Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘सामना’तला हिंदुराव
निळूभाऊंशी जामखेडचा ऋणानुबंध जुळला तो ‘सामना’पासून. माझ्या या चित्रपटाचं बरचंसं चित्रीकरण जामखेडमध्ये झालं. त्यानिमित्तानं निळू फुले, डॉ. श्रीराम लागू यांचं वास्तव्य अनेक दिवस इथे होतं. चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा कलाकार म्हणजे सर्वाच्या आकर्षणाचा विषय. निळूभाऊंना बघण्याची प्रत्येकाला उत्सुकता. पण इतर ‘हीरों’पेक्षा निळूभाऊ वेगळे होते. अगदी साधे. ‘ग्लॅमर’चं नाव नाही. सदरा, पायजमा अशा वेषातला हा माणूस इतका मोठा कलाकार असेल अशी कल्पनाही पाहणाऱ्याला येत नसे. युनिटमधल्या सर्वाबरोबर ते जेवत, त्यांच्याबरोबरच ते राहत. निळूभाऊ जामखेडला आले ते एसटीनं. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत साडेसहा-सात तासांचा कंटाळवाणा प्रवास करून आल्यावर लगेचचं ते शूटिंगला उभे राहिले. जामखेडच्या ‘शेतकी निवासा’समोरच्या जागेत ‘हिंदुराव’च्या जाहीर सभेचं दृश्य चित्रीत करण्यात येणार होतं. जामखेडमधल्या सगळ्या हौशा-नवशांना या सीनमध्ये चमकण्याची संधी मिळणार होती. सगळं पटांगण तुडुंब भरलेलं. एरवी ‘टुरिंग’ टॉकिजमध्ये कनातीतला पिक्चर पाहणाऱ्यांना सिनेमा प्रत्यक्ष तयार कसा होतो हे पहिल्यांदा पहायला मिळत होतं. साखरसम्राट ‘हिंदुराव’च्या भूमिकेतले निळूभाऊ कडक कांजी केलेलं धोतर, सदरा, डोक्यावर गांधी टोपी (हे सगळं निळ्या रंगातलं. कारण ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमा.) अशा वेषात भाषण करू लागले. तेवढय़ात प्रेक्षकांतून ‘त्या मारुती कांबळेचं काय झालं?’ असा संतप्त सवाल आला. नंतर थोडा गोंधळ आणि सीन संपला. ‘सामना’ प्रदर्शित झाल्यानंतर हे दृश्य प्रचंड गाजलं. निळूभाऊंची प्रत्यक्ष अदाकारी बघण्याची संधी जामखेडकरांना यावेळी मिळाली. जामखेडच्या बाजारपेठेतल्या मेनरोडवरून निघालेली ‘हिंदुराव’ची वाजत-गाजत मिरवणूक जामखेडकरांना दीर्घकाळ लक्षात राहिली. निळूभाऊ भूमिका करत आहेत, हे सर्वजण विसरूनच गेले होते. ते खरेखुरे पुढारीच वाटत होते. सौताडा-रामेश्वर परिसरातही काही दृश्यांचं चित्रीकरण झालं. काही दिवसांनी ‘सामना’ प्रदर्शित झाला आणि प्रचंड गाजला. बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही तो दाखवला गेला. निळूभाऊंची कारकीर्द नंतर बहरतच गेली. त्यांच्या रूपेरी वाटचालीतला ‘सामना’ हा मैलाचा दगड ठरला. त्यांच्या आवडत्या भूमिकांपैकी ‘हिंदुराव’ ही भूमिका होती. ‘सामना’मुळे रामदास फुटाणे व जामखेडलाही नवी ओळख मिळाली. ‘सामना’पासून सुरू झालेला निळूभाऊंचा ऋणानुबंध जामखेडकरांशी अखेरपर्यंत कायम राहिला.
आहे.
लोहियांचा अनाथ मानसपुत्र
सामाजिक विषमतेने सतत अस्वस्थ होणारा माझा मित्र, डॉ. राममनोहर लोहियांचा अनाथ मानसपुत्र सोडून गेला आहे. ‘सामना’च्या शुटिंगला तो जामखेडला एसटीने प्रवास करीत आला होता. मराठी निर्मात्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी तो साध्या लॉजवर राहत असे. जेवणही साधे. त्याच्या डोक्यात कधीच हवा गेली नाही. ‘सामना’साठी त्याने जे सहकार्य केले ते मी कधीच विसरू शकणार नाही.
निळूभाऊंचा पंच्चाहत्तरीचा पहिला सत्कार नगरला संजीवनी खोजे मित्र परिवारातर्फे झाला होता. त्याच्या सर्व आठवणी थोडक्यात सांगणे फारच अवघड आहे. त्याच्या जाण्याने मराठी चित्रपट व रंगभूमीवरचा तारा निखळला.रामदास फुटाणे
(शब्दांकन-भूषण देशमुख)