Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

त्यांचे हात ‘देणाऱ्याचे’ झाले..
फुले कुटुंबीय पुण्याचे. पुण्यातील खडकमाळ आळी भागातील बोराटे वाडय़ात राहणाऱ्या कृष्णाजी यांचे निळूभाऊ हे चिरंजीव. कृष्णाजी यांचे मंडईतील आर्यन चित्रगृहाजवळ लाकडी-लोखंडी सामानाचे दुकान होते. १९३० मध्ये जन्म झालेल्या निळूभाऊ यांचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही. शिवाजी मराठा शाळेतून जेमतेम नववीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले असले, तरी राष्ट्र सेवा दलाकडे ते लहान वयातच ओढले गेले. वयाच्या चौदाव्या वर्षीच घोरपडे पेठेतील खड्डे मैदान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत ते दाखल झाले. तेथे त्यांचा संपर्क भाई वैद्य, मधुकर निरफराके आदींशी आला. महात्मा गांधी यांना १९४५ मध्ये आगाखान पॅलेसमधून मुक्त केल्यावर त्यांच्या निसर्गोपचार आश्रमातील वास्तव्यात सेवा दलाचा सैनिक म्हणूनही त्यांनी काम केले.
निळूभाऊंचे वय वाढत होते तसतशी त्यांची सामाजिक जाणीव वाढत होती, अधिक प्रगल्भ होत होती. १९५७ मधील संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन पेटले. त्यात त्यांचाही सहभाग होता. पुढे त्यांनी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात माळीकामाची नोकरी मिळवली. ही नोकरी सुरू असतानाच दुसरीकडे त्यांचे राष्ट्र सेवा दलातील काम चालूच होते. या दलाच्या कलापथकात ते दाखल झाले आणि त्यांच्या आयुष्याची जणू दिशाच ठरली. या कलापथकाद्वारे विविध नाटके बसविण्यात येत. त्यात ते मोठय़ा उत्साहाने भाग घेऊ लागले. ‘‘त्याचा िपडच विनोद करण्याचा होता,’’ त्यांच्या भगिनी प्रमिला ठाकूर सांगतात, ‘‘एखाद्याची गंमत करणे, नक्कल करणे यात त्याचा हातखंडा होता. या त्याच्या वृत्तीला कलापथकात वाव मिळाला.’’ या कलापथकातील ‘पुढारी पाहिजे’ (लेखक-पु. ल. देशपांडे), ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’, ‘बिनबियाचे झाड’ (लेखक- व्यंकटेश माडगूळकर), ‘लाल चीनच्या आक्रमणाचा फार्स’ (लेखक- दादा कोंडके) या लोकनाटय़ांमध्ये त्यांनी मनापासून काम केले. त्यांना राम नगरकर, दादा कोंडके यांचीही साथ त्या वेळी कलापथकात मिळाली. या नाटय़ांमधील विविध भूमिकांमधून समर्थ अभिनेता म्हणून त्यांची ओळख पटत गेली. या कामामुळेच त्यांना व्यावसायिक रंगभूमीसाठी आमंत्रण आले. १९६४-६५ च्या सुमारास अमृत गोरे निर्मित ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाटय़ासाठी त्यांना विचारणा झाली.
‘‘त्यांचे बोलणे अगदी सहज असे होते. त्यांना कलापथकातील कामाचा अनुभव असल्याने ते कलापथकाबाहेरील ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या पहिल्याच नाटकातही सहजपणेच वावरले,’’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून काम केलेल्या अभिनेत्री लीला गांधी सांगतात. ‘‘आम्ही सांगलीला या नाटकाचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर त्यात अनेक बदल केले आणि नंतर ते नाटक प्रेक्षकांनी उचलून धरले.’’
निळूभाऊंचे नाटकातील पदार्पण गाजत असतानाच त्यांना १९६८ मध्ये चित्रपटासाठी आमंत्रण आले. त्यांचा पहिला चित्रपट होता अनंत माने यांचा ‘एक गाव बारा भानगडी’. शंकर पाटील यांनी लिहिलेल्या या चित्रपटातील झेलेअण्णांची भूमिका त्यांनी गाजवली. मराठी चित्रपटातील ग्रामीण कथेतील खलनायक म्हणून निळूभाऊंकडे तेव्हापासून भूमिका येऊ लागल्या आणि ग्रामीण खलनायक म्हणून ते प्रसिद्ध झाले. एखाद्या साखर कारखान्याचा अध्यक्ष, कुर्रेबाज सरपंच म्हणजे निळू फुले असेच समीकरण बनले. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘िपजरा’, ‘सोंगाडय़ा’, ‘थापाडय़ा’, ‘चोरीचा मामला’, ‘लक्ष्मी’, ‘पुढचं पाऊल’, अशा अनेक मराठी चित्रपटांना महोत्सवी यश लाभले. मराठीप्रमाणेच हिंदूीतही त्यांनी काही भूमिका केल्या. त्यात दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांच्याबरोबर ‘मशाल’मध्ये तर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘कुली’मध्ये, तसेच अनुपम खेर यांच्याबरोबर ‘सारांश’ या चित्रपटात त्यांनी समर्थपणे भूमिका केल्या, मात्र हिंदूीमध्ये निळूभाऊ फार रमले नाहीत. ते मराठी चित्रपट आणि रंगभूमीकडेच वळले. त्यातही मराठी चित्रपट करीत असताना ते रंगभूमीला विसरले नाहीत. चित्रपटात भूमिका मिळू लागल्या की रंगभूमीवर यायचे नाही, ही कलाकारांची पद्धत त्यांना नामंजूर होती. म्हणूनच ‘सखाराम बाइंडर’, ‘सूर्यास्त’, ‘जंगली कबूतर’, ‘बेबी’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, ‘मी लाडाची मैना तुमची’ या नाटकांत त्यांनी समरसून केलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. नाटकांतील कामांबरोबरच ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ या लोकनाटय़ाचे लेखनही निळूभाऊंनी केले होते. पृथ्वीवरील निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी देव संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना पाठवतात आणि येथील राजकारण्यांशी त्यांच्या पद्धतीने लढत देऊ न शकल्याने त्यांचा पराभव होतो, अशी या नाटय़ाची संहिता होती. प्
ाुढे नानासाहेब गोरे यांच्या सूचनेनुसार या नाटय़ाचा शेवट बदलण्यात आल्याची आठवण राष्ट्र सेवा दलाचे सुरेश देशमुख यांनी सांगितली. निळूभाऊंच्या नाटय़निष्ठेबाबत ‘मनोरंजन’ चे मनोहर कुलकर्णी सांगतात, ‘‘ धुळीने भरलेला रस्ता तुडवत आणि रंगपटासाठी खोलीही नसलेल्या अगदी छोटय़ा खेडय़ामध्ये जाऊनही ते मनापासून प्रयोग करीत. सोलापूरला ‘जंगली कबूतर’ च्या प्रयोगासाठी आम्ही जात असताना गाडी बिघडली. तेव्हा एक मोटार थांबवून लालन सारंग आणि इतर कलाकारांना आम्ही पाठवून दिले. त्यानंतर नाटकाला थोडाच वेळ शिल्लक होता आणि दुसरी गाडी मिळाली नाही. तेवढय़ात तेथे आलेल्या वाळूच्या मालमोटारीमध्ये कामगारासारखे बसून निळूभाऊ सोलापूरला पोहोचले आणि लागलीच प्रयोग सुरू केला.’’ ‘कदाचित’ हा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट त्यांचा अलीकडच्या काळातील शेवटचा चित्रपट ठरला तर लवकरच प्रदर्शित होणारा ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट. रंगभूमीवरील प्रवासात भेटलेल्या कलावंत रजनी मुथा यांच्याबरोबर निळूभाऊंचे सूर जुळले आणि त्यांनी विवाह केला.
त्यांची गार्गी फुले ही मुलगीही प्रायोगिक रंगभूमीवर अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शक म्हणून काम करते आहे.केवळ रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते एवढीच निळूभाऊंची ओळख नव्हती तर माणूस आणि निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची प्रतिमा मोठी होती. पंचविशीत असताना सुमारे दहा वर्षे राष्ट्र सेवा दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले. समाजवादी पक्षात ते सक्रिय होते. १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या काळातील गुप्त प्रचारपत्रकांच्या वितरणात त्यांचा सहभाग असे. १९७७ मधील जनता पक्षाच्या, १९८९ नंतरच्या निवडणुकांत जनता दलाच्या व बहुजन महासंघाच्या प्रचाराच्या कामात ते अग्रभागी असायचे. सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या कामातही ते आवर्जून सहभागी होत होते. सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन मिळावे, यासाठी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यात त्यांनी हिरिरीने दौरे केले. डॉ. राममनोहर लोहिया जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते अखेपर्यंत कार्यरत होते. महात्मा गांधी, लोहिया, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस. एम. जोशी यांच्या विचारांचा प्रभाव निळूभाऊंवर होता आणि त्यांची समाजावरील निष्ठाही तेवढीच गाढ होती.