Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

त्यांचे हात ‘देणाऱ्याचे’ झाले..
फुले कुटुंबीय पुण्याचे. पुण्यातील खडकमाळ आळी भागातील बोराटे वाडय़ात राहणाऱ्या कृष्णाजी यांचे निळूभाऊ हे चिरंजीव. कृष्णाजी यांचे मंडईतील आर्यन चित्रगृहाजवळ लाकडी-लोखंडी सामानाचे दुकान होते. १९३० मध्ये जन्म झालेल्या निळूभाऊ यांचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही. शिवाजी मराठा शाळेतून जेमतेम नववीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले असले, तरी राष्ट्र सेवा दलाकडे ते लहान वयातच ओढले गेले. वयाच्या चौदाव्या वर्षीच घोरपडे पेठेतील खड्डे मैदान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत ते दाखल झाले. तेथे त्यांचा संपर्क भाई वैद्य, मधुकर निरफराके आदींशी आला. महात्मा गांधी यांना १९४५ मध्ये आगाखान पॅलेसमधून मुक्त केल्यावर त्यांच्या निसर्गोपचार आश्रमातील वास्तव्यात सेवा दलाचा सैनिक म्हणूनही त्यांनी काम केले.

‘गणगोत’ भूमिकांचे
चतुरस्र अभिनयाने मराठी रंगभूमी तसेच हिंदूी व मराठी चित्रपटसृष्टीवर स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या निळू फुले यांनी आपल्या पन्नास-साठ वर्षांच्या कला प्रवासात अनेक लोकनाटय़े, नाटके व शेकडो चित्रपटांतून अभिनय करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या स्मरणात असलेली काही प्रमुख नाटके, लोकनाटय़े व चित्रपट पुढीलप्रमाणे-
नाटके- सूर्यास्त, सखाराम बाइंडर, जंगली कबूतर, रण दोघांचे, बेबी.
लोकनाटय़- पुढारी पाहिजे, कुणाचा कुणाला मेळ नाही, कथा अकलेच्या काद्यांची, बिन बियाचे झाड, लवंगी मिरची कोल्हापूरची, राजकारण गेलं चुलीत, मी लाडाची मैना तुमची.

जनसामान्यांचा जिवाभावाचा मित्र
निळूभाऊ गेले. जाणार असल्याचे अवघ्या १५-२० दिवसांपूर्वी लक्षात आले. ते आजारी असल्याचे कळत होते, परंतु आजार जीवघेणा असेल असे वाटत नव्हते. मात्र निळूभाऊंनी अंथरूण धरले. त्यांना साधे बसवेना. अन्ननलिकेत बाधा असल्याचे पाहून नळीचा प्रयोग झाला. निळूभाऊंचे ‘पोषण’ व त्यांची देखभाल हे प्रश्न सोडवायचे प्रयत्न झाले. एरव्ही मुलीला ‘गाग्र्या’ म्हणून हाक मारणारे, आल्यागेल्यांचे हसून स्वागत करणारे निळूभाऊ हळूहळू गलितगात्र होत गेले. अन्ननलिकेचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. आता फक्त देखभाल. शरीराला बळेबळेच हलवणे, येनकेन प्रकारे पाणीपुरवठा करणे, नर्सिग करणे ही मोठी अवघड बाब असते. यातच गार्गीजवळ एक तान्हुला. या बालकाचा नामकरण समारंभ. ‘आनंद’ नाव ठेवले.

‘सामना’तला हिंदुराव
निळूभाऊंशी जामखेडचा ऋणानुबंध जुळला तो ‘सामना’पासून. माझ्या या चित्रपटाचं बरचंसं चित्रीकरण जामखेडमध्ये झालं. त्यानिमित्तानं निळू फुले, डॉ. श्रीराम लागू यांचं वास्तव्य अनेक दिवस इथे होतं. चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा कलाकार म्हणजे सर्वाच्या आकर्षणाचा विषय. निळूभाऊंना बघण्याची प्रत्येकाला उत्सुकता. पण इतर ‘हीरों’पेक्षा निळूभाऊ वेगळे होते. अगदी साधे. ‘ग्लॅमर’चं नाव नाही. सदरा, पायजमा अशा वेषातला हा माणूस इतका मोठा कलाकार असेल अशी कल्पनाही पाहणाऱ्याला येत नसे. युनिटमधल्या सर्वाबरोबर ते जेवत, त्यांच्याबरोबरच ते राहत. निळूभाऊ जामखेडला आले ते एसटीनं. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत साडेसहा-सात तासांचा कंटाळवाणा प्रवास करून आल्यावर लगेचचं ते शूटिंगला उभे राहिले. जामखेडच्या ‘शेतकी निवासा’समोरच्या जागेत ‘हिंदुराव’च्या जाहीर सभेचं दृश्य चित्रीत करण्यात येणार होतं. जामखेडमधल्या

माणुसकी जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व : शरद पवार
सक्षम, सशक्त आणि सहजसुंदर अभिनय हे निळूभाऊंचे वैशिष्टय़ होते. ग्रामीण पाश्र्वभूमीवरील त्यांचा खलनायक पडद्यावर झंझावात निर्माण करीत असे. सामाजिकतेचे भान ठेवणारा, समाजाचे ऋण मानून ते फेडण्यासाठी कष्ट करणारा, माणुसकी जपणारा, उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेला हा डोंगराएवढा माणूस होता. त्यांच्या मृत्युमुळे महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले यात शंका नाही, अशी शोकसंवेदना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

महेश टिळेकर
सतत दुसऱ्याचा विचार प्रथम करणारे थोर अभिनेता आणि थोर माणूस म्हणून निळूभाऊंचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. परमेश्वराच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नसते त्याचप्रमाणे निळूभाऊंनी चित्रपटसृष्टी आणि समाजावर मोठे ऋण केले असून ते फिटता फिटणारे नाही. ‘गाव तसं चांगलं’ या माझ्या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. कुणालाही अडीअडचणीला निळूभाऊंनी सढळ हस्ते मदत केली. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा दलाची शिकवण प्रत्यक्षात अमलात आणून गरीबांसाठी कणव असलेला हा मोठय़ा मनाचा माणूस अद्वितीयच म्हटला पाहिजे. म्हणून त्यांनी केलेले ऋण कधीही फिटणारे नाहीत.

सदाशिव अमरापूरकर
निळूभाऊंमुळे आपल्याला समाजकार्याचे पैलू उमगले. विविध जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित असलेल्या समाजाची दुखे त्यांनीच आपल्याला दाखविली.
अमोल पालेकर
संयत अभिनयाची निळूभाऊंनी एक वेगळी पातळी ठरवून टाकली. सखाराम बाईंडर, कथा अकलेच्या कांद्याची या नाटकांमधला त्यांचा अभिनय हा त्यावेळी आमच्यासारख्या तरुण नटांना वस्तुपाठच होता. कलावंताप्रमाणेच माणूस म्हणूनही ते मोठे होते.
जयराम कुलकर्णी
वगनाटय़ासारख्या माध्यमातून आलेले बहुतेक कलावंत सर्वश्रेष्ठ ठरतात. निळूभाऊ त्यापैकीच एक होते. असा अभिनेता आज आपल्यात नाही, याचे फार दु:ख होते.
अजय सरपोतदार
निर्माता, दिग्दर्शकांचा नट, लाईट बॉय व स्पॉट बॉयचा साथीदार. निर्माता जगावा, दिग्दर्शकालाही चांगला चित्रपट करता यावा अशी तळमळ असलेला कोणत्याही अटी न घालता काम करण्यास तयार असलेला सोपा, साधा व प्रामाणिक नट अशी निळूभाऊंची ओळख होती. स्वत:ला मिळालेले मानधन त्यांनी अनेकदा स्पॉट बॉय व सहकलावंतांमध्ये वाटून टाकल्याचे आपण पाहिले आहे. बॅकस्टेज आर्टिस्टसाठी काही केले पाहिजे यासाठी स्थापन केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीत त्यांच्यासमवेत मराठी चित्रपट महामंडळानेही सहभाग घेतला होता.
सतीश आळेकर
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी नाटकांना योगदान देणाऱ्यांमध्ये निळूभाऊंचे स्थान एकमेवाद्वितीय होते. तमाशातील सोंगाडय़ाची संवेदना व आधुनिक नाटकातील नटाची संवेदना यांचा उत्कृष्ट क्रियाशील मिलाफ असलेला कलाकार दुसरा नाही.
यांची विचारसरणी आणि फुल्यांची परंपरा मानणारा नट गेला.
अतुल पेठे
निळूभाऊ कलावंताप्रमाणेच माणूस म्हणूनही खूप मोठे होते. नागरी रंगभूमी व ग्रामीण रंगभूमीचा लहेज त्यांनी बरोबर सांभाळला होता. लोहियांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव त्यांच्या अभिनयातूनही जाणवत असे. लोककलेतून आलेले राजकीय, सामाजिक भान असलेले ते कलावंत होते.
उषा चव्हाण
निळूभाऊंबरोबर ‘चोरीचा मामला’, ‘थापाड्य़ा’, ‘सोनाराने टोचले कान’ अशा तीन-चार सिनेमातून आपण काम केले. त्यांचा आवाज आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील रसिकांना अतिशय प्रिय होता.
सुषमा देशपांडे
कलावंताप्रमाणेच माणूस म्हणूनही निळूभाऊ श्रेष्ठ होते. कमालीचा नम्र, साधा, अफाट व्यासंग असलेला माणूस आज आपल्यातून गेला.
लक्ष्मण माने
साहित्य अकादमीचा पुरस्कार आपण निळू फुले यांच्या हस्ते स्वीकारला होता. सामाजिक बांधिलकी मानून काम करणारे ते श्रेष्ठ कलावंत होते.समाजातील तळागाळ्यातल्या माणसाविषयी त्यांना अपार प्रेम होते. त्यामुळेच आमच्या संस्थेतर्फे छत्रपती शाहू महाराज कलागौरव पुरस्कारासाठी आम्ही त्यांची निवड केली होती.
क्रांती शहा
समतेच्या िदडीमध्ये, परिवर्तनाच्या मार्गावर युवक बिरादरीच्या निर्मितीत प्रोत्साहन देणाऱ्या निळू फुले यांना युवक बिरादरीची श्रद्धांजली.