Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आरटीओचा नवा फंडा
वाहन विका, नंबर स्वत:कडेच ठेवा!
राजीव कुळकर्णी

 

राज्य सरकारला महसूल मिळवून देणाऱ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचा समावेश असून,यंदा अधिक महसूल मिळविण्यासाठी ‘गाडी विका, पण नंबर कायम ठेवा’ असा नवा फंडा या विभागाने काढला आहे.
दीपक कपूर यांनी परिवहन आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विविध योजना राबविण्यास सुरुवात केली. गेल्या मार्च महिन्याच्या अखेरीस गुढीपाडव्यासह सलग तीन सरकारी सुट्टय़ा आल्या होत्या. मार्चअखेरीस सर्वच विभागांमध्ये महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड चालू होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने कपूर यांनी राज्यभरातील आरटीओची सर्व कार्यालये गुढीपाडव्यासह सलग तीन दिवस चालू ठेवण्याचे आदेश दिले. परिणामी या चार दिवसांतच आरटीओला तब्बल सात कोटींचे उत्पन्न मिळाले होते. त्यात ठाणे विभागात एक कोटी, तर मुंबईत ७० लाख रुपयांचा महसूल विभागाला मिळाला. कपूर यांच्या या धोरणाचे सर्वत्र तेव्हा कौतुकही झाले.
आता वाहनधारकांना आपला आवडता क्रमांक कायम ठेवून चारचाकी वा दुचाकी वाहन इतरांना विकता येणे शक्य होणार आहे. प्रचलित नियमानुसार वाहनाची विक्री करताना त्याच्या क्रमांकावर मूळ मालकाचा हक्क राहात नाही. क्रमांकासह वाहनाची विक्री करावी लागते. यासाठी आता नियमांमध्ये सुधारणा करण्याचा विभागाचा प्रस्ताव आहे. यामुळे वाहन विक्री करताना आपला आवडीचा क्रमांक स्वत:कडेच ठेवण्याची मुभा मालकाला मिळू शकेल, तसेच जुने वाहन खरेदी करणाऱ्यालाही आता आपल्या पसंतीचा क्रमांक मिळविता येऊ शकेल. वाहनाचा नंबर कायम ठेवण्यासाठी ठराविक शुल्क आरटीओ आकारणार आहे.
वाहन विक्री करणारा, तसेच घेणाऱ्यासही या योजनेचा लाभ मिळणार असून, येत्या काही दिवसांतच ही योजना कार्यान्वित होईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
एक लाख, ५० हजार वा २५ हजार रुपये भरून वाहनासाठी पसंतीचा क्रमांक मिळविण्याची सध्याची योजना चालूच राहणार असल्याचे राऊत म्हणाले.