Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

महापालिकेला निधीऐवजी हवे भूखंडाचे श्रीखंड!
सिडकोची सहावी योजना हस्तांतरण प्रक्रिया

प्रतिनिधी / नाशिक

सिडकोच्या शहरातील पाच योजना हस्तांतरीत करताना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विशिष्ट निधी घेण्याच्या पद्धतीत महापालिकेने आता फेरबदल केला असून सहाव्या योजनेच्या हस्तांतराकरिता निधीऐवजी सिडकोकडून १० कोटीचे भूखंड आपल्या नावे हस्तांतरीत करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तसेच या योजनेतील सर्व इमारतींना नव्याने पाण्याचे स्वतंत्र मीटर बसविणे, अतिक्रमण हटविण्यासाठी संयुक्त पाहणी अन् कारवाई, भूखंडांचे विनामूल्य हस्तांतरण अशा अटी व शर्ती या प्रक्रियेसाठी घालण्यात आल्या आहेत.

विविध मागण्यांसाठी नाभिक महामंडळाची निदर्शने
प्रतिनिधी / नाशिक

नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, मंडल आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
नाभिक महामंडळाचे अध्यक्ष भगवान बिडवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो सदस्य सहभागी झाले होते. राज्यातील नाभिक समाज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात दुर्लक्षित व उपेक्षित आहे, असा दावा संघटनेने केला.

नवीन घंटागाडय़ा वापराचा विषय पुन्हा एकदा लांबणीवर
प्रतिनिधी / नाशिक

महापालिकेने खरेदी केलेल्या नवीन घंटागाडय़ा जुन्याच ठेकेदाराला चालविण्यास देण्याच्या विषयावर स्थायी समितीच्या विशेष सभेत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करून सोमवारी झालेल्या सभेत हा विषय तहकूब ठेवण्यात आला. याप्रश्नी कोणताही निर्णय न झाल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून अक्षरश धूळ खात पडलेल्या नवीन घंटागाड्यांचा प्रत्यक्षात वापर करण्याचा विषय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.


नाशकात ऑगस्टमध्ये ‘वसुंधरा’ चित्रपट महोत्सव
नाशिक / प्रतिनिधी

निसर्ग समृद्धीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकची पुसट होत चाललेली ‘हरित नाशिक’ ही ओळख पुन्हा ठळक होण्याच्या उद्देशाने शहरातील पर्यावरण प्रेमींसह वसुंधरा क्लब आणि किलरेस्कर उद्योग यांच्या सहकार्याने येथील महाकवी कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनात येत्या ४ ते ९ ऑगस्ट दरम्यान ‘वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे आयोजक विवेक गरूड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘बाजार फी’च्या दरवाढीविरोधात टपरीधारकांचा मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक
महापालिकेने ‘बाजार फी’च्या दरात अचानक केलेली वाढ त्वरित रद्द करावी या मागणीसाठी सोमवारी फेरीवाला व टपरीधारक संघटनेच्या सदस्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. या प्रश्नी सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा छोटे विक्रेते व टपरीधारक बाजार फी न भरण्याचे आंदोलन हाती घेतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. भारतीय जनता कामगार महासंघाशी संलग्न असलेल्या फेरीवाला व टपरीधारक संघटनेचे अध्यक्ष सय्यद युनूस, सरचिटणीस राजेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो टपरीधारक व छोटे विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. सद्यस्थितीत बेरोजगार युवकांना ही दरवाढ परवडणारी नाही.

होर्डिगमुळे उड्डाण पुलावर अपघात; युवक जखमी
नाशिक, १३ जुलै / प्रतिनिधी

शहरातील अनधिकृत होर्डिग्जप्रश्नी महापालिकेची ढिम्म भूमिका आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागली असून गंगापूर रस्त्यावरील उड्डाणपुलावर लावलेले एक होर्डिग वाऱ्याने उडाल्याने रस्त्यावरून जाणारा एक वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. एका खासगी रुग्णालयात अतीदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असून शहराच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत होर्डिगमुळे हा प्रकार घडल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कनिष्ठ आशियाई तलवारबाजी स्पर्धेसाठी अजिंक्य दुधारेची निवड
नाशिक, १३ जुलै / प्रतिनिधी

सिंगापूर येथे १६ ते २२ जुलै या कालावधीत होणाऱ्या कनिष्ठ आशियाई तलवारबाजी स्पर्धेसाठी येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या अजिंक्य दुधारेची निवड झाली आहे. अजिंक्यने यापूर्वी भारतीय संघातून सिडनीत झालेली युथ ऑलिम्पिक स्पर्धा तसेच सेऊल, तुर्कस्तान, तैवान, मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षी त्याला भारतीय क्रीडा प्राधिकरणची १० हजार ८०० रूपये क्रीडा

भाषाशुध्दी कार्यशाळा
प्रतिनिधी / नाशिक

अखिल भारतीय साहित्य परिषद न्यास शाखेच्या वतीने जिल्ह्य़ातील भाषाप्रेमींसाठी एक दिवसीय शुध्दलेखन, मुद्रितशोधन आणि प्रतिशब्दलेखन कार्यशाळा दोन ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. सध्या मराठी व हिंदी या दोन भाषांसाठीच ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. भा. व्यं. गिरीधारी ९८२३०१२३०१, शीला डोंगरे ९४२०५८८१०४ आणि उज्ज्वला आगासकर ९३७१३८६९२५.


महाराष्ट्र अ‍ॅम्युचर किकबॉक्सिंग असोसिएशन व नाशिक जिल्हा अ‍ॅम्युचर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने नाशिक येथे पंच प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संतोष रॉय व भूषण ओहोळ यांनी मार्गदर्शन केले. या शिबीरासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ४५ खेळाडू व पंच उपस्थित होते. शिबीराच्या समारोपास महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव राहुल वाघमारे, जिल्हा सचिव राजू शिंदे, क्रीडा समन्वयक आनंद खरे, कार्याध्यक्ष अशोक दुधारे, संजय पाटील, हेमंत देशपांडे आदी उपस्थित होते.