Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बिल्डरांना जाब विचारा आणि वीज बिले भरणे बंद करा -उद्धव ठाकरे
मुंबई, १३ जुलै/प्रतिनिधी

 

जुन्या चाळी, इमारती, झोपडपट्टय़ा, वस्त्या येथील पुनर्वसन योजनांत बिल्डरने लोकांना दिलेल्या आश्वासनांचे पालन केले नसेल तर तो बिल्डर कितीही मोठा असला तरी त्याला धरा आणि ‘गधडय़ा, कबूल केल्याप्रमाणे लोकांना देतोस की नाही’, असा जाब विचारा, असा आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. बेस्ट, रिलायन्स, टाटा अथवा महावितरण कुणाचीही वीज दरवाढ शिवसेनेला मान्य नाही. ही दरवाढ रद्द झाली नाही तर मुंबईकरांच्या पाठिंब्याने शिवसेना ‘वीज बिल बंद’ आंदोलन करील आणि वीज तोडणाऱ्यांच उरावर बसेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. मुंबईतील मराठी माणसांच्या घरांच्या जिव्हाळ्याच्या मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने आज माहीम किल्ल्यापासून वांद्रे येथील म्हाडा कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मुंबई व ठाण्यात शिवसेनेच्या व्होट बँकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डल्ला मारल्यानंतर आता शिवसेनेने वीज दरवाढ व मुंबईकरांच्या घरांच्या प्रश्नावर आंदोलन करून मुंबईतील मराठी माणसाला पुन्हा शिवसेनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे हे बिल्डरांच्या विरोधातील आंदोलन म्हणजे निवडणुका जवळ आल्याचा त्यांना दिलेला सूचक इशारा आहे, असे मोर्चाच्या ठिकाणी बोलले जात होते. शिवसेनेतील अनेक नेते हे इतर पक्षांतील नेत्यांप्रमाणेच बिल्डर असून त्यांच्याकडे पुनर्विकासाच्या योजना आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळला नसेल तर त्यांना जाब कोण विचारणार, असा प्रश्नही काहींनी केला.
मराठी माणसाच्या बालेकिल्ल्याला बिल्डरांच्या उंदीर, घुशी लागल्या आहेत. विधानसभेवर भगवा फडकला तर या उंदरांना शेपटय़ा खेचून बाहेर काढले नाही तर शिवसेनाप्रमुखांचे नाव लावणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबईकरांच्या घराचा प्रश्न सोडविण्याकरिता आता बिल्डरांना आणि सत्ताधाऱ्यांना हात जोडून विनंती करीत आहे. परंतु ऐकले नाही तर कानाखाली कसा आवाज काढायचा ते बाळासाहेबांनी मला शिकवले आहे, असेही ते म्हणाले. मराठी माणसाचा इतिहास आपल्याला कुणाकडून शिकण्याची गरज नाही, असा टोला उद्धव यांनी राज यांचा नामोल्लेख न करता हाणला. ते पुढे म्हणाले की, घरांच्या मागणीकरिता आज काढलेला हा धडक मोर्चा आहे. परंतु उद्याचा मोर्चा भडक मोर्चा असणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. लोकांना वर्षांनुवर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात डांबणाऱ्या मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री तसेच अधिकाऱ्यांना संक्रमण शिबिरात डांबण्याची वेळ आली आहे. मुंबईचा राजा असलेल्या कोळी बांधवांच्या कोळीवाडय़ात एकही वीट रचू दिली जात नाही. मात्र परप्रांतीयांना बिनधास्त कुठेही बेकायदा बांधकामे करण्याचा मुक्त परवाना सरकारने दिला आहे. या अन्यायामुळे भडकलेला मराठी माणूस मंत्र्यांना रस्त्यावर खेचेल, असा इशारा देऊन ठाकरे म्हणाले की, मुंबईतील मराठी माणूस चिरडण्याचा प्रयत्न कराल तर हा मराठी माणूस तुम्हाला अरबी समुद्रात बुडवेल, असे सत्ताधाऱ्यांना बजावणाऱ्या ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये मला आग दिसली पाहिजे व आता युतीची सत्ता आणेपर्यंत स्वस्थ बसू नका, असा आदेश दिला. यावेळी शिवसेना नेते खासदार मनोहर जोशी, आमदार सुभाष देसाई व सुरेशदादा जैन यांचीही भाषणे झाली.