Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

क्रांती दिनापासून भाजपचे राज्यभर जेलभरो
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

राज्यातील आघाडी सरकारविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून निवडणूक प्रचाराचा बिगूल फुंकण्यासाठी येत्या ९ ऑगस्टला राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे या आंदोलनाची घोषणा केली. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्टला राज्याच्या सर्व भागात खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन करण्यात येईल.

कारवाईच्या बडग्यानंतरही ‘मार्ड’चा संप सुरूच
* रुग्णांचे प्रचंड हाल ल्ल मेयोतील डॉक्टरांनी वसतिगृह केले रिकामे

नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

निवासी डॉक्टरांचा संप मोडून काढण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असली तरी डॉक्टरांच्या संपाचा आज सहावा दिवस असून रुग्णांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, मेयोतील संपकर्त्यां डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारून प्रशासनाने निवासी डॉक्टरांना वसतिगृहे रिकामी करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी दुपारनंतर वसतिगृहे रिकामी केली.

नागरिकांचा तीव्र विरोध
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

निवासी डॉक्टरांच्या संपाला सामान्य नागरिकांसोबतच विविध सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. शिष्यवृत्ती म्हणजे वेतन नव्हे. शिष्यवृत्तीवाढीसाठी रुग्णांना वेठीस धरून संप पुकारणे योग्य नाही, अशा डॉक्टरांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सीटीझन फोरमचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी केली आहे. शिष्यवृत्ती वाढीसाठी अनेक मार्ग उपलब्ध असताना संपावर जाणे योग्य नव्हे.

१६ लाख शिक्षकांचा आज संप
प्रश्नध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टरांचाही सहभाग
सहाव्या वेतन आयोगाची मागणी
नागपूर, १३ जुलै/प्रतिनिधी
मार्डच्या संपाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असतानाच उद्या, सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्यातील १६ लाख शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार आहेत. आरोग्य खात्याचे डॉक्टरही संपात सहभागी होणार असल्याने मार्डच्या संपामुळे पूर्वीच खिळखिळ्या झालेल्या रुग्णसेवेवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे.

महापालिका बरखास्त करण्याची विरोधी पक्षाची मागणी
आर्थिक दिवाळखोरीचा आरोप

नागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी

महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली असल्याने राज्य सरकाराने यात लक्ष घालून महापालिका त्वरित बरखास्त करावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.
खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे नवीन कामे मंजूर करणे महापालिकेने थांबवले आहे. दुसरीकडे आयुक्त महापालिकेच्या बचत खात्यामध्ये ८० कोटी रुपये असल्याचे सभागृहाला सांगतात. यामुळे एकूणच महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.

उद्योगांना नको शून्य भारनियमन
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

वीज महावितरण कंपनीने अमरावती आणि नागपूरसह राज्यातील अन्य शहरांमध्ये शून्य भारनियमनाची योजना राबवण्यासाठी वीज आयोगाकडे याचिका दाखल केली असली तरी, त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुरवठा शुल्कामुळे नागपुरातील उद्योजकांना ही योजना डोईजड झाली आहे. विदर्भातील उद्योग संकटात असताना आणि शून्य भारनियमनाचे मॉडेल उद्योगांना उपयोगाचे नसताना हा भार आम्ही का उचलायचा, असा प्रश्न विदर्भ उद्योग संघटनेने (व्हिआयए) उपस्थित केला आहे.

त्रिदिवसीय वसंतराव देशपांडे संगीत समारोह ३० जुलैपासून
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

सुप्रसिद्ध गायक आणि नट डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान नागपुरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत समारोहामुळे नागपूरकर रसिकांना दर्जेदार संगीताची मेजवानी मिळणार आहे. दरवर्षी या समारोहाचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत या समारोहात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांनी कार्यक्रम सादर केले आहेत.

सामाजिक जाणीव अंतर्मनात कायम ठेवणारा कलावंत
निळू फुले यांच्या निधनाबद्दल विदर्भात शोक
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी
गेली ४० वर्षे मराठी-हिंदी चित्रपट आणि नाटय़ सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कलावंत निळू फुले यांच्या निधनाबद्दल वैदर्भीय नाटय़-सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे. कलेच्या क्षेत्रात वावरतानाही सामाजिक जाणीव अंतर्मनात कायम ठेवणारा कलावंत निघून गेला , अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

नागपुरातील उपेक्षितांसाठीही निळूभाऊंचा लढा
नागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी

कसदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान पटकावणाऱ्या निळू फुले यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही मोठे आहे. नागपूर येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे, अशी त्यांची भावना होती. ती त्यांनी वेळोवेळी येथे झालेल्या आंदोलनाच्यानिमित्ताने व्यक्त केली होती. निळूभाऊंच्या सानिध्यात आलेल्या नागपुरातील अनेकांना आज त्यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आणि निळूभाऊंसोबत आंदोलनाच्या निमित्ताने घालवलेल्या दिवसांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

सामाजिक बांधिलकीतून राजकारण
जयकुमार चर्जन

शेतकरी संघटनेसारख्या चळवळीतून मिळालेला वैचारिक वारसा आणि शिवसेनेच्या मुशीतून बच्चू कडू तयार झाले. अभिनव आंदोलनांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. गाडगेबाबांची कर्मभूमी नागरवाडी येथे केलेल्या ‘अन्नत्याग’ व ‘प्रहार की गांधीगिरी अमेठी में’ यासारख्या अभिनव आंदोलनामुळे आमदार बच्चू कडू राज्याच्या राजकीय क्षितिजावर चर्चिले गेले. शासन व प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी कधी अर्धदफन आंदोलन तर पाण्याच्या टाकीवर चढून ‘वीरूगिरी’ सारखे ‘शोले’ आंदोलन केले. या सर्व आंदोलनातून ते सर्वसामान्यांमध्ये विशेष कुतूहलाचा विषय ठरले.

इंटरनेटमुळे जुन्या पुस्तकांचा व्यवसाय चौपट
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

एरवी कुठे न मिळणारी देशविदेशातील मासिके, वैद्यकीय, अभियांत्रिकी व स्पर्धा परीक्षांसंबंधीची पुस्तके महाल व सीताबर्डी येथील जुन्या पुस्तकांच्या बाजारात हमखास मिळत. पण हल्ली इंटनेटवरच सर्व पुस्तकांची माहिती मिळत असल्यामुळे जुन्या पुस्तकांच्या बाजारात पुस्तके व मासिके घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नरेंद्र भिसे हा युवक गेल्या अनेक वर्षापासून जुनी पुस्तके व मासिकांची विक्री करीत आहे.

जलसाठय़ांमध्ये अल्पशी वाढ
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात चांगला पाऊस झाल्याने जलसाठय़ात अल्पशी वाढ झाली आहे. नागपूर विभागातील मोठय़ा व मध्यम प्रकल्पातील साठय़ात वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी, पाणी टंचाईचे संकट कायम आहे. अनेक प्रकल्पांमध्ये अजूनही १० टक्क्यांहून कमी जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या काही महिन्यात नागपूर विभागातील जलसाठय़ांच्या पातळीत कमालीची घट झाली होती.

डॉक्टरांच्या संपाबाबत पर्यायी उपाययोजनांची माहिती मागितली
नागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर रुग्णांच्या उपचारासाठी काय पर्यायी उपाययोजना केल्या आहेत याबाबत एका आठवडय़ात माहिती द्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. आपल्या मागण्यांसाठी संपावर जाऊन रुग्णांचे हाल करणाऱ्या निवासी डॉक्टरांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका ‘जनमंच’ या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली आहे. तिच्या सुनावणीदरम्यान न्या. सिन्हा व न्या. भंगाळे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.

बचतीमुळेच भारतावर मंदीचा अल्प परिणाम -पटवर्धन
नागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी

संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात असताना भारतावर मात्र, त्याचा अल्प परिणाम झाला आहे. बचतीच्या पारंपरिक पद्धतीमुळे भारताला त्याचा म्हणावा तेवढा फटका बसला नाही, असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख उदयराव पटवर्धन यांनी केले.भारतीय मजदूर संघाचा मानव संसाधन विभाग आणि भारतीय श्रम शोध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप आज झाला. रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय समितीचे पदाधिकारी श्रीकांत धारप होते.

शिबिरात ६०० नागरिकांची आरोग्य तपासणी
मुळक प्रतिष्ठानचा उपक्रम
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी
आमदार राजेंद्र मुळक लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे छावणी येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र मुळक यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक प्रशांत चोपडा होते.आमदार मुळक यांनी त्यांच्या भाषणात प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी वॉर्डातील दोन गरजू महिलांना आमदार मुळक यांच्या हस्ते शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. डॉ. युवराज काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य सल्ला दिला. या शिबिराचा लाभ परिसरातील ६०० नागरिकांनी घेतला. तपासणीनंतर नि:शुल्क औषधे देण्यात आली. नेत्र तपासणीत ८० नागरिकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे गरजेचे आढळून आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.याप्रसंगी छावणी एकता मंचचे कृष्णा मरचट्टीवार, शंकर मयापूरवार, जगन्ना करनोवार, लक्ष्मण मरचट्टीवार, सूर्यनारायण डोमकुडवार, जगन्नाथ करनोवार, शांताराम काटपवार, सुरेश पोलकमवार, गोपाल संगेवार, सत्यम कोटूरवार, रजत गटलेवार, कार्तिक सिंगुवार, चकन्ना डोमकुडवार, ज्योती काटपवार, अर्चना मरचट्टीवार, श्रद्धा करनेवार, वैशाली मरचट्टीवार, मोहनी करनेवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तिरुपती मारचेट्टीवार यांनी केले. नितीन कर्णेवार यांनी आभार मानले.

तरुणीला फसवून पावणे दोन लाख पळवले
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी
बँकेत रक्कम भरावयास आलेल्या तरुणीला फसवून भामटय़ाने दीड लाखाहून अधिक रक्कम लांबवल्याची घटना स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत शनिवारी सकाळी घडली.
शैलजा रामाराव (रा. मोतीबाग रेल्वे वसाहत) ही तरुणी शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजताच्या सुमारास एक लाख सत्तर हजार रुपये स्टेट बँकेच्या किंग्जवेवरील मुख्य शाखेत भरावयास गेली. पॅन कार्ड आवश्यक असल्याचे रोखपालाने सांगितल्याने ती तरुणी गोंधळली. तिच्याजवळ असलेल्या एका इसमाने ती रक्कम हातात घेऊन ‘तू पॅन कार्ड घेऊन ये, मी रक्कम भरतो’असे म्हणाला. त्या तरुणीने ती रक्कम रोखपालाजवळ दिली आणि फोन करण्यास निघून गेली. त्या व्यक्तिने रोखपालाला ती रक्कम मागितली. तरुणीसोबत आल्याचे समजून रोखपालाने ती रक्कम त्याला दिली. तो इसम रक्कम घेऊन निघून गेला. काहीवेळानंतर ती तरुणी बँकेत परत आली. तिने रोखपालाला रक्कम मागतिली. ‘ती व्यक्ती तुमच्यासोबत असल्याचे समजून ती रक्कम त्याच्याजवळ दिली’ असे रोखपालाने सांगितल्यावर त्या तरुणीने कपाळावर हात मारून घेतला. त्या तरुणीने सोमवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

बँक ऑफ महाराष्ट्र निमखेडा शाखेतर्फे शेतकरी मेळावा
नागपूर, १३ जुलै/प्रतिनिधी
बँक ऑफ महाराष्ट्र निमखेडा (तारसा) शाखेतर्फे निमखेडा येथे नुकताच शेतकरी मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निमखेडाचे सरपंच सुरेश हर्राम व प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक अभय पानबुडे उपस्थित होते. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक दिलीप मौंदेकर यांनी शाखेच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली व उपस्थित शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन अधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. सरपंच सुरेश हर्राम यांनी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले व एटीएम आणि लॉकरची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अभय पानबुडे यांनी शेतकऱ्यांच्या विविध तक्रारीचे निवारण केले. अरुण केळझरे यांनी, वर्ष २००७-०८ मध्ये शाखेने उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील ट्राफी शाखेला प्रश्नप्त करून देण्यात सर्व कर्मचारी व ग्राहकांचे योगदान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन गणवीर यांनी केले. अरुण केळझरे यांनी आभार मानले.

विसूभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलय काव्यात’ सादर
नागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी
सी.पी. अ‍ॅण्ड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रविनगर शाखेच्या सुवर्ण महोत्सवाचा एक भाग म्हणून शाळेच्या प्रश्नंगणात विसूभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलय काव्यात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी सी.पी. अ‍ॅण्ड बेरार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रविनगर शाखेचे मुख्याध्यापक दीपक गोखले प्रमुख्याने उपस्थित होते. बापट यांनी ओघवत्या वाणीने आणि खुमासदार शैलीने काव्याचे विविध प्रकार सादर केले. त्यांना तबल्यावर लाडसे यांनी साथसंगत केली. बालगीतांपासून विडंबन काव्यांपर्यंत कुटुंबातील सर्वासाठीच कविता सादर करून ‘कुटुंब रंगलय काव्यात’ हे नाव त्यांनी सार्थ केले. प्रश्नस्ताविक खरे यांनी केले तर, क्षीरसागर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

यशस्विनी अभियानतर्फे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
नागपूर, १३ जुलै/प्रतिनिधी
यशस्विनी अभियानतर्फे महिलांच्या सक्षमीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सुरू असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या रवीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले. याप्रसंगी राज्यस्तरीय समन्वयक प्रगती पाटील, विभागीय समन्वयक शैल जैमिनी, सहसमन्वयक शकुंतला राऊत, शालिनी सव्वालाखे, स्नेहल दुल्लरवार आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन उषा पाटील यांनी केले. नंदा चौधरी यांनी आभार मानले.

पल्सरच्या धडकेने पादचारी ठार
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी
वेगात आलेल्या पल्सर मोटारसायकलच्या धडकेने पादचारी ठार झाला. अमरावती मार्गावर वाडी येथे रविवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अंदाजे ४५ वर्षाचा इसम रस्ता ओलांडत असताना वेगात आलेल्या एका पल्सर मोटारसायकलने त्याला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या इसमास मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या अनोळखी मोटारसायकल चालकाविरुद्ध वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मरण पावलेल्या इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही.

खंडणी मागण्याची सिनेस्टाईल घटना
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी
ग्राहकांना धमकावत बार मालकाला खंडणी मागितल्याची सिनेस्टाईल घटना सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील चंचल बिअर बारमध्ये रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. नारायण आयलानी (रा़ झेंडा चौक, चिटणीसपुरा) हा बारमध्ये बसला असताना आरोपी अब्दुल आरीफ अब्दुल रशीद (रा. गांधीबाग) याने बुटाच्या मोज्यातून मोठा चाकू काढून बारमधील ग्राहकांना धमकावत बाहेर जाण्याची धमकी दिली. काऊंटरवर चाकू ठेवून त्याने बार मालकास एक हजार रुपये मागितले. ते न दिल्यास जिवानिशी ठार मारण्याची तसेच बिअर बारमध्ये तोडफोड करण्याची धमकी दिली. अश्लील शिवीगाळ करीत तो निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस तेथे पोहचले. त्यांनी धावपळ करून आरोपीला अटक केली.

दारुडय़ांच्या भांडणात एक जखमी
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

दोघा दारुडय़ांनी एका तरुणास दगड-विटांनी मारून जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी पावणेपाच वाजताच्या सुमारास मेयो रुग्णालय चौकात घडली. मेयो चौकातील अमित बिअर बारसमोर तिघा दारुडय़ांचे भांडण सुरू होते. अश्लील शिवीगाळ करीत ‘मेरे जेबमे हात डालकर ५०० की नोट निकालने की कोशीश की’ असे मोठमोठय़ाने म्हणत ते आपसात भांडण होते. त्या पैकी दोघा दारुडय़ांनी तिसऱ्याला मारहाण सुरू केली. शेजारीच पडलेल्या दगड-विटांनी त्याच्या डोक्यावर मारले. तो तरुण रक्तबंबाळ झाला नि खाली पडला. ते पाहून दोघे दारुडे पळून गेले. हे समजताच गणेशपेठ पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी जखमी तरुणास मेयो रुग्णालयात दाखल केले. जखमी तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

झोपडपट्टीवासीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या झोपडपट्टीवासीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागातर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
दक्षिण नागपुरातील गौसीया प्लॉट, निराला प्लॉट, अतकरे ले-आऊट, ताजबाग झोपडपट्टी आदी भागातील झोपडय़ांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी त्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी विभागाचे अध्यक्ष अशफाक अली व लतीफ शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली. शिष्टमंडळात रेहाना खान, इमरान खान, नाहिद शेख, मोहम्मद इशाक, शाहिस्ता परवीन, गीता बर्वे, शेख मजीद, शेख रफिक, शंकर मालाधरी, विजय मेश्राम आणि अयुब खान आदींचा समावेश होता.

‘साठेखोर व्यापाऱ्यांमुळे तुरडाळीचे दर गगनाला’
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ३० ते ४० रुपये किलो असणारी तुरदाळ देशातील मुठभर साठेखोर व्यापाऱ्यांनी ८५ रुपये किलो दरावर नेली आहे, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. या सर्वाना राजकीय संरक्षण असून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर, येत्या आठवडय़ात तुर डाळीचे भाव १०० रुपये किलोच्या वर जाणार, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे.भारतात डाळीचे उत्पादन व साठा ४० लाख टनावर असतानासुद्धा तुटवडा असल्याची अफवा पसरवून साठेखोर गरिबांची लूट करत आहे. यावर्षी मलेशियासह डाळ उत्पादन करणाऱ्या सर्वच आशियाई देशांमध्ये तुरडाळीचे उत्पादन चांगले झाले आहे. सरकार जोपर्यंत साठेखोर कंपन्यांविरुद्ध व व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार नाही तोपर्यंत तुरडाळीचे दर कमी होणार नाही. महाराष्ट्र सरकारने आंध्र व तामीळनाडू सरकारप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तुरडाळ दहा रुपये दराने देण्याची तात्काळ व्यवस्था करावी. येत्या पंधरवाडय़ात तुरडाळीचे दर कमी करण्यात आले नाही व साठेखोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही तर, जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.

मजदूर संघाने विचारधारेला अनुसरून कार्य करावे झ्र्रेड्डी
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी
भारतीय मजदूर संघाने विचारधारेला अनुसरून कार्य करावे, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री लक्ष्मा रेड्डी यांनी केले. डॉ. हेड्गेवार स्मृती भवनात आयोजित तीन दिवसीय अखिल भारतीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रमशोध कल्याण मंडळाचे विश्वस्त व महाराष्ट्र भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत धारप व प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे पश्चिम क्षेत्र प्रभारी एस.एन. देशपांडे, विदर्भ प्रदेशचे महामंत्री रमेश पाटील उपस्थित होते. जागतिकीकरणामुळे कामगार क्षेत्रात नवनव्या घडामोडी घडत आहेत. नविन सुधारणा कायदे अस्तित्वात येत आहेत. अशा स्थितीत या सर्व घडामोडींचा, बदलांचा संशोधनात्मकरित्या अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे, असे रेड्डी म्हणाले. आर्थिक स्वातंत्र्याची लढाई भारतीय मजदूर संघाला लढायची असून संघ कामगारासोबत राष्ट्राचाही विचार करते, असे श्रीकांत धारप म्हणाले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक भामसचे पश्चिम क्षेत्र प्रभारी एस.एन. देशपांडे व संचालन भामसचे विदर्भ प्रदेश महामंत्री रमेश पाटील यांनी केले.

टेकडीच्या गणेश मंदिराला मारुती व्हॅन
नागपूर, १३ जुलै/प्रतिनिधी
टेकडीच्या श्री गणेश मंदिराला सुधाकर तेलंगे यांनी मारुती व्हॅन भेट दिली. याप्रसंगी श्रीगणेश मंदिराचे अध्यक्ष श्रीराम वैद्य, सचिव अरुण कुळकर्णी, कोषाध्यक्ष श्रीराम कुळकर्णी, उपाध्यक्ष पुंडलिक जौंजाळ, सहसचिव माधव कोहळे, विश्वस्त गणपत जोशी, दिलीप शहाकार, प्रमोद देवरणकर तसेच सुधाकर तेलंगे, त्यांची पत्नी, मुलगा व सून उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी सुधाकर तेलंगे यांना सिक्कीम लॉटरी लागली होती. प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना लॉटरीचा पहिला हप्ता प्रश्नप्त झाला. नवसाप्रमाणे त्यांनी लॉटरीच्या पैशाचा विनियोग करण्यापूर्वी गणेशाच्या चरणी मंदिरास वाहन भेट देऊन श्री गणेशास सपत्नीक अभिषेक केला.

‘उड्डाण’ रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप
नागपूर, १३ जुलै/प्रतिनिधी
जेसीआय नागपूर लेडी लिजेंटच्या गरजू महिलांकरिता ‘उड्डाण’ ही रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत उद्योजक ज्योती कुंभलकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. वेळेचे मुल्य समजवून घ्या आणि स्वत:ची क्षमता ओळखा, असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी व्यवसायाची सुरुवात कशी करावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कमी खर्चात करता येणाऱ्या फुलाच्या व्यवसायाबद्दलसुद्धा त्यांनी यावेळी प्रश्नत्यक्षिकासह मार्गदर्शन केले. आशा पांडे यांनी, महिलांना नवीन व्यवसाय उभारताना लागणाऱ्या मदतीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रश्नची बंका यांनी केले.

दीड लाखाचा ऐवज लांबवला
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी
घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी दीड लखाचा ऐवज लांबवला. कळमन्यातील मोहनलाल वाजपेयी नगरात सोमवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. मुन्ना पोतनसिंग देशमुख (रा़मोहनलाल वाजपेयी नगर) हे त्यांचे भाऊ मरण पावल्याने कुटुंबासह बालाघाटला गेले होते. आज सकाळी घरी आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. हे समजताच कळमना पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. रोख ८३ हजार व सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचे ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला. कळमणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला़
तरुणाला लुटले
छत्तीगडच्या एका तरुणाला दोघांनी लुटल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. भूपेंद्र नरसिंह शाहू हा राजनांदगाव येथून नागपूरला फिरण्याकरता आला. तेवढय़ात तेथे आलेल्या दोघांनी टेस्टर दाखवत ८५० रुपये हिसकून पळून गेले. भूपेंद्रने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपी रवी हरीचंद्र चव्हाण (रा़ हंसापुरी) याला अटक केली. त्याचा एक साथीदार फरार आह़े

विद्युत सबस्टेशनची उपमहापौरांची मागणी
नागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी
दक्षिण नागपुरातील विद्युत मंडळाच्या सबस्टेशनवर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने या भागात आणखी दोन सबस्टेशन स्थापन करण्याची मागणी उपमहापौर किशोर कुमेरिया यांनी केली. उमेरड मार्गावरील सुभेदार ले-आऊट, सुतगिरणी आणि मिरची बाजार सबस्टेशनची क्षमता प्रत्येकी ११ हजार ग्राहकांची आहे. परंतु, या तिनही सबस्टेशवरून क्षमतेपेक्षा सुमारे दुप्पट जोडण्या देण्यात आल्या आहेत. सुभेदार सबस्टेशनवरून १७ हजार २३१, सुतगिरणी सबस्टेशनवरून १८ हजार २४५ आणि मिरची बाजार सबस्टेशनवरून २० हजार ७८८ ग्राहकांना विद्युत जोडणी देण्यात आली आहे. प्रत्येक सबस्टेशनमागे सुमारे ७ ते १० हजार अधिक ग्राहक असल्याने या सबस्टेशनवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. वारंवार वीज खंडित होते. अधिक ग्राहकांच्या संख्येमुळे तक्रारींचा निपटारा करण्याकरिता बराच विलंब होत आहे. नागरिकांच्या समस्या आणि सबस्टेशनची क्षमता लक्षात घेता या भागात आणखी दोन सबस्टेशन उभारण्याची आवश्यकता आहे, असेही कुमेरिया म्हणाले.

शिबिरात २५०० रुग्णांची तपासणी
नागपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट फाऊन्डेशनतर्फे तिडके विद्यालयात आयोजित आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिरात २५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन ग्रामीण विकास संस्थेचे सचिव बाबासाहेब सुनकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तिरुपती अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष समीर मेघे व प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री अनिस अहमद, नगरसेवक प्रशांत चोपडा, पोलीस निरीक्षक सुनील बोंडे, नगर सेविका प्रगती पाटील, माजी नगरसेवक राजेश नगरकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक व संचालन फाऊन्डेशनचे संयोजक डॉ. शकील सत्तार यांनी केले. राजू लोहे यांनी आभार मानले.