Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

प्रबोधनकार आणि घटनाकार यांचे नातू एकत्र येणार !
बंधुराज लोणे

 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते प्रबोधनकार ठाकरे आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यामुळेच प्रबोधनकारांचे नातू व शिवसेना कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे आणि डॉ. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येऊ शकतात, असे तर्कशास्त्र भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते सध्या जाहीरपणे मांडत आहेत. दुसरीकडे काँग्रेसवर नाराज असलेले रामदास आठवले यांचे शिवसेनेबरोबर जावे किंवा न जावे याबाबत तळ्यात मळ्यात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आल्याचे चित्र दिसेल, असा आशावाद रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
भारिपचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लीलावती रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. तेव्हापासून या दोन नेत्यांनी एकत्र यावे, असा सूर रिपब्लिकन चळवळीत सुरू झाला आहे. रिपब्लिकन पक्षातील छोटय़ा मोठय़ा गटांचे नेते यासाठी प्रकाश आंबेडकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिपाइं (जयभीम) गटाचे नेते प्रकाश भास्करराव भोसले यांनी तर या दोन बाळासाहेबांनी एकत्र यावे, अशी जाहीर मागणी केली आहे. नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आधीपासूनच शिवसेनेसोबत आहे.
महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ सुरू करणारे प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्री होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहभागी करून घेतले होते. तसेच अनेक प्रश्नांवर या दोन नेत्यांची वैचारिक देवाण-घेवाण होत असे. या पाश्र्वभूमीवर प्रबोधनकाराचे नातू उद्धव ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी मैत्री करावी, अशी मागणी होत आहे. काँग्रेसला समर्थ पर्याय उभारण्याची भाषा प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा केली आहे. बहुजन महासंघाचा त्यांचा प्रयोग याचीच एक सुरूवात होती. मात्र त्याला फारसे यश आले नाही. तरीही प्रकाश आंबेडकर यांनी आपला काँग्रेस विरोध कधीच सोडला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने पाठिंबा देऊ केला होता. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचा पाठिंबा नाकारून स्वबळावर निवडणूक लढविली होती. त्यामुळे शिवसेनेसह आघाडी करून काँग्रेसला प्रकाश आंबेडकर यांनी धडा शिकवावा, असा आग्रह त्यांच्या पक्षातील काही नेतेही धरत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे दुसरे नेते माजी खासदार रामदास आठवले यांच्या प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा आग्रह धरला आहे. आठवले यांनी त्यास स्पष्ट नकार देऊन तिसरी आघाडी स्थापन करणे किंवा पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला जाणे असे पर्याय खुले ठेवले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखविली आणि शिवसेनेने इतिहासातील काही चुकांची कबुली दिली तर राज्यात नवीन राजकीय ताकद निर्माण होईल, असे आंबेडकरी चळवळीच्या भाष्यकारांना वाटत आहे.