Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

हजारे यांच्या खुनाची सुपारी
सीबीआयने आम्हाला माहिती दिलीच नाही - जयंत पाटील
उस्मानाबाद, १३ जुलै/वार्ताहर
पवन राजे हत्याकांडातील आरोपी जेव्हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात होते, तेव्हा आरोपी पारसमल जैन याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मारण्याची सुपारी दिल्याचा कबुलीजबाब दिला नव्हता. आरोपींना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी. बी.आय.) ताब्यात दिल्यानंतर हजारे यांच्या हत्येचा कट वृत्तपत्रांतूनच समजला. सी. बी.आय.ने अद्यापि या संदर्भातली अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे याबाबतचा गुन्हा नोंदविला नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज तुळजापूर येथे दिले.

शहर एकात्मिक रस्ते विकासयोजना पूर्ण होण्याबाबत बांधकाममंत्र्यांनाच शंका
क्रांती चौक उड्डाणपुलाचे भूमिपूजन
औरंगाबाद, १३ जुलै/प्रतिनिधी
शहराच्या विकासासाठी २००१मध्ये आखण्यात आलेली १ अब्ज ६७ कोटी रुपयांची शहर एकात्मिक रस्ते विकास योजना पूर्ण होण्याविषयी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) डॉ. विमल मुंदडाच साशंक आहेत. ‘आमच्याकडे निधीच नाही. टोलनाकेही आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत रस्ते विकासासाठी निधी आणायचा कोठून, या योजनेतील अन्य कामे कशी पूर्ण होणार,’ असा प्रश्न त्यांनी आज विचारला.

काँग्रेसच्या नेत्यांमधील संपर्कासाठीच मोहिमेची गरज
लक्ष्मण राऊत, जालना, १३ जुलै

काँग्रेसच्या जनसंपर्क मोहिमेनिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे बुधवारी (दि. १५) जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. विविध निवडणुकांत वाताहत झाल्यानंतरही गटबाजी आणि आपापसातील हेवेदावे जणू स्थायीभावच झाल्याचे चित्र जिल्ह्य़ात पक्षामध्ये आहे. जिल्ह्य़ात काँग्रेसचा एकही विधानसभा सदस्य नाही. लोकसभेच्या मागील पाच निवडणुकांत काँग्रेसच्या वाटय़ाला पराभवच आलेला आहे.

महापालिकेचे अंदाजपत्रक सव्वापाच अब्जांवर
स्थायी समितीकडून २१ कोटी रुपयांची वाढ
औरंगाबाद, १३ जुलै/प्रतिनिधी
महानगरपालिकेचे वर्ष २००९-१०चे अंदाजपत्रक ५ अब्ज १५ कोटी रुपयांवर गेले आहे. प्रशासनाने ४ अब्ज ९४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले होते. स्थायी समितीने आपल्या अधिकारात त्यामध्ये २१ कोटी रुपयांची वाढ केली असून अंतिम मान्यतेसाठी ते सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेवराई तालुक्यात गॅस्ट्रोने मुलीचा मृत्यू
गेवराई, १३ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील कानडा पिंपळगाव येथील एका सात वर्षांच्या मुलीचे गॅस्ट्रोची लागण होऊन निधन झाले. तालुक्यातील १४ गावांमध्ये साथीने चांगलेच डोके वर काढले असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. एकूण ४० रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. कानडा पिंपळगाव येथील अंबादास मेस्त्री यांच्या मुलीला उपचारासाठी बीडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल तिचे निधन झाले. दूषित पाण्यामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शनिवापर्यंत ३१ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. त्यानंतर दोन दिवसांत नऊ रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.खामगाव, गंगावाडी, भेंडटाकळी, रांजणी, तलवाडा, पांगरी, राजपिंप्री, गढी, धोंडराई, किनगाव रोहितळ व गेवराईतील ४० रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील सय्यद परवीन, राम पिसाळ, प्रकाश खोकले (निकमगल्ली), सुनील देवराव कांडेकर (भीमनगर), अप्पासाहेब घुले (नाईकनगर), तर शीतल गोरे (रोहितळा), ज्ञानेश्वर बारटक्के (रोहितळा), सुमित्रा गायकवाड (किनगाव), सार्थक खरात (धोंडराई) रुग्णालयात उपचार घेत आहेत.

काँग्रेस इच्छुकांच्या आज मुलाखती
परभणी, १३ जुलै/वार्ताहर

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक उद्या (मंगळवारी) परभणीत येणार आहेत. सध्या आघाडीमध्ये केवळ जिल्ह्य़ातील दोन मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला असले तरी सर्व चार मतदारसंघातील इच्छुकोंच्या मुलाखती हे निरीक्षक घेणार आहेत. सध्या जिल्ह्य़तील जिंतूर व परभणी हा काँग्रेस तर पाथरी व गंगाखेड हे राष्ट्रवादीकडे आहेत. स आघाडीबाबत अद्यापि निर्णय न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. उद्या कै. रावसाहेब जामकर विद्यालयात दुपारी १ वा. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

‘मॅरेथॉन जय हो’मध्ये आज साडेपाच हजार खेळाडू धावणार
शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा
नांदेड, १३ जुलै/वार्ताहर
शहरातील रस्त्यांवरून उद्या (मंगळवारी) सकाळी साडेपाच हजार तरुण धावतानाचे दृश्य पाहायला मिळणार आहे. राज्यासह परराज्यातून आलेले तरुणगणवेषात रस्त्यावरून सकाळी ९ वाजता धावतील.कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शहर युवक काँग्रेसने आयोजिलेल्या ‘मॅरेथॉन जय हो’मध्ये यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरयाणा आदी राज्यांतील तरुण सहभागी होत असल्याने स्पर्धकांची संख्या सुमारे साडेपाच हजार झाली आहे, असे आयोजक मुन्ना अब्बास यांनी सांगितले.युवक काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालयाजवळ उद्या सकाळी ९ वाजता अमिता अशोक चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखविल्यावर स्पर्धेला सुरुवात होईल. वर्कशॉप, रेल्वे विभागीय कार्यालय, पुन्हा परत वर्कशॉप, भाग्यनगर, नागार्जुना टी पॉइंट, अण्णाभाऊ साठे चौक ते व्ही.आय.पी. रस्ता मार्गे आय.टी.एम. येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण होणार आहे.

खिचडी खाल्ल्याने वीस मुलांना विषबाधा
हिंगोली, १३ जुलै/वार्ताहर

वसमत तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील अंगणवाडीत केलेली खिचडी खाल्ल्याने आज २० बालकांना आणि तीन महिलांना विषबाधा झाली. त्यात एका गरोदर महिलेचा समावेश आहे. या सर्वाना वसमत येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जवळा (खु.) येथील अंगणवाडीत सावित्रीबाई फुले महिला बचतगटातर्फे खाऊ बनविला जातो. आज दुपारच्या भोजनासाठी खिचडी शिजविण्यात आली. ही खिचडी खाल्ल्याने तेवीस जणांना त्रास होऊ लागला. साधना डहाके, प्रतिभा सवंडकर, आकाश डहाके, शिवम सवंडकर यांची प्रकृती गंभीर आहे. यमुना पवार, सकू उत्तलवार, उर्मिला मंचकवार, आदिनाथ कटारे, ओंकार डहाळे, करण डहाळे, वैष्णव डहाळे, संध्या डहाळे, शिवण डहाळे, रोहित पवार, पूजा पवार आदींवर उपचार चालू आहेत. एका मुलाने खिचडी डब्यात नेली होती. डब्यात मृत पालीचा सांगाडा दिसला. ही बातमी गावात पसरली व त्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाला.

कन्नड कारखान्याला टाळे ठोकले
औरंगाबाद, १३ जुलै/प्रतिनिधी

तब्बल ८५ कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने राज्य सहकारी बँकेने आज कन्नड सहकारी साखर कारखान्याला टाळे ठोकले. कारखान्याकडे स्थापनेपासून, म्हणजेच १९७३पासून बँकेचे कर्ज होते. मधली काही वर्षे कारखाना बंद होता. कर्ज व व्याज वाढत जाऊन आजघडीला ८५ कोटी रुपये कारखाना बँकेचे देणे लागतो. मात्र ही रक्कम फेडण्याची कुवत कारखान्यामध्ये नाही. अनेक वेळा नोटीस देऊनही कारखान्याने प्रतिसाद न दिल्याने आज टाळे ठोकण्यात आले.मधल्या काळात कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला होता. या काळातही बँकेचे कर्ज फेडण्यात आले नाही.

सावरगावच्या मुलांच्या प्रकृतीचा धोका टळला
परतूर, १३ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील सावरगाव येथील पोलिओ लशीकरणानंतर प्रकृती बिघडलेल्या सर्व १७ मुलांची तब्येत आता धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी आज सांगतिले. आष्टीजवळील सावरगाव येथील सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओ, गोवर आणि ‘अ’ जीवनसत्त्वाची लस देण्यात आल्यानंतर उलटी, ताप, चेहऱ्यावर सूज येणे असा त्रास जाणवू लागल्याने खळबळ माजली होती. डॉ. गायकवाड,आष्टी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश कडले व बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत अंभुरे यांनी सर्व मुलांची तपासणी करून उपचार केले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी रीता मेत्रेवार यांनी आज सावरगावला भेट दिली.

जुगार अड्डय़ावर छापा
अंबाजोगाई, १३ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील घाटनांदूर येथील आठवडी बाजार भागात बीड पोलिसांनी एका जुगार अड्डय़ावर छापा घालून २१ हजार ६८० रुपयांचा माल जप्त केला.सातजणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा पोलीस उपअधीक्षक गीता चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा सपाटा लावला आहे. घाटनांदूर येथे काल आठवडी बाजार भागात जुगार अड्डय़ावर छापा घालून नानासाहेब कदम, उमाकांत घुले, हनुमानसिंग, श्रीपाद सोनवणे, ईश्वर जाधव, राम जाधव, लालासाहेब जगताप यांच्यावर गुन्हे दाखल केले.ल्ल

आगीत घर खाक
भोकर, १३ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील किन्हाळा येथील घराला अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्य, शेतीपयोगी अवजारे आदी वस्तू जळून खाक झाल्या. पत्रकार उत्तम वाबळे यांच्या घराला शनिवारी सायंकाळी दरम्यान अचानक आग आगली. यात संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, खत, शेती अवजारे, लाकडे आदींसह घर जळून खाक झाले. भोकर तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी. जी. एस. भिसे, तलाठी बी. एम. जोंधळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

एकतानगरमध्ये ‘रास्ता रोको’
औरंगाबाद, १३ जुलै/प्रतिनिधी
एकतानगरला पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील महिलांच्या वतीने आज सकाळी जटवाडा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. नहरीतून पाणी भरत असताना गेल्याच आठवडय़ात येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून येथील रहिवाशांनी पाण्यासाठी आंदोलन तीव्र केले आहे.महिलेच्या मृत्यूनंतर येथे विंधन विहिरी देण्याचे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र येथील पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे पालिकेकडूनच पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. मात्र हा भाग गुंठेवारीत येत असल्यामुळे शिवाय पालिकेकडे पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी देता येणार नाही, अशी भूमिका पालिकेच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे येथील महिलांनी आज सकाळी रास्ता रोको केला. पाण्यासाठी महिलांचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.आंदोलनकर्त्यां महिलांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

शिवसेनेची आता शिवजागरण मोहीम
औरंगाबाद, १३ जुलै/खास प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्ह्य़ातील विधानसभेच्या ९ जागा जिंकण्यासाठी येत्या दहा दिवसांत पंचायत समितीनिहाय शिवजागरण मोहीम हाती घेण्यात येईल, अशी माहिती रविवारी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीनिमित्त शिवसेनेच्या आढावा बैठकीत देण्यात आली.
शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. त्या वेळी अशी माहिती देण्यात आली की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. शिवसेनेकडे जनता आशेने पाहत आहे. दररोज तीन याप्रमाणे येत्या दहा दिवसांत पंचायत समितीनिहाय शिवजागरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेत बैठका घेऊन निवडणुकीच्या पूर्वतयारीचे काम केले जाणार आहे. संघटनात्मक कार्य आणि रचनात्मक कार्य करण्याचे आवाहन या बैठकीत कार्यकर्त्यांना करण्यात आले. या बैठकीला सभागृहनेते गजानन बारवाल, उपमहापौर भाऊसाहेब वाघ, डॉ. अण्णासाहेब शिंदे, सुहास दाशरथे आदी उपस्थित होते.

दोन चोरांकडून दीड लाखांचा माल जप्त
औरंगाबाद, १३ जुलै/प्रतिनिधी
दुकानांतून दूरचित्रवाणी संच, फ्रीज अशी महागडी उपकरणे चोरणाऱ्या दोघा चोरटय़ांना क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. चोरीचा दूरचित्रवाणी संच रिक्षातून घेऊन जात असतानाच त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दिलीप सतीश राठोड आणि राहुल राम डोळझाके अशी या आरोपींची नावे असून त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत.राहुल याच्या मालकीची रिक्षा असून त्यातून ३६ इंची एलसीडी दूरचित्रवाणी संच वाहून नेत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांनी त्याच्याकडे त्याबाबत चौकशी केली असता तो संच चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता उघड झालेल्या माहितीच्या आधारे या दोघांच्याकडील आणखी दोन दूरचित्रवाणी संच, २ एलपीजी गॅस टाक्या, १ फ्रीज, २ मिक्सर, १ होम थिएटर असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. त्यांच्याकडून आणखी साहित्य जप्त होईल. तसेच चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक दौलत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

वाळूज शिवारात चोरांचा धुमाकूळ
औरंगाबाद, १३ जुलै/प्रतिनिधी
वाळूज शिवारातील शेख अफसर शेख नवाब यांच्या शेतवस्तीवर मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरांनी धुमाकूळ घातला. अफसर आणि त्यांच्या चार सालगडय़ांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडील २६ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लुटला. शेख अफसर हे वस्तीवरील ओटय़ावर झोपलेले होते. तेथे आलेल्या चार जणांनी त्यांना काठीने बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोख ४ हजार रुपये, हातातील घडय़ाळ तसेच मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्यांच्या चार सालगडय़ांच्या झोपडय़ांमध्ये जाऊन बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील ऐवज लुटला.

अंबड आणि घनसावंगी तालुक्यात गटसचिवांची अपुरी संख्या
अंबड, १३ जुलै/वार्ताहर
गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या व राजकीयदृष्टय़ा महत्त्व असलेल्या अंबड-घनसावंगी तालुक्यातील १५८ सहकारी सोसायटय़ांचा कार्यभार फक्त २८ गटसचिव सांभाळत आहेत. अंबड तालुक्यात ७४, तर घनसावंगी तालुक्यात ८४ विविध कार्यकारी सहकारी सोसायटय़ा आहेत. या तालुक्यात एकाच गटसचिवाकडे दहा ते पंधरा गावांचा कार्यभार आहे. यामुळे गटसचिवावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. गटसचिवांची भरती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होत असताना शासनाने नेमलेल्या आयोगाच्या शिफारशीनुसार ही भरती पात्र उमेदवारांच्या सोसायटीमधून करण्यात येणार होती, मात्र यात काही त्रुटी असल्यामुळे या प्रक्रियेला आयुक्ताकडून स्थगिती मिळाली.

निळू फुले यांना आश्रमशाळेत आदरांजली
निलंगा, १३ जुलै/वार्ताहर

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांना निसंगा येथील वेणुताई यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेत संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी आज श्रद्धांजली वाहिली. निळू फुले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष व भटक्या-विमुक्त संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विलास माने व श्रीशैल्य बिराजदार यांनी निळू फुले यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाची माहिती दिली. शिक्षक शेषेराव मंमाळे, बी. टी. पवार, मुख्याध्यापक दशरथ जाधव या वेळी उपस्थित होते.

नांदेडमध्ये आज कर्करोग निदान शिबिराचे आयोजन
नांदेड, १३ जुलै/वार्ताहर

मराठवाडय़ाचे भगीरथ कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त येथील शंकर कुसूम प्रतिष्ठान व नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जुलैला मोफत कर्करोग (कॅन्सर) निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम दरक यांनी दिली.ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्य़ातील कॅन्सर रुग्णांचे मोफत रोगनिदान व उपचाराचे मार्गदर्शन करण्यासाठी शंकर कुसुम प्रतिष्ठानने बार्शीच्या नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले आहे. महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दवाखान्यामध्ये १४ जुलैला सकाळी ९ ते २ या वेळात कर्करोगतज्ज्ञ डॉ. पी. एस. डाळे व त्यांचे सहकारी रुग्णांची तपासणी करणार आहेत. जिल्ह्य़ातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम दरक व संजय देशमुख लहानकर यांनी केले आहे.

‘कचरा फेको’ आंदोलन यशस्वी झाल्याचा मनसेचा दावा
भोकर, १३ जुलै/वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ग्रामपंचायत कार्यालयात ‘कचरा फेको’ आंदोलन केले. मात्र यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.गावातील अनेक भागांत नाल्या तुंबून जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सर्व कचरा हटवण्यात आला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयात ‘कचरा फेको’ आंदोलन करण्याचा इशारा आठ दिवसांपूर्वी दिला होता. आज मनसेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर, माधव जाधव-वडगावकर, किरण भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी कार्यकर्त्यांनी चिखल व कचरा भरून आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दिशेने भिरकावल्या. या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. ग्रामविकास अधिकारी दिलीप बच्चेवार यांना दमदाटी करण्यात आली. भोकर पोलिसांनी ४३ जणांना अटक करून सोडून दिले. सरपंच नारायण पाटील म्हणाले की, हे आंदोलन राजकीय सुडबुद्धीतून करण्यात आले.

नगरपालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून वेतनच नाही
नळदुर्ग, १३ जुलै/वार्ताहर

ठेकेदारांमार्फत कामावर घेतलेल्या सहा रोजंदारी कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने गेल्या वर्षभरापासून वेतनच दिले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नगरपालिकेतील काही कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने जागा रिक्त झाल्या. त्या पदांवर काही कर्मचाऱ्यांनी मुले व नगरसेवकांनी शिफारस केलेल्या सहा तरुणांना ठेकेदारामार्फत रोजंदारीने कामावर घेण्यात आले. पण नगरपालिकेकडून अधिकृत नेमणुकीचे आदेश नाहीत. भविष्यात नगरपालिका आपल्याला कायम करील या अपेक्षेने हे तरुण गेल्या दीड वर्षांपासून काम करीत आहेत. या कालावधीत पालिकेकडून ठेकेदारामार्फत फक्त एकाच महिन्याचे वेतन देण्यात आले. वर्षभरापासून त्यांना वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. थकलेले संपूर्ण वेतन त्वरित मिळावे व पालिकेने अधिकृत नेमणुकीचे आदेश द्यावेत अशी त्यांची मागणी आहे.

अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांची धारूर शाखेमध्ये गर्दी
धारूर, १३ जुलै/वार्ताहर

कापसावरील लाल्या रोगाचे व सोयाबीन नुकसानभरपाईचे अनुदान बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धारूर शाखेमध्ये जमा झाल्यामुळे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत गर्दी वाढली आहे. त्यामुळे बँकेला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले आहे.
गतवर्षी सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने नुकसानभरपाईपोटी हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. ते अनुदान दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ७५ लाख रुपयांचे अनुदान जिल्हा बँकेच्या धारूर शाखेमध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची यादीही बँकेकडे सादर करण्यात आली आहे. त्या बरोबरच लाल्या रोग्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अनुदानही बँकेत जमा झाले आहे. पंधरा दिवसांपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत खाते उघडावे लागत असल्याने अनुदान मिळण्यास दिरंगाई होत आहे. कर्जमाफीतील शेतकऱ्यांना कर्ज मिळविण्यासाठी बँकेत गर्दी वाढत आहे.