Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

जीवन दर्शन
वैऱ्यावर प्रीती

येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, ‘‘आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा आणि वैऱ्याचा द्वेष करा, असे जुन्या करारात सांगितले आहे. मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.’’ येशूच्या शिकवणीतील हे अतिशय कठीण असे कलम आहे. जे आपले वाईट करतात त्यांचे भले व्हावे म्हणून देवाकडे प्रार्थना करणे ही अशक्यप्राय गोष्ट वाटते. शत्रूवर प्रेम करणे हा दुर्बलपणा आहे अशी सर्वसामान्य समजूत आहे. वास्तविक तसे करणे हा खरा शूरपणा आहे. आपल्यामधील सात्त्विक प्रवृत्तीने आसुरी प्रवृत्तीवर मिळविलेला तो विजय आहे. अंगी प्रचंड आध्यात्मिक बळ असल्याशिवाय मनात विरोधकांबद्दल चांगल्या भावना दाटून येणे शक्यच नाही. शत्रूवर प्रेम करण्याचा उपदेश करून येशूने मानवातील देवत्वाला आव्हान केले आहे.

 


शत्रूवर प्रेम केले, त्याला क्षमा केली तर तो वरचढ होईल का?, आपल्याला कमी लेखू लागेल का?, आपला गैरवापर करील का?, अशी भीती आपल्या मनात दाटते.. वास्तविक मनात द्वेषाऐवजी मैत्रीची भावना जोपासल्यामुळे शत्रूपेक्षा आपलाच अधिक लाभ होत असतो. कुठलीही नकारात्मक भावना ही विषाच्या थेंबासारखी असते. ती मनात बाळगल्याने तिचा आपल्याला उपद्रव पोहोचतच असतो. त्यामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येते. नकारात्मक भावनेमुळे मनात अढी निर्माण होते. हळूहळू ते विष आपल्या अबोध मनात उतरते. एकदा ते अंगात भिनले की त्याचा निचरा होण्यासाठी भगिरथ प्रयत्न करावे लागतात. अवघा अनर्थ एका नकारात्मक भावनेमुळे होत असतो. शत्रूसाठी प्रार्थना करणे ही त्यापुढची पायरी आहे. हीदेखील एक अशक्यप्राय बाब वाटते. परंतु त्यामध्ये आपलाच मोठा लाभ आहे. प्रार्थना करणे म्हणजे परमात्म्याशी संवाद साधणे होय. त्यासाठी प्रथम मन शांत आणि निरामय करावे लागते. आपले मन शांत असले तर त्याचा लाभ शत्रूला होतो की आपल्याला? मग ज्यात आपला लाभ आहे ती गोष्ट आपण का करू नये?
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd48@gmail.com

कुतूहल
वैश्विक किरणे
वैश्विक किरणांचा वेध कसा घेतला जातो?

वैश्विक किरण म्हणजे पृथ्वीवर अवकाशातून येणारे प्रचंड ऊर्जाधारी असे विद्युतभारीत कण. वैश्विक किरण हे वस्तुत: किरण नसून कण असतात व त्यांचा मारा पृथ्वीवर सतत सर्व दिशांनी होत असतो. व्हिक्टर हेस या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने इ.स. १९१२ साली फुग्याच्या साहाय्याने ५,३०० मीटर उंचीपर्यंत जाऊन स्वत: केलेल्या मापनाद्वारे वैश्विक किरणांचा शोध लावला. वैश्विक किरणांमध्ये सुमारे ९० टक्के प्रोटॉन, ९ टक्के अल्फा कण तसेच १ टक्का इलेक्ट्रॉन आढळले आहेत. या बरोबरच या किरणांत अत्यल्प प्रमाणात इतर मूलद्रव्यांची केंद्रकेही आढळून आली आहेत. या किरणांची ऊर्जा दृश्य प्रकाशाच्या लाखपटींपासून ते कित्येक अब्ज पटींहून अधिक असते. वैश्विक किरणांचा प्रत्यक्ष शोध हा अवकाशातून उपग्रह किंवा फुग्यांच्या साहाय्याने अंतराळात शोधक सोडून घेतला जातो. तर त्यांचा अप्रत्यक्ष वेध हा या किरणांमुळे वातावरणात निर्माण होणाऱ्या इतर विद्युतभारीत कणांच्या, जमिनीवरील शोधकांमधून केलेल्या मापनातून घेतला जातो.
कमी ऊर्जेच्या वैश्विक किरणांची निर्मिती बहुतांशी सौरज्वालांमध्ये होते. अधिक ऊर्जेच्या किरणांची निर्मिती मात्र सूर्यमालेच्या बाहेर होत असून, त्यांच्या उगमाची निश्चित माहिती उपलब्ध नाही. कारण वैश्विक कण हे विद्युतभारीत असल्यामुळे त्यांचा मार्ग आकाशगंगा, सूर्यमाला तसेच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून प्रवास करताना बदलतो. त्यामुळे या कणांच्या उगमाची निश्चित दिशा कळू शकत नाही. मध्यम ऊर्जेच्या किरणांची निर्मिती बहुधा आकाशगंगेतील अतिनवताऱ्यांच्या अवशेषांमध्ये होत असावी तर अधिक ऊर्जेच्या कणांची निर्मिती आकाशगंगेबाहेरील दीर्घिकांची केंद्रे, गॅमा किरणांचे प्रस्फोट याद्वारे होत असावी. या स्रोतांकडून येणाऱ्या गॅमा किरणांच्या तसेच न्यूट्रिनोसारख्या मूलकणांच्या निरीक्षणातून वैश्विक किरणांच्या उगमाविषयीचे कोडे सुटू शकेल. मात्र त्यासाठी अधिक शक्तिशाली दुर्बिणीची गरज आहे.
वर्षां चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिन विशेष
उद्योगपती अल्फ्रेड क्रप
आपल्याकडे आजही टाटा, बिर्लाचे नाव जुन्या पिढीतील औद्योगिक घराणे म्हणून आदराने घेतले जाते. तसेच जर्मनीमध्ये क्रप घराण्याचे नाव त्यांनी जर्मनीसाठी दिलेल्या औद्योगिक योगदानामुळे घेतले जाते. पोलाद उद्योगात जागतिक कीर्ती संपादन करणाऱ्या क्रप घराण्याचा औद्योगिक संस्थापक लोहतज्ज्ञ फ्रीड्रिख क्रप. त्याने पोलादाचा छोटा कारखाना उभारला होता. त्याचा मृत्यू झाल्यावर अल्फ्रेड यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतली.
वयाच्या १४ व्या वर्षीच उद्योगाची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. युद्धासाठी त्यांनी ओतीव पोलादी तोफा निर्माण केल्या. या तोफांच्या जोरावरच जर्मनीने ऑस्ट्रिया व फ्रान्सचा धुव्वा उडवला. परिणामी जगभरातून त्यांच्या तोफांना मागणी आली. त्याच्या मार्गदर्शनाखाली ‘क्रप वर्क्‍स’ या कंपनीने युद्धसामग्रीचे उत्पादन सुरू केले.
यामुळे त्यांना आधुनिक युद्धसामग्रीचे संस्थापक मानले जाते. त्या काळात त्यांनी कामगारांसाठी आजारपण व दफनविधीसाठी निधीची तरतूद केली होती. तसेच कामगारांसाठी सेवानिवृत्ती वेतन, निवास, रुग्णालये, चर्चही बांधले होते. यामुळे कामगारांमध्ये ते प्रिय होते. १४ जुलै १८८७ रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी व नातवांनी कंपनीची धुरा व्यवस्थित सांभाळली. संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
बोलकी बाग

विद्यागौरी फारच वैतागली होती. तिला वाटायचे जोत्स्ना तिची अगदी जिवाभावाची मैत्रिण आहे. तिच्यावर खूप प्रेम करते. तिला जोत्स्ना फोन करायची. संध्याकाळी दोघी मिळून बागेत फिरायला जायच्या, गप्पा मारायच्या. दोघी एकमेकींना सुख-दु:ख सांगायच्या. कधी पिक्चरला जायच्या तर कधी सायकलवरून दूर भटकायच्या. विद्यागौरी जोत्स्नाला नेहमी गृहपाठ सोडवायला मदत करायची. जोत्स्ना खूपदा शाळेत यायची नाही. तिचा बुडलेला अभ्यास वर्गपाठातल्या वर्गात दिलेल्या नोट्स लिहून काढायला तिला मदत करायची. जोत्स्नाने डबा आणला नाही तर आपल्या डब्यातले तिलाही द्यायची, दोघा मिळून डबा खायच्या. विद्यागौरीकडून जोत्स्नाने गाण्याची सीडी नेली होती. दोनतीन वेळा मागूनही तिने सीडी परत दिली नाही. एके दिवशी जोत्स्ना कॉमिक्स घेऊन आली. विद्यागौरीला थोडय़ा दिलगिरीने म्हणाली, अग तू दिलेली सीडी किनई कुठे सापडतच नाही. बहुदा हरवलीय. त्याऐवजी हे कॉमिक्स घे. सीडीची किंमत कॉमिक्सपेक्षा कितीतरी जास्त होती. पण विद्यागौरी काही म्हणाली नाही. घरी आईची विनाकारण बोलणी बसली तेव्हा ती आईला म्हणाली, माझ्या हातून हरवली ग सीडी. त्या दिवशी विद्यागौरी चुलतबहिणीच्या लग्नाला जाणार होती. तिला वाटले दुसऱ्या दिवशी जोत्स्नाकडून बुडालेला अभ्यास लिहून घेऊ. पण जोत्स्नाने उडवाउडवीची उत्तरे दिली. वही देणे दूरच. बाईनी काय काय घेतले ग? विद्यागौरीने विचारले. नाक उडवत जोत्स्ना म्हणाली, ए आता कशाला पुन्हा अभ्यासाचा विषय. दिवसभर शाळेत मी तेच केलेय. अगदी कंटाळा आलाय. कोपऱ्यावर जाऊन आईस्क्रीम खाऊया चल. विद्यागौरी चिडली, वैतागली. तिला वाटले कसली ही मैत्रिण? मी हिच्यासाठी किती करते. माझी मैत्रिण म्हणून नेहेमी माझ्या वस्तू देते. अभ्यासात मदत करते. ही माझ्यासाठी काहीच करत नाही. जोत्स्नाला सोडून ती एकटीच बागेत जाऊन बसली. शेजारच्या कुंडीतल्या फुलांचा सुगंध दरवळला होता. तिला जरा प्रसन्न वाटले. चिडचिड कमी झाली. फुल म्हणाले, मी तुला सुगंध दिला त्याबदल्यात तू मला काय दिलेस? झाड म्हणाले मी सावली दिली तू काय दिलेस? बाग म्हणाली मी आनंद दिला तू मला परत काय दिलेस? घरी परतताना विद्यागौरी जोत्स्नाच्या घराशी थांबली. तिला हाक मारून म्हणाली, ए जोत्स्ना, तुला आईस्क्रीम खायचे होते ना? चल जाऊ या.
दुसऱ्याला देण्यात आनंद आणि गंमत आहे. त्याच्या बदल्यात काही अपेक्षा ठेवली तर मात्र देण्यातला आनंद नाहीसा होतो.
आजचा संकल्प : इतरांसाठी कोणतीही गोष्ट करताना मी निरपेक्षपणे करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com