Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेत अधिक पेरण्या
दमदार पावसाची प्रतीक्षा
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी
जिल्ह्य़ात २ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर (६४.२८ टक्के) खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्या, तरी पावसाअभावी काही तालुक्यांत बऱ्यापैकी, तर काही तालुक्यांत तुरळक पेरण्या असे विरोधाभासी चित्र आहे. बऱ्यापैकी पेरणी झालेल्या तालुक्यांतही सर्व ठिकाणी सारख्या पेरण्या नाहीत. आणखी पावसाची आवश्यकता आहे.

क्रीडा अधिकाऱ्याच्या कार्यालयास टाळे ठोकले
दहा पदाधिकाऱ्यांना अटक व सुटका
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी गड्डमवार हटाव या मागणीसाठी क्रीडा संघटनांच्या पदधिकाऱ्यांनी आज त्यांच्या कार्यालयास कुलूप ठोकले. कोतवाली पोलिसांनी विविध संघटनांच्या दहा पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आंदोलनानंतर अटक करून नंतर लगेच सुटका केली.

‘लोकसत्ता गाथा ज्ञानाची’ स्पर्धेचे संगमनेरला बक्षीस वितरण
संगमनेर, १३ जुलै/वार्ताहर

यशस्वी होण्यासाठी जीवनात शिस्त असणे आवश्यक असते. कोणत्याही स्पर्धेत शिस्तबद्ध प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन येथील संगम सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भानुदास डेरे यांनी केले.
‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘गाथा ज्ञानाची’ कात्रण स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज येथील डॉ. बी. जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. डेरे बोलत होते. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, सहायक व्यवस्थापक कांतिलाल पुरोहित, वितरण अधिकारी शंकर पानसरे, संगमनेरचे वितरक ब. वि. कुलकर्णी, गणोऱ्याचे वितरक रमेश दातीर, घुलेवाडीचे वितरक बाळासाहेब मंडलिक, शाळेचे प्राचार्य व्ही. के. आव्हाड, प्राचार्या सुषमा हिवाळे, प्रशांत धाडीवाल आदी उपस्थित होते.

सामाजिक जाणिवा जपणारा अभिनेता हरपला..
नगरकरांतर्फे भावपूर्ण आदरांजली

नगर, १३ जुलै/प्रतिनिधी

‘जबरदस्त!’
अभिनयातच मुरलेल्यांपासून ते अभिनयाचा ओ की ठो कळत नसणाऱ्यांपर्यंत सर्वाचीच निळू फुले या थोर अभिनेत्याबद्दल ही एकच प्रतिक्रिया येते. भल्या सकाळी मैदानात फिरायला येणाऱ्यांमध्येसुद्धा चर्चा होती ती निळूभाऊंच्या अभिनयगुणांचीच! चित्रपटसृष्टीच्या झगमगाटी वातावरणातही जपलेली सामाजिक बांधिलकी हे निळूभाऊंचे एक वेगळे वैशिष्टय़. अभिनेते अनिल क्षीरसागर यांनी सांगितले की, आजच्या पिढीला याचे मोल समजणार नाही, पण समाजाबद्दल अतीव कणव असणारा हा एक विलक्षण कलावंत होता. ऐन शिखरावर असतानासुद्धा त्यांनी आपल्या लोकप्रियतेचा उपयोग सामाजिक कृतज्ञता निधीसाठी केला.

मंत्री विखे यांच्या उपस्थितीत १६ला प्राथमिक शिक्षण विभागाची बैठक
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १६) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. सर्व शिक्षा अभियानातून राबविल्या जाणाऱ्या ४०४ आदर्श शाळांच्या (मॉडेल स्कूल) पथदर्शी प्रकल्पाची विखे या वेळी अधिकृतपणे घोषणा करतील. या प्रकल्पास नुकतीच केंद्र सरकारने मंजुरी दिली.

पंधाडे, लोंढे यांच्या अपात्रतेच्या अर्जावर आज सुनावणी
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी

बंडखोरी करणाऱ्या अंबादास पंधाडे व सुभाष लोंढे या दोन नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासंबंधी शिवसेनेने विभागीय आयुक्तांकडे (नाशिक) केलेल्या अर्जाची उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. सेनेचा हा तक्रारअर्ज दाखल करून घ्यायचा किंवा नाही या मुद्दय़ावर ही सुनावणी होईल. सेनेच्या गटनेत्या अनिता राठोड यांना यासाठी उद्या दुपारी ३ वाजता नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.

गुन्हेगारीत श्रीगोंद्याची जिल्ह्य़ात आघाडी
५० वर्षे आहे तेच पोलीसबळ
संजय काटे, श्रीगोंदे, १३ जुलै
तालुक्यातील संघटित गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागली असून, त्यासाठी नवीन तंत्र वापरले जाते. गेल्या सहा महिन्यांत तालुक्यात २५० गंभीर, तर ५७९ अदखलपात्र गुन्हे दाखल झाले. अपुऱ्या पोलीस बळामुळे गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढ झाली नाही.

व्यापारी संकुलास विखेंचे नाव देण्याचा ठराव मंजूर
पिपाडा यांचा विरोध
राहाता, १३ जुलै/वार्ताहर
पालिकेच्या चितळी रस्त्याकडेला असलेल्या व्यापारी संकुलास शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव देण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाने आज बहुमताने मंजूर केला. मात्र, विरोधी गटाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी संकुलास विखेंचे नाव देण्यास विरोध दर्शविला.

बनावट सह्य़ा कशासाठी?
शिक्षण समितीच्या सभेस उपस्थित नसताना हजर असल्याच्या सह्य़ा दोन सदस्यांनी केल्या. त्यापूर्वीही जलसंधारण समितीच्या सभेत एका पदाधिकाऱ्याने गैरहजेरीवर व्हाईटनर लावून उपस्थितीच्या सह्य़ा केल्या. ग्रामपंचायत आणि सहकारी साखर कारखान्याच्या सभांत सर्रासपणे घडणारे हे गैरप्रकार आता जिल्हा परिषदेत घडत आहेत. जिल्हा परिषदेचा दर्जा कसा घसरत चालला, याचे दर्शन घडविणाऱ्या या घटना आहेत. सदस्य, पदाधिकाऱ्यांच्या कारभारातूनच जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढतो.

पारनेर, शेवगाव, अकोल्याचे भाकपचे उमेदवार जाहीर
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर, शेवगाव व अकोले मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. कॉम्रेड नारायणराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली किसान भवनात ही बैठक झाली. बबनराव गंधाक्ते (पारनेर), सुभाष लांडे (शेवगाव), जयवंतराव देशमुख (अकोले) हे पक्षाचे उमेदवार असतील. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारावी, दारिद्र्यरेषेचा फेरसव्‍‌र्हे व्हावा या मागण्यांसाठी ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. शिपायापासून राष्ट्रपतीपर्यंत सर्वाना देशात पेन्शन मिळते. मात्र, जनतेचे भरण पोषण करणारा शेतकरी पेन्शनपासून वंचित आहे. त्याला ५८ वर्षे वयानंतर १ हजार रुपये पेन्शन मिळावी, या मागणीसाठी पक्षातर्फे देशभर निदर्शने केली जाणार आहेत. बैठकीला बाळासाहेब नागवडे, का. वा. शिरसाठ, आनंदा लांडगे, बाबा आरगडे, स्मिता पानसरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अकरा रस्त्यांसाठी निधी देण्याची कोल्हेंची मागणी
कोपरगाव, १३ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या प्रमुख ११ विविध रस्त्यांच्या ३ कोटी २८ लाखांच्या अंदाजित खर्चासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे यांनी ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते, तसेच पालकमंत्री दिलीप वळसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कोपरगाव ते रेल्वे स्टेशन ते खिर्डी गणेश रस्ता , वारी ते सडे, प्रजिमा ८ ते धोत्रे , वाडी ते खोपडी, तिळवणी ते आपेगाव , प्रजिमा २ ते कोल्हेवस्ती , लौकी ते दत्तवाडी धोत्रे , धारणगाव ते ब्राह्मणगाव , सोनारी ते टाकळी , डाऊच ते देर्डे चांदवड, धामोरी ते महालखेडा या ११ रस्त्यांची (४१ किलोमीटर लांबी) ३ कोटी २८ लाख रुपये अंदाजित खर्चाचे खडीकरण, डांबरीकरण करण्यासाठी राज्य रस्ते वाहतूक निधीतून किंवा अन्य योजनेतून निधी उपलब्ध करून सर्वेक्षण करून निविदा काढण्यास, कार्यवाही राबवण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी विनंती श्री. कोल्हे यांनी केली.

काकडी विमानतळासाठी आज शेतकऱ्यांचे करारनामे
कोपरगाव, १३ जुलै/वार्ताहर

तालुक्यात काकडी येथे होणाऱ्या विमानतळाच्या भूसंपादनाचे करारनामे येथील व्यापारी धर्मशाळेत जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन, प्रांताधिकारी साधना सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. १४) ११ ते ५ या वेळेत करून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रभारी तहसीलदार राजेंद्र नवले यांनी दिली.या वेळी काकडी विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहणार असून, ज्या शेतकऱ्यांनी आजअखेपर्यंत संमतीपत्रे भरून दिली नाहीत, असे सर्व शेतकरी उद्या (दि. १४) रोजी आपले करारनामे करू शकतील. करारनामे पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीनंतर ८० टक्के रक्कम बँकखात्यात किंवा धनादेशाद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. उर्वरित २० टक्के रक्कम सर्व पूर्तता झाल्यानंतर अदा करण्यात येईल, असे तहसीलदार नवले म्हणाले.

सावळीविहीरसाठी तीन उमेदवार रिंगणात
राहाता, १३ जुलै/वार्ताहर
राहाता पंचायत समितीच्या सावळीविहीर गणातील एका जागेसाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल होते. आज छाननीमध्ये दोन अर्ज अवैध झाल्याने केवळ तीन उमेदवारी अर्ज राहिले. शनिवारी (दि. १८) अर्जमाघारीच्या दिवशी या पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.पंचायत समितीच्या सावळीविहीर गणातील सदस्य साहेबराव बर्डे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. अनुसूचित जमातीसाठी ही जागा राखीव असल्याने त्यासाठी सूर्यभान माळी, लक्ष्मीबाई बर्डे, सोना सोनवणे, पोपट माळी, राजेंद्र जाधव या पाचजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज छाननीमध्ये पोपट माळी व राजेंद्र राठोड यांचे अर्ज अवैध ठरले. पंचायत समितीवर शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाचे वर्चस्व आहे.

एकलव्य आदिवासी महासंघाचा शुक्रवारी मोर्चा
राहाता, १३ जुलै/वार्ताहर
जिल्हा भिल्ल विकास आराखडय़ास त्वरित मंजुरी देऊन भिल्ल समाजास ५० कोटींचा स्वतंत्र निधी द्यावा, या मागणीसाठी श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर एकलव्य आदिवासी महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) ‘डबल दणका’ मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे यांनी दिली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवणनाथ जाधव व राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास माळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ज्ञानेश्वर अहिरे यांनी केले आहे.

खासगी पशुवैद्यकांचे काम बंद आंदोलन
सोनई, १३ जुलै/वार्ताहर

सरकारने खासगी पशुसेवा करणाऱ्या व सरकारी सेवेत असणाऱ्या पदविकाधारकांवर बंदी घालण्याचा आदेश दिल्याच्या निषेधार्थ नेवासे तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिक संघटनेने काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले आहे. येथील कृषी साधना दूध व्यावसायिक संस्थेच्या सभागृहात तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली. बैठकीत सरकारने काढलेल्या आदेशाचा निषेध करण्यात आला. आदेश मागे घेईपर्यंत काम बंद आंदोलन पुकारण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शेटे, उपाध्यक्ष डॉ. संतोष लांडे व सचिव डॉ. अभिजीत दरंदले यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय चिकित्सालयासाठी एक कोटी खर्चाचा प्रस्ताव - ससाणे
श्रीरामपूर, १३ जुलै/प्रतिनिधी
शिरसगाव शिवारात पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बांधण्यात येणार असून, इमारत बांधकामासाठी १ क कोटी ४७ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती आमदार जयंत ससाणे यांनी दिली. तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात अद्ययावत अशी यंत्रसामग्री बसविण्यात येणार आहे. एक्स-रे मशीन तसेच पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

कामगाराच्या अपघाती मृत्यूबद्दल नुकसानभरपाई देण्याचा आदेश
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी
कंपनीत काम करीत असताना अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराच्या नातेवाईकास ३ लाख ६५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला. न्यायाधीश ए. ए. खान यांनी हा निकाल दिला. फिर्यादीतर्फे वकील राजेश कातोरे यांनी काम पाहिले. त्यांना शहाजी शेडाळे यांनी सहकार्य केले. नगर येथील दुर्गादास मच्छिंद्र खिरोडे हे प्रोफेशनल अ‍ॅग्रोटेक (आंबी तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे) कंपनीत कामास होते. दि. ८ मे २००७ रोजी कंपनीच्या शेडच्या छतावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. खिरोडे यांच्या नातेवाईकांनी कंपनीविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. खिरोडे यांच्या नातेवाईकास ३ लाख ६५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला.

अंगणवाडीसेविकांचा दि. २८ला मोर्चा
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील अंगणवाडीसेविका व मदतनीस २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेवर मोर्चा नेणार आहेत, अशी माहिती कॉम्रेड सुरेश गवळी यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अल्प मानधन मिळते. तेदेखील ३-४ महिने मिळत नाही. यामुळे गरीब महिलांची कुचंबणा होते. सरकारने १ एप्रिल ०८ रोजी मंजूर केलेली ५०० रुपये मानधनवाढही अद्याप मिळालेली नाही, असे ते म्हणाले.

अभियंता कॉलनीत ३० हजारांची घरफोडी
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी
बंगल्याच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरटय़ांनी ३० हजारांचा ऐवज लांबविला. औरंगाबाद रस्त्यावरील अभियंता कॉलनीत काल रात्री ही चोरी झाली. तोफखाना ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. वैभव नवनाथ सुरवसे (३० वर्षे, प्लॉट नं. १०, अभियंता कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. सुरवसे कुटुंबीय रात्री झोपले असताना चोरटय़ांनी खिडकीचे ग्रील हत्याराने कापून आत प्रवेश केला व कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. तपास उपनिरीक्षक अहिरराव करीत आहेत.

नामदेव वाबळे यांचे निधन
नगर, १३ जुलै/प्रतिनिधी

नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथील नामदेव तुकाराम वाबळे यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्यामागे चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सीताबाई शेटे यांचे वृद्धापकाळाने निधन
कोपरगाव, १३ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील संवत्सर परिसरातील रामवाडी येथील सीताबाई मनाजी शेटे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. संजीवनी कारखान्याच्या संचालिका अनिता शेटे यांच्या त्या सासू होत.