Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अभिनयाची ‘फुले’ कोमेजली
निळू फुले पंचत्वात विलीन
पुणे, १३ जुलै/प्रतिनिधी

 

‘सिंहासन’, ‘पिंजरा’, ‘सामना’सारखा चित्रपट असो वा ‘जंगली कबूतर’, ‘बेबी’, ‘सखाराम बाईंडर’ सारख्या नाटकांतील भूमिकेत जीव ओतून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे, गेली पाच ते सहा दशके मराठी नाटक, चित्रपटसृष्टीवर खलनायकी, विनोदी, गंभीर वळणाच्या अभिनयाने अधिराज्य गाजविलेले समर्थ अभिनेते नीळकंठ कृष्णाजी तथा निळू फुले यांचे आज पहाटे येथे एका खासगी रुग्णालयात अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी रजनी, विवाहित कन्या गार्गी असा परिवार आहे. निळू फुले यांनी हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांनाही देशभरातील रसिकांनी पसंतीची पावती दिली होती. फुले यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेनूसारच धार्मिक विधी टाळून आज सकाळी येथील वैकुंठ स्मशानभूमीच्या विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्र सेवादलाच्या मुशीतून घडलेल्या निळू फुले यांनी सामाजिक सेवेचे कंकण बांधले होते. त्यांनी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ तसेच अन्य माध्यमातून केलेले समाजकार्य नित्यस्मरणीय आहे.
रंगभूमीवर विविधरंगी भूमिका साकारणारा अभिजात, अस्सल कलावंत अशी ओळख असलेल्या निळूभाऊंनी चित्रपटांत चांगले यश मिळवूनही रंगभूमीची साथ सोडली नाही. त्यांनी नाटकांमध्ये साकारलेल्या सखाराम बाईंडरने नाटय़सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेले आणि मराठी रंगभूमीला एक नवा आयाम मिळाला. सिंहासनमध्ये त्यांनी केलेली दिगू या पत्रकाराची भूमिका प्रस्थापितांची चौकट न तोडता येणाऱ्या सामान्य माणसाच्या असहायतेचे दर्शन घडवते. सामनामधील त्यांनी पाटलाची भूमिका रंगविताना दाखविलेला कलेचा आविष्कार डॉ. श्रीराम लागू यांच्या समर्थ अभिनयाशी सहजतेने टक्कर घेतो. चित्रपटांमध्ये सरपंच-आमदार-साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा विविध पदांवरील प्रवृत्तींची मस्ती ते मोठय़ा बहारीने रंगवत. रंगभूमी-चित्रसृष्टी अशा रितीने गाजवत असतानाच दुसरीकडे राममनोहर लोहिया यांच्या वैचारिकतेचा वारसा जपणारा निळूभाऊंमधील सामाजिक कार्यकर्ता अनेक सामाजिक कामांमध्ये स्वत:ला झोकून देत असे.
अशा या दिग्गज व्यक्तिमत्त्वाचे आज पहाटे एका खासगी रुग्णालयात अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाल्याचे वृत्त सकाळी पसरताच केवळ नाटय़-चित्रसृष्टीच नव्हे तर त्यांच्या अफाट चाहत्यावर्गावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेअकराच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा कला, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नामवंतांबरोबरच सामान्य वर्गही मोठय़ा संख्येने उपस्थित होता. त्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला साश्रू नयनांनी निरोप दिला.
प्रकृती ठिक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून निळूभाऊ घरीच होते, तथापि आजार बळावल्याने बेशुद्धावस्थेतच गेल्या सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागातील उपचाराने त्यांची प्रकृती थोडीशी स्थिरावल्याने त्यांना रुग्णालयातील खासगी दालनात हलविण्यात आले होते. तथापि, शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली व नंतर ती ढासळतच गेली. आज पहाटे दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांचा पुतण्या त्यांच्यासमवेत होता.
सकाळी दहाच्या सुमारास रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथे राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, अमोल पालेकर, सतीश आळेकर, अजय सरपोतदार, जयराम कुलकर्णी, सयाजी शिंदे, रवींद्र मंकणी, माधव वझे, अभिनेत्री उषा चव्हाण , मधू कांबीकर, सुषमा देशपांडे, दिग्दर्शक अतुल पेठे, युक्रांदचे कुमार सप्तषी यांच्यासह निळूभाऊंचे असंख्य चाहते यावेळी उपस्थित होते. निळूभाऊंच्या इच्छेनुसार कोणत्याही धार्मिक विधीशिवाय सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.