Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा ‘एटीकेटी’ला ‘लाल बावटा’!
पुणे, १३ जुलै/खास प्रतिनिधी

 

पदवीधरांच्या कारखान्यातील शैक्षणिक चक्कीत पिसून निघण्यापेक्षा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रोजगारक्षम कौशल्य प्राप्त करण्याच्या संधीचा लाभ ‘एटीकेटी’धारकांना यावर्षी तरी घेता येणार नाही. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी एका आदेशाद्वारे दहावीला ‘एटीकेटी’ देऊ केली असली, तरी केंद्रीय कामगार मंत्रालय व ‘नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग’च्या मान्यतेशिवाय औद्योगिक प्रशिक्षणाची दारे ‘एटीकेटी’धारकांना खुली होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
‘एटीकेटी’पेक्षा पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वर्ष वाचविण्याचा पर्याय सयुक्तिक ठरला असता, अशी भावना समाजातून व्यक्त करण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणाच्या शोधात गेल्यानंतर विद्यार्थ्यांला सर्व पर्याय खुले होते. ‘एटीकेटी’मुळे त्याचे वर्ष वाचणार असले, तरी प्रामुख्याने केवळ कला-वाणिज्य शाखेलाच प्रवेश घेण्यापुरती ही संधी मर्यादित राहण्याची शक्यता आहे. व्यवसायशिक्षणापाठोपाठ आता औद्योगिक प्रशिक्षणाच्या असमर्थतेनंतर ही मर्यादा अधोरेखित होत आहे.
उच्चशिक्षण विश्वाने बारावीच्या ‘एटीकेटी’वर लाल फुली मारल्यानंतर आता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हणजेच ‘आयटीआय’ने दहावीच्या ‘एटीकेटी’धारकांना प्रवेश देण्यास असमर्थता दर्शवली आहे. ‘आयटीआय’च्या प्रशिक्षण विभागाचे राज्य संचालक जे. डी. भुतांगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ‘आयटीआय’ची परिस्थिती स्पष्ट केली. ‘दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाचून त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाल्यास आम्हाला आनंदच होईल. परंतु, ‘आयटीआय’ची नियमावली केंद्रीय कामगार मंत्रालयातर्फे निश्चित केली जाते. त्याचप्रमाणे ‘नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग’ या परिषदेच्या माध्यमातून ‘आयटीआय’चे अभ्यासक्रम, नवीन योजना आदींचा निर्णय संमत केला जातो. औद्योगिक प्रशिक्षणाच्या मोहिमेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. पंचतारांकित ‘आयटीआय’बरोबरच अद्ययावत कौशल्यांचे प्रशिक्षण राज्यात दिले जाते. आठवीनंतर सुमारे २० अभ्यासक्रम, तर दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी सर्वाधिक ५६ अभ्यासक्रम चालविले जातात. परंतु, दहावीत ‘एटीकेटी’ प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी तरी प्रवेशप्रक्रियेत स्थान देणे अशक्य आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘दहावीला ‘एटीकेटी’ देण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाची माहिती आम्ही केंद्रीय कामगार मंत्रालय व व्होकेशनल ट्रेनिंग परिषदेला कळविणार आहोत. त्यानंतर त्यांच्या सर्वसाधारण बैठकांमध्ये या सवलतीबाबत विचार केला जाईल. महाराष्ट्राला ‘एटीकेटी’ची सवलत दिली, तर अन्य राज्यांसाठीही ती लागू करावी लागेल. त्यामुळेच फक्त महाराष्ट्रापुरतीच दहावीच्या विद्यार्थ्यांना ही सवलत दिली जाईल किंवा कसे, याबाबत आम्ही साशंक आहोत,’ असेही स्पष्ट करण्यात आले.
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही ‘आयटीआय’मध्ये अभ्यासक्रम राबविले जातात. बारावीनंतर ‘एटीकेटी’चा निर्णय झाल्यास, तो केंद्रीय स्तरावरून संमत झाल्यानंतरच राबविणे शक्य होणार आहे.