Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

महापालिका रुग्णालयात फिल्म शूटिंगचा फंडा
जयेश सामंत

नवी मुंबई नवी मुंबई परिसरात एखादे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने पब्लिक-प्रश्नयव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर हिरानंदानी उद्योगसमूहास चालविण्यास दिलेल्या वाशी येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचा वापर आता हेल्थ केअरसोबत फिल्म शूटिंगसाठीही होऊ लागल्याचे उघड झाले असून मागील पाच दिवसांपासून आमीर खान आणि करिना कपूर यासारखे सिने कलावंत या रुग्णालयात तळ ठोकून आहेत. त्यामुळे नव्यानेच सुरू झालेल्या या रुग्णालयात रुग्णांपेक्षा आमीर आणि करिना यांना पहाण्यासाठी नवी मुंबईकरांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयाचा वापर अशा प्रकारे चित्रीकरणासाठी केला जावा का, याविषयी महापालिका आणि हिरानंदानी समूहात कोणत्याही प्रकारचा स्पष्ट करार करण्यात आलेला नाही.

राष्ट्रवादीला दोन धक्के
*शशिकांत भोईर काँग्रेसमध्ये
*पप्पू महाले मनसेत

नवी मुंबई, (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकांना जेमतेम काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन मोठे धक्के बसले आहेत. नवी मुंबईच्या माजी महापौर मनीषा भोईर यांचे पती व पावणे गावचे माजी नगरसेवक शशिकांत भोईर यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाला आव्हान देत थेट काँग्रेसची वाट धरल्याने येथील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईचे कमर्शियल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी सेक्टर १७ येथील राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका कलावती महाले यांचा सुपुत्र राजेंद्र महाले यांनीही दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

ओवळे गावातील रस्ता अपघाताच्या प्रतीक्षेत
पनवेल/प्रतिनिधी : पनवेल-उरण मार्गावरील ओवळे गावातील एका महत्त्वाच्या रस्त्यालगत चमत्कारिकपणे खोदाईचे काम करण्यात आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या धोकादायक परिस्थितीकडे शासनाच्या संबंधित खात्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. पनवेलपासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ओवळे गावातील डोंगरावर मोठय़ा प्रमाणात माती काढण्याचे काम सुरू आहे. डोंगर पोखरून समाधान होत नसल्याने या मंडळींनी थेट रस्त्यालगतच खोलवर उत्खनन सुरू केले आहे. रस्त्यालगतच्या या परिसरातून मोठय़ा प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्याने तेथे जवळपास २५ मीटरचा खड्डा पडला आहे. पनवेल आणि उरणदरम्यानचा हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असल्याने तेथून दररोज शेकडो गाडय़ांची वाहतूक होते. या रस्त्यालगत सुरक्षा कठडेही उभारण्यात न आल्याने दुर्दैवाने एखादी गाडी खड्डय़ात पडली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या खड्डय़ालगतचा रस्ता आधाराशिवाय खचला असून त्याला आणखी तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. खासगी कंत्राटदारांना रस्त्याजवळ खोदकाम करण्याची परवानगी कशी देण्यात आली, तसेच येथे एखादा अपघात घडला तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. या खड्डय़ात भराव टाकून तो पूर्ववत करणे शक्य नसल्याने रस्त्याच्या कडांना आधार द्यावा आणि तेथे कठडे बांधावेत, अशी सूचना ग्रामस्थांनी केली आहे. तहसीलदार, आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याप्रकरणी त्वरित लक्ष घालावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी केली आहे.

वीज कर्मचारी जाणार बेमुदत संपावर
पनवेल/प्रतिनिधी : पगारवाढीच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. ६० टक्के पगारवाढीच्या मागणीला प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीचे विद्युत मंडळ आणि आताच्या महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण कंपनीतील ९६ हजार कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा करार ३१ मार्च २००८ पासून प्रलंबित आहे. याबाबत वाटाघाटी सुरू असताना संयुक्त अधिकारी अभियंता, कामगार संघटना कृती समितीच्या वतीने ६० टक्के पगारवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र या वाटाघाटीनंतर प्रशासनातर्फे १ जुलै २००९ पासून १८ टक्के पगारवाढ आणि भत्त्यांमध्ये २० टक्के वाढ असा एकतर्फी प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला. यानंतर सर्व कामगार संघटनांनी मुंबईत संयुक्त बैठक घेतली आणि १० जुलैला द्वारसभा घेण्याचे ठरले. त्यानुसार पनवेलजवळील भिंगारी येथे झालेल्या द्वारसभेला सुमारे २५० कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता, शहर विभाग यांच्या कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करीत कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. प्रशासनाने तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापनात मध्यस्थी करून प्रस्तावित पगारवाढ द्यावी आणि कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कृष्णा भोयर, व्ही. एन. जितेकर, जयवंत पाटील, आर. पी. पाटील, प्रकाश माणिक, मानसी कान्हेरे, यू. के. बिराजदार, जे. बी. कोळी, रघुनाथ म्हात्रे आदी नेत्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

‘निळू फुले माणूस म्हणून अतिशय साधे’
पनवेल/प्रतिनिधी : ‘निळू फुले हे जेवढे थोर कलावंत होते, तेवढेच माणूस म्हणून अतिशय साधे होते, त्यांच्या निधनामुळे अभिजात अभिनयाचे एक पर्व संपले’, अशा शब्दांत प्रसिद्ध नकलाकार आणि निवेदक श्रीनिवास लखपती यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अनेक ठिकाणी आपण नकला सादर करतो; परंतु मराठी कलाकारांत निळूभाऊंच्या नकलेलाच सर्वाधिक प्रतिसाद मिळतो, असे त्यांनी सांगितले. त्यांचे फारसे चित्रपट न पाहिलेली मुलेही त्यांच्या नकलेची फर्माईश करतात, यातच त्यांचे मोठेपण कळते, असे ते म्हणाले. निळूभाऊंना भेटण्याचा एक-दोन वेळा योगही आला, त्यावेळी एवढा यशस्वी अभिनेता माणूस म्हणून किती साधा आहे, हेही जाणवले. माझ्यासारख्या नंतरच्या पिढीतील तरुणांशीही ते आपुलकीने चर्चा करीत, अशी आठवण त्यांनी सांगितली. झी टीव्हीवरील ‘हास्यसम्राट’ या कार्यक्रमात आपण सादर केलेल्या नकलांमध्येही त्यांच्याच नकलेला सर्वाधिक दाद मिळाली होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले.