Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

एसबीआय समूहाने दिला ३३ टक्के महिलांना न्याय!
प्रतिनिधी

 

यंदाच्या आर्थिक वर्षांतील बँकिंग क्षेत्रामधील पहिल्या कर्मचारी भरतीचा मान स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांना मिळाला असून, कारकून श्रेणीतील पदांच्या भरतीमध्ये यंदा बँकेने प्रथमच ३३ टक्क्यांहून अधिक तरुणींची निवड केली आहे.
एसबीआयच्या स्टेट बँक ऑफ त्रावणकोर/ हैदराबाद/ म्हैसूर/ पतियाळा यासारख्या सहा सहयोगी बँकांमधील भरतीसाठी गेल्या मार्च महिन्यात लेखी परीक्षा घेण्यात आली. सहा हजार जागांसाठी देशभरातील सुमारे नऊ लाख जणांनी अर्ज केले. लेखी परीक्षेत यापैकी १६ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले. देशभरातील विविध केंद्रांवर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर बुधवारी बँकेने अंतिम निकाल जाहीर केला. याहीवेळी अनेक उच्चविद्याविभूषित तरुण-तरुणी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, एकंदर ६३९२ जणांची निवड बँकेने केली आहे. यातील २१०० महिला असल्याचे एसबीआयच्या भरती व पदोन्नती विभागाचे महाव्यवस्थापक श्रीराम लेले यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक कधी संमत होईल ते सांगणे कठीण असले, तरी एसबीआयशी संलग्न बँकांनी मात्र भरतीमध्ये यंदा ३३ टक्क्यांहून अधिक महिलांना न्याय दिल्याचे स्पष्ट होते.