Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मक्केत नेमके कुणाला पत्र पाठवायचे?
कसाबचा काथ्याकूट सुरूच..
मुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी

 

मला मक्केत पत्र पाठवायचे आहे, मात्र ते कोणाला पाठवायचे आहे हे माहीत नाही, असा गेल्या शुक्रवार पासून सुरू केलेला धोशा अजमल कसाबने आजही कायम ठेवला. वकिलांशी त्याबाबत अर्धा तास चर्चा केल्यानंतरही आपल्याला मक्केत नेमके कुणाला पत्र लिहायचे आहे हे माहीत नसल्याचा दावा कसाबने केला.
गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कसाबने आपल्याला मक्केत पत्र पाठवायचे आहे, असे सांगत न्यायालयाकडे त्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र पत्र कुणाला पाठवायचे आहे, अशी विचारणा न्यायालयाने केल्यावर कसाब त्याबाबत काहीच खुलासा करू शकला नव्हता व तरीही मला पत्र पाठवायचे आहे, असा हट्ट धरून बसला होता. शेवटी न्यायालयाने त्याला मक्केत नेमके कुणाला पत्र पाठवायचे आहे हे सोमवारी सांग असे सांगत सुनावणी तहकूब केली होती. मक्केत आपल्याला नेमके कुणाला पत्र पाठवयाचे आहे याचा खुलासा आज कसाब करेल अशी अपेक्षा होती. मात्र आपल्याला त्याबाबत आपल्या वकिलांशी बोलायचे आहे असे सांगून त्याने त्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली. त्यानंतर अर्धा तास वकिलांशी बोलल्यानंतरही कसाबला मक्केत आपल्याला नेमके कुणाला पत्र पाठवायचे आहे हे सांगता आले नाही. त्याचे वकील अब्बास काझ्मी यांनी याविषयी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्याला अद्याप माहीत नाही तो कुणाला पत्र लिहिणार आहे. पण उद्या न्यायालयात याबाबत चर्चा केली जाईल.
डॉ. भालचंद्र चिखलकर, पंच साक्षीदार व्यंकटेश सावला, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पवार आणि प्रत्यक्षदर्शी तिमेश छिनेकर या चौघांची आज साक्ष नोंदविण्यात आली. डॉ. चिखलकर यांनी २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्यासह मृत्यूमुखी पडलेल्या २१ जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केले होते. डॉ. चिखलकर यांनी आज आपल्या साक्षीत करकरे यांच्या शरीरावर गोळ्यांच्या पाच, तर कामटे यांच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक जखमा आढळून आल्याचे सांगितले. याशिवाय त्या जखमांचे स्वरुपही डॉ. चिखलकर यांनी या वेळी विशद केले. कसाबने आपल्या साथीदारासोबत कामा रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर पाचव्या मजल्यावर कशाप्रकारे आपल्यावर बंदूक रोखली. तसेच आपल्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन आपल्याला शौचालयात बंद केले याबाबत न्यायालयाला सांगून छिनेकर यांनी कसाबला ओळखले. तर सावला यांच्या उपस्थितीत आपण अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांचे कपडे के. ई. एम. रुग्णालयात जप्त केल्याचे पवार यांनी सांगितले.
कसाबचा मी क्रमांक एकचा शत्रू!
आजच्या सुनावणीत एका साक्षीदाराची साक्ष नोंदविताना तो साक्षीदार कसा महत्त्वाचा आहे हे न्यायालयाला पटवून देताना अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी एकदम कसाबच्या दृष्टीने मी त्याचा शत्रू क्रमांक एक आहे, असे न्यायालयाला सांगितले. अ‍ॅड. निकम यांच्या या बोलण्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासह न्यायालयात उपस्थित सगळेच अवाक झाले. न्यायालयाने तुम्हाला कसे ठाऊक? अशी विचारणा केल्यावर त्यांनी मला ठाऊक आहे म्हणूनच मी बोलतो आहे, असे अ‍ॅड. निकम यांनी स्पष्ट केले.