Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

प्रादेशिक

सीबीडी-वांद्रे मार्गावर उद्यापासून सेवा सुरू
मुंबईत आता ‘बेस्ट’ सोबत एनएमएमटीही धावणार

नवी मुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसेसना अखेर मुंबई प्रवेशाचा मुहूर्त सापडला असून मंगळवारी दुपारी एक वाजता बेलापूर ते वांद्रे या मार्गावर एनएमएमटीच्या पहिल्या वातानुकूलित बससेवेचा शुभारंभ होत आहे. एनएमएमटीच्या मुंबई प्रवेशामुळे आता मुंबई महानगरीत बेस्टनंतर एनएमएमटीच्या लाल बसगाडय़ाही प्रवाशांच्या नजरेस पडणार आहेत. सीबीडी ते वांद्रे या वातानुकूलित प्रवासाकरिता एनएमएमटी ४५ रुपयांचा भाडेदर आकारण आहे, अशी माहिती आज नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे सभापती शशी दामोदरन यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.

पाणीटंचाई दूर होईल
.. फक्त एका प्रयोगाने !

रवींद्र पांचाळ, मुंबई, १३ जुलै
सुमारे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईपुढे पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवलेले असले तरी अगदी साध्या-सोप्या आणि अत्यंत कमी खर्चिक अशा उपायाने या संकटावर कायमस्वरूपी मात करता येईल, याचा धडा
बोरिवलीच्या महेश मळीक आणि वीरेंद्र चौधरी यांनी घालून दिला आहे. या उपायामुळे मुंबईकर पिण्याच्या पाण्याखेरीज अन्य बाबींसाठी वापरत असलेले लाखो लिटर पाणी विनासायास आणि मोफत तर उपलब्ध होईलच पण त्यामुळे अब्जावधी रुपयांच्या योजनाही आखण्याची आवश्यकता मुंबईला भासणार नाही, असा विश्वास या द्वयीला आहे. पावसाचे लक्षावधी लिटर वाहून वाया जाणारे पाणी अगदी सहजरीत्या साठवून पाणीसंकटाचा मुकाबला करण्याचा एक अभिनव प्रयोग बोरिवलीत यशस्वी झाला आहे.

मनसेतील विभागीय संघटक पद रद्द !
मुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला आघाडीच्या अध्यक्षांना पदावरून दूर केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आपला मोर्चा संघटनेतील अन्य पदांकडे वळविला असून त्यांनी पक्षातील विभागीय संघटक हेच पद रद्द केले आहे.

सफाळे, देवनार वीजनिर्मिती प्रकल्प रखडल्याने मुंबईत विजेची तूट?
मुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी

मुंबईच्या वीजस्थितीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने २००३ पासून मुंबईत विजेचा तुटवडा भासेल, असे आपल्या अहवालात नमूद केलेले असतानाही तत्कालीन मुंबई उपनगर वीज कंपनीने प्रस्तावित केलेला सफाळे येथील प्रकल्प आणि देवनार येथे बेस्टने प्रस्तावित केलेला प्रकल्प मार्गस्थ झाले असते तर सध्या मुंबईला भासणाऱ्या विजेच्या तुटीपेक्षा अधिक वीज उपलब्ध झाली असती आणि पर्यायाने दरही निम्म्याहून अधिक कमी झाले असते, अशी माहिती हाती आली आहे.

शिक्षक सेनेचाही आजच्या बंदमध्ये सहभाग
मुंबई, १३ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू व्हावा या मागणीकरिता उद्या १४ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील चिटणीस यांनी दिली. चिटणीस म्हणाले की, राज्य शासनाने हकीम कमिटी नेमून सरकारी कर्मचारी व शिक्षक यांना घरभाडे भत्ता व इतर महत्त्वाचे भत्ते नाकारले आहेत. घरभाडे भत्ता काढून घेण्याचे चुकीचे धोरण शासन अमलात आणत आहे. शिक्षक सेनेने या समितीवर अविश्वास दाखवून बहिष्कार टाकला आहे. सनदी अधिकाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या सर्व शिफारशी स्वतकरिता अमलात आणायच्या आणि इतरांना डावलायचे हा अन्याय असल्याचे ते म्हणाले.

भाजपचे ९ ऑगस्ट रोजी जेलभरो
मुंबई, १३ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील आघाडी सरकारचे गेल्या १० वर्षांतील अपयश लोकांसमोर मांडण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी ‘आघाडी सरकार चले जाव’, असा नारा देत जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे आणि आंदोलनाच्या पुढील टप्प्यात १५ ऑगस्टपर्यंत गावोगाव जनजागरण सभा आयोजित केल्या जातील, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. गडकरी म्हणाले की, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या या आंदोलनात कायदा व सुव्यवस्था, राम प्रधान समितीचा अहवाल जनतेकरिता खुला करणे, आघाडी सरकारचे अपयश या मुद्दय़ांवर भर दिला जाणार आहे. ‘आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला विकसित-सुरक्षित महाराष्ट्र देऊ’ हे आमचे निवडणुकीचे घोषवाक्य आहे, असे गडकरी म्हणाले.

युवतीच्या मृत्यूप्रकरणी कारवाईसाठी कोपरखैरणे बंद
बेलापूर, १३ जुलै/वार्ताहर

एका राजकीय व्यक्तीकडून सततच्या होणाऱ्या मानसिक छळवणुकीला कंटाळून एका युवतीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कोपरखैरणेवासियांनी सोमवारी या युवतीचा मृतदेह कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नेऊन जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहाचा अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली. या राजकीय व्यक्तीविरुद्ध त्याच्या साथीदारांविरुद्ध कोपरखैरणे पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने सदर समाजकंटकांनी या युवतीसह तिच्या घरच्यानांही मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. अखेर या त्रासास कंटाळून सौजन्या जाधव (२४) या युवतीने २७ जून रोजी रात्री अतिरिक्त झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; या प्रकरणी ढिम्म पोलीस प्रशासनाने राजकीय दबावामुळे आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली.