Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सेव्ह राणी बाग
भाग-५
पुन्हा बदलावा लागणार आराखडा?
प्रसाद रावकर/रेश्मा जठार

 

‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालया’च्या आधुनिकीकरणाच्या प्रस्तावाला ‘मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी’ने मंजुरी दिली आहे. मात्र, ही मंजुरीदेखील ‘अटी सापेक्ष’ असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेला आधुनिकीकरण आराखडय़ात पुन्हा एकदा फेरबदल करावे लागणार अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, ‘सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन अ‍ॅक्शन कमिटी’च्या सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे सविस्तर पत्र मान्यवरांच्या स्वाक्षऱ्यांसह मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले आहे.
‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय’ म्हणजे पूर्वीच्या ‘व्हिक्टोरिआ गार्डन’ची रचना जॉर्ज बिरवूड यांनी वास्तुरचनेतील ‘रेनेसाँ’ पद्धतीने केली. त्यानुसार त्यामध्ये मुख्य पूर्व-पश्चिम अक्षाला केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या मार्गिकेभोवती उद्यानातील लहान-मोठय़ा बागा, पादचारी मार्ग, इतर वास्तू आणि पुतळे, दगडी कारंजी उभारली आहेत. वास्तुरचनेचे सुरेख नमुने ठरतील अशा क्लॉक टॉवर, सन डायल, ट्रिपल आर्च प्रवेशद्वार आणि कारंजी, प्लाण्ट कॉन्झर्वेटरी आदी वास्तू आहेत. त्यांच्या निर्मितीनंतर गेल्या अनेक दशकांत त्याभोवतीने बहरलेल्या वनराजीने या एकूण परिसरालाच प्रसन्न रुपडे आले आहे. त्यामुळे या उद्यानाला ‘ऐतिहासिक वारशा’चा दर्जा देण्यात आला आहे. २००७ मध्ये या उद्यानाला ‘हेरिटेज अवॉर्ड’ही देण्यात आला. या पाश्र्वभूमीवर आधुनिकीकरणाच्या प्रस्तावाला ‘मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी’ने मंजुरी दिली. मात्र, ही मंजुरी ‘सशर्त’ असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. ‘रेनेसाँ’ पद्धतीमुळे महत्त्वाचा ठरणारा अक्ष बदलू नये, अशी अट कमिटीने घातली आहे. याबाबत राजीव म्हणाले, ‘सध्याच्या आराखडय़ात हेरिटेज कमिटीच्या अटींनुसार फेरबदल करून, आवश्यकता भासल्यास नवा आराखडा पुन्हा मंजुरीसाठी केंद्रिय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविण्यात येईल. आणि त्यांच्या निर्णयानंतरच तो प्रसिद्ध केला जाईल.’ मात्र, यापूर्वीच्या आराखडय़ाबाबत पालिकेने असेच जाहीर केल्याचे सांगून ‘सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन अ‍ॅक्शन कमिटी’ने थेट केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे धाव घेतली होती. तेव्हा, प्राधिकरणाने ‘अटी सापेक्ष’ मंजुरी दिल्यानंतर आमची या संदर्भातील भूमिका संपल्याचे सांगून सुधारित आराखडा पालिकेकडूनच घेण्याची सूचना केल्याचे कमिटीच्या सदस्यांनी सांगितले.
याबाबत ‘केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणा’शी संपर्क केला असता, सुधारित आराखडा प्राधिकरणाकडे आल्याचे प्राधिकरणाचे ब्रिजकिशोर गुप्ता यांनी सांगितले. मात्र, त्यावरील कार्यवाहीबाबत प्राधिकरणाचे सदस्य-सचिव बी. आर. शर्मा हेच नेमके भाष्य करू शकतील, असे त्यांनी सांगितले. मात्र शर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, राणीच्या बागेतील प्राण्यांची सद्यस्थिती दयनीय असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशा आशयाचे पत्र २००४ मध्ये पालिकेला काही नागरिकांनी दिले होते. त्याचा दाखला देऊन प्राणीसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाची योजना आखल्याचे राजीव यांनी सांगितले. ‘सध्या या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची स्थिती दयनीय आहे, हे खरे असले; तरी थोडक्या परंतु नेमक्या उपाययोजना करून तीत सुधारणा करता येतील. त्याकरिता तब्बल ४३३ कोटी रुपये खर्चून ‘ऐतिहासिक वारशा’चा दर्जा प्राप्त झालेली, सुरेख वास्तूरचनांना सहज सामावून घेणारी १४८ वर्षांत सुंदररित्या उत्क्रांत झालेली परिसंस्था बदलण्याचा अट्टहास कशासाठी?’’ असा सवाल कमिटीने केला आहे. कमिटीच्या आक्षेपाला ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’, ‘सँक्चुअरी एशिया’, ‘क्लीन एअर’, ‘आवाज फाउण्डेशन’ आदी पर्यावरण क्षेत्रातील संस्थांसह नगर रचना क्षेत्रातील ‘अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूट’ तसेच ‘सिटीस्पेस’, ‘ओवल ट्रस्ट’ या संस्थांनीही पाठिंबा दर्शविला आहे. आपली भूमिका स्पष्ट करणारे सविस्तर पत्र; समाजातील मान्यवरांचा पाठिंबा दर्शविणाऱ्या त्यांच्या स्वाक्षऱ्यांसह मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले आहे. (समाप्त)