Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

३५ लाख विद्यार्थी, १७ परीक्षा.. आणि कर्मचारी फक्त १०!
कैफियत शिष्यवृत्तीची
आशिष पेंडसे, पुणे, १३ जुलै

 

राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मापदंड ठरलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करणारी राज्य परीक्षा परिषद मात्र लालफितीच्या दुर्गुणाचा बळी ठरत आहे. अपुरा निधी, अत्यंत तोकडे मनुष्यबळ, दरवर्षी वाढणारा बोजा अशा परिस्थितीत प्रत्येक दिवस पुढे रेटण्याची वेळ परिषदेवर आली आहे. राज्यातील शाळा-शिक्षकांनी असहकार पुकारला, तर सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांशी संबंधित या परिषदेचा डोलारा क्षणाधार्थ कोलमडून जाण्यासारखी अवस्था आहे.
चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात यंदा झालेल्या विलंबामुळे परीक्षा परिषद ही टीकेचा विषय ठरली आहे. शिष्यवृत्तीचा निकाल का लांबला, या संदर्भात अजून राज्य शासन, मंत्रिमहोदयांसह उच्चपदस्थांकडून अधिकृतपणे कारण स्पष्ट करण्यात आले नसले, तरी राज्यभर याविषयी अनेक वावडय़ा उठत आहेत. या टीका-नाराजीच्या वातावरणात एक गोष्ट मात्र नक्की; परिषदेच्या कारभाराची स्थिती सुधारण्याबाबत ‘वॉर्निग बेल’ही कधीच देऊन झाली आहे!
परीक्षा परिषदेकडून केवळ चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, असा सर्वसाधारण समज आहे. प्रत्यक्षात मात्र १७ वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी परिषदेवर आहे. त्यामध्ये शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाची (डीएड) संवेदनशील परीक्षा, टायपिंगची जीसीसी, शॉर्टहॅण्ड, राज्यस्तरीय एनटीएस, एनएमएमएस गुणवत्ता परीक्षा, राष्ट्रीय वन संस्थेच्या प्रवेशाची परीक्षा, कर्नाटक राज्यातील टीचर्स ट्रेनिंग अभ्यासक्रमाची मुलींसाठीची प्रवेश परीक्षा, शिक्षण खात्यांमधील पदोन्नतीसाठीची परीक्षा, फिजिकल एज्युकेशनची (सीपीएड) चाचणी, आदिवासी विद्यार्थी गुणवत्ता परीक्षा आदींचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षणसेवकांच्या भरतीसाठीच्या ‘सीईटी’चे संयोजन करण्याची जबाबदारीही परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात आली आहे. या सर्व परीक्षांच्या माध्यमातून सुमारे ३५ लाख विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन परिषदेकडून केले जाते. या सर्व शैक्षणिक उलाढालीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा ही मात्र सर्वात प्रतिष्ठेची आणि जुनी. १९५४ पासून तिचे आयोजन करण्यात येत असून, १९६४ पासूनची माहिती परिषदेच्या माहितिसाठय़ामध्ये उपलब्ध आहे. ६४ साली चौथीला १० हजार ५२८ आणि सातवीला १० हजार ४१ असे मिळून एकूण २० हजार ५६९ विद्यार्थी शिष्यवृत्तीला बसले होते. कालांतराने या आकडेवारीमध्ये वाढ होत गेल्या वर्षी चौथीला १२ लाख ७४ हजार ३८, तर सातवीला सात लाख ८३ हजार ३६३ असे एकूण २० लाख ५७ हजार ४०१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. शहरी-ग्रामीण, आरक्षित घटक अशा विविध घटकांमध्ये विभागलेल्या सुमारे १० हजार संचांमध्ये शिष्यवृत्ती विभागण्यात आल्या आहेत.
हा सर्व डोलारा सांभाळण्यासाठी परिषदेकडे पूर्णवेळ कर्मचारी आहेत फक्त १०! परीक्षेच्या कार्यवाहीसाठी एकूण ८० कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, रोजंदारीवरील कर्मचारी नेमण्याची वेळ परिषदेवर आली आहे. शासकीय लालफितीमुळे पुरेशा संख्येने कर्मचारी नियुक्त करणे शक्य नसल्याने यापुढील काळातही विविध परीक्षांच्या निकालावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (पूर्वार्ध)