Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दहिसर येथील नाल्यावरील अतिक्रमणामुळे स्थानिक रहिवासी हवालदिल
प्रतिनिधी

 

दहिसर येथील एस.व्ही. मार्गावरील अग्रवाल नाल्यावरील दुकांनानी नाल्याचा बहुतांशी भाग व्यापल्याने पावसाळ्यात हा परिसर जलमय होऊ लागला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना या मार्गावरुन प्रवास करताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने रहिवाशांच्या संतापात दिवसेंदिवस भर पडत आहे.
दहिसर येथील एस.व्ही रोडवर अग्रवाल हा नाला आहे. एमएमआरडीएने येथील रस्त्याचे रुंदीकरण करताना नाल्यावरील आठ दुकानांना गोरेगाव येथे पर्यायी जागा देऊन त्यांचे पुर्नवसन केले. मात्र या नाल्यावरील दुकानदार ही जागा सोडून इतरत्र जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे १८ फुट रुंद असलेला नाला चार फुट इतका अरुंद झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नसल्याने हा परिसर नेहमी जलमय होत आहे. येथील छत्रपती सेवा मंडळाने या नाल्यावरील अतिक्रमणोविरोधात उच्च न्यायालायात दाद मागितली.
न्यायालयानेही येथील अतिक्रमणे चार आठवडय़ात हटवावी, असे आदेश जारी केले. मात्र पालिकेचे अधिकारी या आदेशाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे असा आरोप संघाचे अध्यक्ष केरुरे राजाराम यांनी केला आहे.
या दुकानदारांना पूर्वी हटवण्यास पुढाकार घेणाऱ्या एका राजकीय पदाधिकाऱ्यांचा सध्या मात्र या दुकानदारांना आशीर्वाद आहे, असे बोलले जाते.
या नाल्यावरील अतिक्रमणे लवकर न हटवल्यास या मार्गावरुन वाहने व पादचाऱ्यांना जाणे मुश्कील होणार आहे. या भागात दोन शाळा,आणि एक पेट्रोल पंप असल्याने वर्दळ असते. रस्ता नेहमीच जलमय होत असल्याने या मार्गावरुन जाताना नागरिकांना कसरत करावी लागत आहेत. त्यामुळे ही दुकाने येथून लवकर हटवून पावसाचे पाणी नाल्यामध्ये जाण्यास मार्ग करुन द्यावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.