Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कॉर्पोरेट टॅक्सीवाल्या..
नमिता देशपांडे

 

रशीदा शेख, नाझनिन शेख, सुप्रिया गायकर, आरती वाघ, पूर्वा पवार या सगळ्याजणी सध्या खूप उत्साहात आहेत. आपल्या आयुष्याला काहीतरी दिशा मिळाल्याचा आनंद त्यांना आहे. कारण.. लवकरच या सगळ्याजणी टॅक्सीचालक म्हणून मुंबईकरांच्या सेवेसाठी तयार राहणार आहेत. या सगळ्याजणींचे प्रशिक्षण नुकतेच संपले आहे. ग्राहकांशी कसे बोलायचे, मुंबईतल्या रस्त्यांची माहिती, तांत्रिक बाबींसंबंधीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. या सगळ्यांबरोबरच कराटेचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले आहे. बारा तासांची नोकरी करण्यासाठी मानसिक तयारीही त्यांनी केली आहे.
या टॅक्सीचालकांच्या टीममधील नाझनीन शेख ही स्वभावाने अत्यंत लाजाळू. प्रश्न विचारला तरी उत्तर द्यायला घाबरते. पण टॅक्सी चालवण्याची मात्र तिला भीती नाही वाटत. टॅक्सी चालवताना या सगळ्या मुलींना युनिफॉर्म वापरणे अपरिहार्य आहे. त्यासाठी नाझनीनने बुरखा बाजूला सारला आहे. घरच्यांचाही तिला विरोध नाही. या टीममधलीच एक, अत्यंत आत्मविश्वासू अशी रशीदा शेख म्हणते, गाडी चालवायला लागल्यावर आपण कधी उपाशी नाही राहणार ही खात्री वाटू लागली आणि त्याचबरोबर कुटुंबालाही अर्थिक हातभार लावू शकू याचे समाधानही वाटू लागले. रशीदाने दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. चालकाची नोकरी करण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही. हे तिने बरोबर हेरले व या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
गेले दोन महिने या मुली टॅक्सी चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. गाडी चालवण्याचा कोणताही पूर्वानुभव नसताना पहिल्यांदा स्टेअरिंग हाती घेतले त्यावेळचा अनुभव कसा होता याबद्दल बोलाताना ‘तो आयुष्यातला खूप मोठा क्षण होता’ असे सगळ्यांनीच एकमुखाने सांगितले. आरती म्हणते, सुरुवातीला तर गाडी झाडावर आदळायची, वेडीवाकडी जायची. तर गाडी सारखी बंद पडायची हा पूर्वाचा अनुभव. पण आता मात्र सरावाने त्या सगळ्यांनीच गाडीवर चांगला ताबा मिळवला आहे. सोमवारपासून यासर्वजणी टॅक्सी चालक म्हणून आपली सेवा सुरु केली आहे. पण केवळ चालक म्हणून न राहता प्रशिक्षक होण्याचा मानस उर्मिला वाघ हिने व्यक्त केला. महिला प्रशिक्षक नसल्याने महिला ड्रायव्हिंग शिकायला पुढे येत नाहीत. त्यामुळे महिला प्रशिक्षकाची खूप आवश्यकता आहे. ही कसर उर्मिलाला भरुन काढायची आहे. कधी एकदा मुंबईच्या रस्त्यांवरुन टॅक्सी चालवतो असे या मुलींना झाले आहे.
‘फॉर शी’ कंपनीच्या मुख्य सल्लागार दिलशाद अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वजणी मुंबईचा इतिहास, रस्ते, विविध ठिकाणची हॉटेल्स, इंग्रजी संभाषण याचे प्रशिक्षण व माहिती घेतली. सुरेश जंगम यांनी या सर्वांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले. रेवती रॉय यांच्या ‘फॉर शी’ या कंपनीतर्फे या मुलींना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या रेवती यांना स्वत:ला गाडी चालवायला आवडते. या आवडीतूनच मार्च २००७ साली त्यांनी या कंपनीची स्थापना केली. या कंपनीतर्फे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींची एक बॅच सध्य मुंबई विमानतळावर टॅक्सीचालकाची भूमिका समर्थपणे पार पाडत आहेत. ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या ‘आधार’ या प्रकल्पाने दोन महिन्यांपूर्वी कंपनीशी ‘टाय अप’ केलं. या टाय अप नंतरची पहिली बॅच सध्या प्रशिक्षण घेत आहे. ‘आधार’च्या प्रकल्प अधिकारी मेधा जोशी या प्रकल्पाबद्दल बोलताना म्हणाल्या की, या वेगळ्या अशा कार्यासाठी काम करताना खूप आनंद मिळतो. या मुली सुरुवातीला खूपच बुजऱ्या होत्या. पण कॉर्पोरेटच्या धर्तीवर प्रशिक्षण घेतल्यावर त्यांच्यात झालेला अमुलाग्र बदल पाहून खूप समाधान वाटते. हे काम आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. मुंबई पालिकेचे उपायुक्त (नियोजन) योगेश महांगडे याबद्दल बोलताना म्हणाले की, रात्रीच्या वेळी प्रवास करताना महिला प्रवाशांना असुरक्षित वाटते. पुरुष टॅक्सी चालकाच्या जागी जर महिला चालक असेल तर कोणत्याही महिलेला रात्री प्रवास करताना असुरक्षित वाटणार नाही याच दृष्टीकोनातून आम्ही महिला टॅक्सीचालकांना प्रोत्साहन देत आहोत.