी काम पाहिले.