Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

अभिनयाची ‘फुले’ कोमेजली
निळू फुले पंचत्वात विलीन
पुणे, १३ जुलै/प्रतिनिधी

‘सिंहासन’, ‘पिंजरा’, ‘सामना’सारखा चित्रपट असो वा ‘जंगली कबूतर’, ‘बेबी’, ‘सखाराम बाईंडर’ सारख्या नाटकांतील भूमिकेत जीव ओतून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे, गेली पाच ते सहा दशके मराठी नाटक, चित्रपटसृष्टीवर खलनायकी, विनोदी, गंभीर वळणाच्या अभिनयाने अधिराज्य गाजविलेले समर्थ अभिनेते नीळकंठ कृष्णाजी तथा निळू फुले यांचे आज पहाटे येथे एका खासगी रुग्णालयात अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी रजनी, विवाहित कन्या गार्गी असा परिवार आहे. निळू फुले यांनी हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांनाही देशभरातील रसिकांनी पसंतीची पावती दिली होती.

बिल्डरांना जाब विचारा आणि वीज बिले भरणे बंद करा -उद्धव ठाकरे
मुंबई, १३ जुलै/प्रतिनिधी

जुन्या चाळी, इमारती, झोपडपट्टय़ा, वस्त्या येथील पुनर्वसन योजनांत बिल्डरने लोकांना दिलेल्या आश्वासनांचे पालन केले नसेल तर तो बिल्डर कितीही मोठा असला तरी त्याला धरा आणि ‘गधडय़ा, कबूल केल्याप्रमाणे लोकांना देतोस की नाही’, असा जाब विचारा, असा आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. बेस्ट, रिलायन्स, टाटा अथवा महावितरण कुणाचीही वीज दरवाढ शिवसेनेला मान्य नाही. ही दरवाढ रद्द झाली नाही तर मुंबईकरांच्या पाठिंब्याने शिवसेना ‘वीज बिल बंद’ आंदोलन करील आणि वीज तोडणाऱ्यांच उरावर बसेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

राज्यातील ३० हजार प्राध्यापकांचे आजपासून काम बंद आंदोलन
शासनाच्या दिरंगाईचा आणखी एक फटका
पुणे, १३ जुलै/खास प्रतिनिधी
सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने केलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील तीस हजारांहून अधिक प्राध्यापक उद्या, मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनावर जाणार आहेत. वर्गातील अध्यापनापासून महाविद्यालय-विद्यापीठांचे कोणतेही काम प्राध्यापक करणार नसल्याने उच्चशिक्षण क्षेत्र ठप्प होईल. अकरावी प्रवेशाचा ९०:१० प्रश्न, मार्डच्या संपापाठोपाठ राज्य शासनाच्या दिरंगाईमुळे बसणारा हा आणखी एक मोठा फटका आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये देशभरातील प्राध्यापकांसाठी सहावा वेतन आयोग मंजूर केला.

‘मार्ड’ सात हजारांच्या वाढीवर ठाम : सहाव्या दिवशीही संप सुरूच
मुंबई, १३ जुलै / खास प्रतिनिधी

राज्य सरकारने सहा हजार रुपये विद्यावेतन देण्याची तयारी दर्शविली असली तरी ‘मार्ड’चे पदाधिकारी सात हजार रुपयांच्या मागणीवर ठाम राहिल्याने निवासी डॉक्टरांचा संप सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याची तयारी सरकारने दर्शविताच दंतवैद्यक, शिकाऊ डॉक्टर्स (इन्टर्न्स) यांनीही आपल्या वेतनांमध्ये वाढ करण्याची मागणी पुढे रेटली आहे.निवासी डॉक्टरांचा गेले सहा दिवस सुरू असलेला संप मिटावा म्हणून राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेले प्रयत्न फोल ठरले. वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री सुरेश शेट्टी, सचिव भूषण गगराणी आणि संचालक डॉ. वासुदेव तायडे यांनी आज सुमारे तीन तास मार्डच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

डॉक्टरांवरील खर्चाचे तुणतुणे वाजविणाऱ्या शासनाकडून ‘मार्ड’च्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्षच!
मुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी
३० हजार रुपये विद्यावेतन, प्रत्येकाला स्वतंत्र निवासस्थान, सुरक्षा आणि कामाचे निश्चित तास, विमा योजना, आजारपण/बाळंतपणाची रजा आदी प्रमुख मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी शासनाकडून या डॉक्टरांवर केल्या जाणाऱ्या खर्चाचे तुणतुणे पुढे केले जात आहे. या डॉक्टरांवर सुमारे चार लाख रुपये खर्च होतो असा आकडा देणाऱ्या शासनाकडून या नेमक्या खर्चाचा तपशील देण्यास मात्र कांकू केली जात आहे.

मक्केत नेमके कुणाला पत्र पाठवायचे?
कसाबचा काथ्याकूट सुरूच..

मुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी

मला मक्केत पत्र पाठवायचे आहे, मात्र ते कोणाला पाठवायचे आहे हे माहीत नाही, असा गेल्या शुक्रवार पासून सुरू केलेला धोशा अजमल कसाबने आजही कायम ठेवला. वकिलांशी त्याबाबत अर्धा तास चर्चा केल्यानंतरही आपल्याला मक्केत नेमके कुणाला पत्र लिहायचे आहे हे माहीत नसल्याचा दावा कसाबने केला.

सभरवाल खून खटला, सहाही आरोपींची निर्दोष सुटका
नागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी
उज्जन येथील गाजलेल्या प्रा. एच.एस. सभरवाल खून खटल्यातील सहाही आरोपींची नागपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नितीन दळवी यांनी आज पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. आरोपी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

३५ लाख विद्यार्थी, १७ परीक्षा.. आणि कर्मचारी फक्त १०!
कैफियत शिष्यवृत्तीची
आशिष पेंडसे
पुणे, १३ जुलै

राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मापदंड ठरलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करणारी राज्य परीक्षा परिषद मात्र लालफितीच्या दुर्गुणाचा बळी ठरत आहे. अपुरा निधी, अत्यंत तोकडे मनुष्यबळ, दरवर्षी वाढणारा बोजा अशा परिस्थितीत प्रत्येक दिवस पुढे रेटण्याची वेळ परिषदेवर आली आहे. राज्यातील शाळा-शिक्षकांनी असहकार पुकारला, तर सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांशी संबंधित या परिषदेचा डोलारा क्षणाधार्थ कोलमडून जाण्यासारखी अवस्था आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा ‘एटीकेटी’ला ‘लाल बावटा’!
पुणे, १३ जुलै/खास प्रतिनिधी

पदवीधरांच्या कारखान्यातील शैक्षणिक चक्कीत पिसून निघण्यापेक्षा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रोजगारक्षम कौशल्य प्राप्त करण्याच्या संधीचा लाभ ‘एटीकेटी’धारकांना यावर्षी तरी घेता येणार नाही. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी एका आदेशाद्वारे दहावीला ‘एटीकेटी’ देऊ केली असली, तरी केंद्रीय कामगार मंत्रालय व ‘नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग’च्या मान्यतेशिवाय औद्योगिक प्रशिक्षणाची दारे ‘एटीकेटी’धारकांना खुली होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर २३ जुलैला
पुणे, १३ जुलै/खास प्रतिनिधी

राज्यातील लाखो विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहिल्यानंतर चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर २३ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर ‘डेटा एन्ट्री’ करणाऱ्या संस्थेकडून झालेल्या चुकीमुळे हा विलंब झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहिलेला नाही, अशी शाश्वतीही राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली. चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा सालाबादप्रमाणे यंदाही फेब्रुवारीत घेण्यात आली. राज्यभरातील २० लाखांहून अधिक विद्यार्थी त्यासाठी बसले होते. प्रथेप्रमाणे जूनच्या पहिला आठवडय़ामध्ये किंवा उशिरात उशिरा दुसऱ्या आठवडय़ामध्ये शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर केला जातो. नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शाळा सुरू झाल्यानंतर होणारा तो पहिला आनंदोत्सव ठरतो. यंदा मात्र जुलै उजाडला, तरीही शिष्यवृत्तीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात न आल्याने शाळांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.

पावसाने केला वाहतुकीचा खोळंबा
मुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी

पाऊस आणि वाहतुकीचा खोळंबा हे जणू पक्के समीकरण होऊ लागले आहे. मुंबईकरांचा कालचा दिवस कोरडा गेल्यानंतर आज रात्री नऊच्या सुमारास पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात आणि पाणी तुंबल्याने मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. पाणीकपातीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी नोकरदारांना मात्र तुंबलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. रात्री पावसाचा जोर एवढा वाढला की, अंधेरी आणि सांताक्रूझच्या भुयारी मार्गातील वाहतूक थांबविण्यात आली. मुसळधार पावसात मध्य आणि पश्चिम रेल्वेसेवा सुरळीत सुरू होती. रस्तेवाहतुक मात्र संथ झाली होती. महालक्ष्मीमधील कॅडबरी जंक्शन, वरळीतील अ‍ॅनी बेझंट मार्ग, वांद्रे (प.) येथील लीलावती रुग्णालयाजवळील रस्ते, हिंदमाता, बॅ. नाथपै मार्ग, शिवडी बस डेपो, देवनार वसाहत या ठिकाणी पाणी तुंबले होते. मौलाना शौकत अली मार्गावरील अहमद अमर अली मिल इमारतीच्या छताचा काही भाग पडल्याची घटनाही घडली. या घटनेते कोणीही जखमी झाले नाही. कांदिवली (प.) भागातही भिंत कोसळल्यामुळे साक्षी मोहिते (२७) ही महिला जखमी झाली तर कुल्र्यातही कंपाउंडची भिंत कोसळली. शहरात सात ठिकाणी झाडे पडल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मान्सूनचा अंदाज आशादायी; पिकेही चांगली येणार-शरद पवार
नवी दिल्ली, १३ जुलै/पीटीआय

मान्सूनच्या प्रगतीचे सादरीकरण आज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सरकारपुढे केले असून त्या आधारे यंदाच्या वर्षी चांगली पिके येतील; पण येत्या सात दिवसांत पाऊस कसा पडतो यावर सगळे अवलंबून आहे असे मत कृषिमंत्री शरद पवार यांनी आज व्यक्त केले.वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज मान्सूनच्या स्थितीचे सादरीकरण केले, त्यानुसार सगळा आठवडा चांगला आहे. जर त्यांचे भाकीत खरे ठरले तर आपल्यावरील संकट टळेल. १४० दशलक्ष हेक्टर जमिनीपैकी साठ टक्के जमीन ही पावसावर अवलंबून आहे, बाकी जमीन पाटबंधाऱ्यांच्या सोयीने ओलिताखाली आलेली आहे. दहा दिवसांपूर्वी जी परिस्थिती होती ती बघता आता परिस्थिती सुधारली आहे पण सध्या तरी ठोस असे काही सांगता येणार नाही. गेल्या आठवडय़ात भाताची लागवड ही ७५ टक्क्य़ांनी वाढली आहे, पण ती गेल्या वर्षीच्या पातळीला पोहोचलेली नाही. आम्ही अजूनही ‘अ’ योजनेला चिकटून आहोत अजून आपत्कालीन योजनेकडे वळलेलो नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज पीक स्थितीचा आढावा घेतला व योजना ‘ब’ तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. जुलैत मान्सून सुरळीत राहील असे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे