Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

जनसामान्यांचा जिवाभावाचा मित्र
निळूभाऊ गेले. जाणार असल्याचे अवघ्या १५-२० दिवसांपूर्वी लक्षात आले. ते आजारी असल्याचे कळत होते, परंतु आजार जीवघेणा असेल असे वाटत नव्हते. मात्र निळूभाऊंनी अंथरूण धरले. त्यांना साधे बसवेना. अन्ननलिकेत बाधा असल्याचे पाहून नळीचा प्रयोग झाला. निळूभाऊंचे ‘पोषण’ व त्यांची देखभाल हे प्रश्न सोडवायचे प्रयत्न झाले. एरव्ही मुलीला ‘गाग्र्या’ म्हणून हाक मारणारे, आल्यागेल्यांचे हसून स्वागत करणारे निळूभाऊ हळूहळू गलितगात्र होत गेले. अन्ननलिकेचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. आता फक्त देखभाल. शरीराला बळेबळेच हलवणे, येनकेन प्रकारे पाणीपुरवठा करणे, नर्सिग करणे ही मोठी अवघड बाब असते. यातच गार्गीजवळ एक तान्हुला. या बालकाचा नामकरण समारंभ. ‘आनंद’ नाव ठेवले. या आनंदाला आजोबांनी पाहिले. कुरवाळले. आजी-आजोबा दोन्हीकडचे, आईवडील.. नामकरणाचा अगदी घरगुती समारंभ. पुढे तीन चार दिवसांनी म्हणजे २६ जून रोजी छत्रपती शाहू जयंती. लक्ष्मण माने सातारहून आले. निळूभाऊंना छत्रपती शाहू पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ निळूभाऊंच्या घरीच उरकण्यात आला. त्यांना बळेच धरून बसवले. त्यांनी मुद्रा दिली. रजनीताई शेजारीच बसल्या होत्या. भाऊ काही तरी बोलू पहात होते, परंतु अवघड होते.
निळूभाऊंना जहांगीर नर्सिग होममध्ये हलवण्यात आले. बातमी शक्यतोवर गुलदस्तात ठेवण्याचा प्रयत्न झाला. अतिदक्षता विभाग. बातमी समजली. व्यवसायाने मीही डॉक्टर. भेटाला गेलो. निळूभाऊ अर्धवट गुंगीत होते. नाडी पाहिली. चाफ्याचे फूल त्यांच्या हातात ठेवून बोटे बंद केली. निळूभाऊ भानावर आले. ‘बाऽबा’ असे पुटपुटले. त्याही अवस्थेत बोलण्याचा प्रयत्न झाला. अर्जुनला विचारले ‘ती ऽ स?’ ‘ती ऽ स?’ मला काही कळेना. अर्जुनने खुलासा केला. ३० तारखेला भेटण्याचे त्यांचे ठरले होते. पुढे हळूहळू शुद्ध हरपत गेली. १३ जुलैला सर्व कारभार आटोपला. आमचा ५०-५५ वर्षांचा जीवभावाचा जीवलग मित्र गेला. १९५७-५८ सालातील आठवण असावी. निळूभाऊ वानवडीच्या आर्म फोर्सेस मेडीकल कॉलेजात ‘माळी’ कामावर होते. हडपसरला माझा दवाखाना होता. रोज त्यांच्या कॉलेजवरून जावे लागे. निळूभाऊ दिसत, कधी भेटत. माळीकाम मनापासून करीत. माझ्या दवाखान्यातील क्ष किरण विभागाच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. एस. एम. जोशींच्या प्रयत्नातून हे जमले होते. निळूभाऊंनी फुलांची सजावट केली. हरिभाऊ होले हे वृद्ध माळी एम्प्रेस गार्डनमध्ये काम करीत. ते माझे पेशंट होते. फुले-होले या द्वयीने केलेल्या सजावटीचे चव्हाणांनी विशेष ‘कौतुक’ केले.
निळूभाऊ बागकाम करीत. झाडा-फुलांशी बोलत. त्याचवेळी खिशात पुस्तकाची वळकटी असे. वाचनाचा त्यांना विलक्षण छंद. त्यांच्या बरोबरच्या गप्पा फार आगळ्या असत. फुले मंडळी खडकमाळआळी भागात राहात. दांडगे कुटुंब. ६ भाऊ, ४ बहिणी. सायकलवर जा-ये व्हायची. निळूभाऊंची सायकलस्वारी मला आजही आठवते. आमची ओळख राष्ट्र सेवादलातून झाली. आमची शाळा शिवाजी मराठा हायस्कूल. गुरुवर्य बाबूराव जगताप आमचे हेडमास्तर. निळूभाऊ आमच्या मागे एक वर्ष होते. त्यांची शाळा कधी सुटली मला आठवत नाही. पुढे राष्ट्र सेवादलात ‘कलापथक’ सुरू झाले. निळूभाऊ, राम नगरकर या जोडीने धमाल केली. एक नवा जमाना सुरू झाला. सेवापथकाच्या पाठोपाठ कलापथक अवतरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतच कलापथकाच्या मोहिमेला उदंड प्रतिसाद लाभला होता. कलापथकातील ‘पुढारी पाहिजे’, ‘बिनबियाचे झाड’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाटय़ातून निळूभाऊंच्या ठायी असलेला अभिजात ‘नट’ साकारत गेला. पुढे निळूभाऊ कोठल्या कोठे पोचले, मात्र या प्रवासातदेखील त्यांनी मैत्रीचे धागे व्यवस्थित राखले. खडकमाळ आळीतील त्यांच्या सेवादलातील बालमित्रांना ते भेटत राहिले. निळूभाऊंचे भेटणे औपचारिक नसे. ‘केला इशारा जाता जाता’ असे नसे. गप्पा सुरू होत. अशा कैक मैफली आठवतात. निळूभाऊंना पान खायची तलफ् असायची. निळूभाऊंची संध्याकाळ नाटय़ प्रयोगानंतर रंगत असे. मग आणखी गप्पांना रंग भरे. अलीकडे जेवण थंडगार होई. निळूभाऊ तळागाळात मनापासून रमत. कष्टकऱ्यांच्या घरी ते आवर्जून जात. निळूभाऊंच्या बरोबरच्या प्रवासातील अनेक आठवणी आहेत. तुळजापूरची एक आठवण ते सांगत. आणीबाणीचा काळ होता. निळूभाऊंच्या कार्यक्रमात त्यांच्याशी जवळीक साधण्याचा पोलीस अधिकारीही प्रयत्न करीत. तुळजापूरच्या पोलीस अधिकाऱ्याने निळूभाऊंना प्रदक्षिणेला नेले. तेथे एक दगडी गोल आहे. तो शकुनी आहे, असे मानतात. त्याचा कौल घेण्याचा प्रघात आहे. पोलीस अधिकाऱ्याने निळूभाऊंना कौल लावण्याचा आग्रह केला. निळूभाऊंनी आणीबाणीविरूद्ध कौल लावला. बिचारा अधिकारी तत्काळ पसार झाला. संभावितांची- लगट करणारांची भंबेरी उडवण्याची निळूभाऊंची खासियत होती.
डॉ. श्रीराम लागू, निळूभाऊ, रोहिणी हट्टंगडी, सुधीर जोशी, सदाशिव अमरापूकर, सुहास जोशी, भारती आचरेकर, रिमा लागू इ. मंडळींच्या साहाय्याने सामाजिक कृतज्ञता निधीची उभारणी झाली. महाराष्ट्राचा दौरा झाला. पुढे परदेशातही वारी झाली. ज्ञानेश्वर - तुकारामांच्या पालख्यांतील वारकऱ्यांप्रमाणे प्रत्येकाचे भक्त भोवती गोळा व्हायचे. ग्रामीण भागात निळूभाऊ ंचे चाहते मोठय़ा प्रमाणावर. एकदा विदर्भातून आम्ही परतत होतो. मेहकरजवळ एका जुन्या सहकारी अतिथिगृहात आमचा मुक्काम झाला. पोहोचायला रात्रीचे १२ वाजले होते. छोटेखानी गाव, परंतु कशी कोणास ठाऊक ‘निळूभाऊ’ आल्याची बातमी पोचली. मध्यरात्री झुंडी सुरू झाल्या. सोबत फोटोग्राफर. निळूभाऊंनी ‘दाद’ दिली. कंटाळा केला नाही. उलट एका शेतकऱ्याकडून ‘बाजरीची भाकरी व झुणका मागवून घेतला. सकाळी उठून आम्ही रस्ता धरला. निळूभाऊंना सत्ता, पैसा, प्रसिद्धीचा हव्यास नव्हता. सरकारी पुरस्कारांना त्यांनी सतत नकार दिला. पुण्याच्या पुण्यभूषण पुरस्काराला त्यांनी नकार दिल्याचे मला ठाऊक आहे. डॉ. राममनोहर लोहियांचा ते पदोपदी उल्लेख करीत. आम्ही समाजवादी असलो तरी फुले- शाहू- आंबेडकरवादी. महाराष्ट्राच्या ग्रामीण रगेल व रंगेल नेतृत्वाचा ‘चेहरा’ निळूभाऊंनी रंगमंचावर पेश केला. एक प्रकारे तो ‘आरसा’च ठरला. पुढे शेकडो प्रयोगातून निळूभाऊंनी कामे केली. स्टेजवरच्या बलात्कारी भूमिकेमुळे अनेकदा काही स्त्रिया निळूभाऊंना शिव्या देताना मी पाहिले आहे. ऐकले आहे, परंतु याच निळूभाऊंच्या दैनंदिन जीवनातील सभ्यता विलक्षण असे. निळूभाऊंच्या मनात एक कल्पना साकारत होती. आदिवासींचा सामूहिक नाच, धनगरांचे सुंबरान, कोळय़ांचे नृत्य इ. लोककलांच्या नकलेपेक्षा त्या कलावंतांनाच रंगमंचावर आणायचे. त्यांच्यासाठी रंगमंच उभारायचा.
फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारधारा सांस्कृतिक अंगाने लोकजीवनात प्रवाही करायच्या.. निळूभाऊ अधूनमधून बोलत. अशी कामे ते मागे ठेवून गेले आहेत. सांस्कृतिक मंचाची उभारणी करून निळूभाऊंची स्मृती चिरंतन करता येईल. आणि तीच या जनतेच्या जीवलग मित्राला योग्य श्रद्धांजली ठरेल.
डॉ. बाबा आढाव