Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘एमएमआरडीए’ करणार ४०० दशलक्ष लिटर पाण्याचे नियोजन!
विकास महाडिक

 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने बृहन्मुंबई महापालिकेचे धाबे दणाणले असून मुंबईतील पाणी कपातीचे संकट ३० टक्क्यावर येऊन ठेपले आहे. भविष्यात हा धोका आणखीही वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई ठाण्यातील सर्वच शासकीय यंत्रणानी ‘लहरी’ पावसाचा धसका घेतला आहे. त्यामुळे सर्व स्वायत्त संस्थांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून एमएमआरडीेने आपल्या कार्यक्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई वगळता इतर शहरांना भविष्यात लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे जिल्हयातील सुर्या, शाई आणि काळू धरणांतील पाणी घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या रखडलेल्या प्रकल्पांना पूर्ण अर्थसहाय्य देण्याची तयारी ठेवली आहे. या धरणातून ४०० दशलक्ष लीटर पाणी मिळावे असे नियोजन एमएमआरडीए करणार आहे.
महाराष्ट्रात सात जून नंतर सुरु होणारा पाऊस मागील काही वर्षांपासून लहरी झाला आहे. मुंबई व ठाण्यात पाऊस सुरु होण्यास जुलै महिना उजाडू लागला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सहा तलाव क्षेत्रात पाऊस समाधानकराक होत नसल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट दरवर्षी कोसळू लागले आहे. या पाणी टंचाईची भिती सर्वच स्थानिक संस्थांना भेडसवू लागली असून यात नवी मुंबई पालिकाने मात्र पाच वर्षांपूर्वीच खालापूर तालुक्यातील जलसंपदा खात्याने अर्धवट सोडलेले मोरबे धरण ताब्यात घेतले असून त्यातून आता ३५० दशलक्ष पाणी मिळत आहे. त्यामुळे स्वत:चे धरण असलेल्या पालिका क्षेत्रांचा विचार न करता एमएमआरडीएने इतर शहरांचे पाणी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
एमएमआरडीएने आपल्या हद्दीतील शहरांना भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसवू नये यासाठी सुर्या धरणातील १५ टक्के पाण्याचा वाटा उचलण्याचा करार केला आहे. आहे. त्यासाठी जलसंपदा खात्याला फेब्रवारीमध्ये ९६ कोटी रुपये दिले आहेत. 'ाा धरणाचे काम १९७६ पासून सुरु आहे. पण आर्थिक तुटवडा आणि वनखात्याचे काही प्रश्न यामुळे या धरणाचे काम अद्याप रखडले आहे. आर्थिक मदतीच्या बदल्यात या धरणातून एमएमआरडीएला १०३ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. हे पाणी एमएमआरडीए मिरा भाईदर, वसई, विरार या भागाला देणार आहे.
या धरणातील पाण्याबरोबरच शाई धरणाला संपूर्ण वित्तपुरवठा देऊन हे धरण पूर्णपणे ताब्यात घेण्याचा विचार एमएमआरडीएचा आहे. हा प्रकल्प सहा वर्षांत पूर्ण होईल,असे एमएमआरडीएच्या सहआयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. शाई धरणातून २०० दशलक्ष लीटर पाणी मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या दोन धरणांबरोबरच शाई धरणाजवळील काळू धरणही बांधण्याचा एमएमारडीएचा विचार असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले.
मुंबईपेक्षा जास्त शहरीकरण ठाणे, नवी मुंबई, पेण, पनवेल या भागाचे होत असून तेथील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची गरज विचारात घेऊन ‘एमएमआरडीए’ नियोजन करत आहे. या तीन धरणातून मिळणारे सुमारे ४०० दशलक्ष पाणी ठाणे जिल्हयातील पालघर, डहाणू, विक्रमगड, मिरा-भाईदर,वसई, विरार, ठाणे शहर, या ग्रामीण व शहरी भागांना देण्यात येणार आहे. एमएमआरडीए क्षेत्रासाठी असे अनेक प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले.