Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सभरवाल खून खटला, सहाही आरोपींची निर्दोष सुटका
नागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी

 

उज्जन येथील गाजलेल्या प्रा. एच.एस. सभरवाल खून खटल्यातील सहाही आरोपींची नागपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नितीन दळवी यांनी आज पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. आरोपी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
शशिरंजन अकेला, विमल तोमर, सुधीर यादव, हेमंत दुबे, पंकज मिश्रा आणि विशाल राजोरिया हे सहा आरोपी घटनास्थळावर हजर होते, ही गोष्ट अभियोजन पक्षाला सिद्ध करता आली नाही, असे सांगून न्यायालयाने या सहाजणांना खुनाच्या आरोपातून मुक्त केले. उज्जनच्या माधव कॉलेजमध्ये २००६ साली महाविद्यालयीन निवडणूक घेण्याबाबत वाद सुरू होता. तेथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे निवडणूक घ्यावी असे होते, तर एन.एस.यू.आय.चे कार्यकर्ते याला अनुकूल नव्हते. ‘निवडणूक होणार’ आणि ‘होणार नाही’ अशा दोन्ही आशयाची पत्रके नोटीस बोर्डवर लागली होती. अखेर ही निवडणूक रद्द झाल्याची नोटीस २६ ऑगस्ट २००६ ला नोटीस बोर्डवर लागली. त्याविरुद्ध अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. त्याच दिवशी महाविद्यालयातील प्राध्यापक हरभजनसिंग सभरवाल हे महाविद्यालयाबाहेर निघत असताना गेट क्र. २ जवळ काही विद्यार्थ्यांनी त्यांना धक्काबुक्की व मारहाण केली. यावेळी झालेला गोंधळ ऐकून कोमलसिंग सेंगर हा कर्मचारी प्रा. सभरवाल यांना आत घेऊन आला आणि त्यांना बागेत बसवले. त्याने प्रा. सभरवाल यांना ‘काय झाले’ म्हणून विचारले असता ती छोटी घटना असल्याचे उत्तर त्यांनी दिले. यानंतर प्रा. सभरवाल यांच्या अंगाला कंप सुटून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मारुती व्हॅनमधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना ‘हार्ट मसाज’ देण्यात आला. मात्र, त्याचा उपयोग न होऊन डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सभरवाल यांच्या शरिरावर कुठलीही बाह्य़ जखम नव्हती. मात्र, त्यांच्या छातीच्या बरगडय़ा तुटून फुफ्फुसात शिरल्या होत्या.
डॉक्टरांनी मृत्यूचे कारण बरगडय़ा तुटणे (सिंकोप) असे नमूद केले होते. कोमलसिंगच्या बयाणाच्या आधारावरून उज्जन पोलिसांनी त्याच दिवशी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अभाविपच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष शशिरंजन अकेला यांच्याशिवाय संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना या प्रकरणी वेगवेगळ्या वेळी अटक करण्यात आली. तपासानंतर पोलिसांनी उज्जनच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तेथे ५२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १७ एप्रिल २००८ ला हा खटला महाराष्ट्रात स्थानांतरित करण्यात आला. खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश नितीन दळवी यांच्यासमोर सुनावणीला आला. आरोपींचे म्हणणे असे होते की, निवडणुकीच्या मुद्यावर आमच्यात वाद नक्कीच होता, परंतु आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या मागणीसाठी अर्ज करून त्यावर प्राचार्याची सही घेतली. हा अर्ज देण्यासाठी आम्ही राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे गेलो होतो. त्यामुळे घटनेच्या वेळी आपण त्या ठिकाणी हजरच नव्हतो, असा त्यांचा बचाव होता. प्रा. सभरवाल यांचे बंधू मनजितसिंग सभरवाल यांनी त्यांच्या साक्षीत सांगितले होते की, त्यांनी गुजरातमध्ये दोन वृत्तवाहिन्यांवर प्रा. सभरवाल यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये पाहिली होती. मारहाण करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी पाहिल्याने त्यांची नावेही त्यांना माहीत होती. यापैकी चौघांना त्यांनी न्यायालयात ओळखले. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा तपासाचा आदेश दिला. या तपासात दूरचित्रवाहिन्यांच्या ‘फुटेज’च्या काही सीडीज न्यायालयात दाखल करण्यात आल्या.
या सीडीज अहमदाबादच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. या सीडीजमध्ये कुठलाही फेरफार करण्यात आलेला नाही, तसेच प्रा. सभरवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे दृश्य कुठल्याही सीडीमध्ये चित्रित झाले नव्हते, असा अहवाल या प्रयोगशाळेने दिला. तसेच, न्यायालयासमोरील साक्षीत कुणाही छायाचित्रकाराने आपण मारहाणीचे दृश्य टिपल्याचे म्हटले नाही, याचा न्यायालयाने उल्लेख केला.
माधव कॉलेजच्या परिसरात ही घटना झाली त्यावेळी आरोपी हे त्या ठिकाणी हजर होते, हे अभियोजन पक्षाला सिद्ध करता आले नाही. तसेच तेथे जमलेल्या बेकायदेशीर जमावाचा (अनलॉफुल असेम्बली) हे लोक भाग होते, हेही सिद्ध झालेले नाही असे सांगून अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सहाही आरोपींची पुराव्याअभावी सुटका केली.