Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

तांदळाच्या दरात दोन वर्षांत क्विंटलमागे हजार रुपयांनी वाढ
पुणे, १३ जुलै / प्रतिनिधी

पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यामध्ये पावसाने जून महिन्यात मारलेली दडी, त्यामुळे वेळेवर होऊ न शकणारी पेरणी आणि परिणामी दुबार पेरणीची शक्यता यामुळे सर्वसामान्यांच्या घरात शिजणाऱ्या डॅश, मसुरी, कोलमसारख्या तांदळाच्या दरात १५० ते २५० रुपयांनी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला आता चांगलाच भुर्दंड पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. किंबहुना सामान्यांच्या घरात बासमती नाही, पण कोलमसारख्या तांदळाची ‘बिर्याणी’ करून खाणेदेखील आता परवडणारे नाही, असेच चित्र निर्माण झाले आहे.

मागणी वाढल्याने साठवण टाक्यांच्या किमती वधारल्या
पुणे, १३ जुलै/ प्रतिनिधी

पाणीटंचाईमुळे शहरात पाणी साठविण्याच्या टाक्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. पाणीपुरवठा होत असलेल्या वेळेमध्ये साठवणुकीची व्यवस्था असलेल्या नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा साठा करण्यात येत असल्याने पाण्याचे समान वाटप होण्यात अडचण निर्माण होत आहे.
शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या धरणांमध्ये पावसाअभावी पाण्याचा साठा कमी झाल्याने शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर पाणीकपात करण्यात येत आहे. पाणीपुरवठय़ाबाबत प्रथमच अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शहरामध्ये दिवसाआड एकच वेळेस चार किंवा दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठय़ाची ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांकडून पाण्याचा साठा करून ठेवण्यात येत आहे.

उपयुक्त पाणीसाठय़ाला वरसगाव धरणात सुरूवात
पिण्यासाठी दीड महिना पुरेल एवढा साठा
पुणे, १३ जुलै / खास प्रतिनिधी
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा किंचित वधारला असून वरसगाव धरणात उपयुक्त पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील जलसाठा आता १.३२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे शहराला पिण्यासाठी दीड महिना पुरेल एवढा झाला आहे.

खासगी टँकर ताब्यात घेण्याची कारवाई सुरू
बारा टँकर ताब्यात घेतले
पुणे, १३ जुलै/प्रतिनिधी
शहरातील पाणीटंचाईच्या भागातील गरज भागविण्यासाठी महापालिकेने खासगी टँकर ताब्यात घेण्याची कारवाई आजपासून सुरू केली. खासगी ७८ टँकर ताब्यात घेण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला दिली असून त्यापैकी १२ टँकर आज ताब्यात घेण्यात आले.

शिवकालीन हर्णस गाव १०२ वर्षांनंतर पाण्याबाहेर
पुणे, १३ जुलै/ प्रतिनिधी

राजगड खोऱ्यातील वेळवंडी नदी कोरडी पडल्याने भाटघर धरणही कोरडे पडले आहे. त्यामुळे धरणाच्या इतिहासात तब्बल १०२ वर्षांनंतर प्रथमच धरणाच्या तळात बुडालेले शिवकालीन हर्णस गाव (ता. भोर) पाण्याबाहेर उघडे पडले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सहकारी सरदार बाबाजी हंबाजी अढळराव डोहर धुमाळ देशमुख यांचा वाडा, छत्रपती शिवरायांनी सरदार बाबाजी यांच्या मृत्यूनंतर इ. स. १६६९ मध्ये हर्णस गावातील सदरेवरून देशमुखी कारभाराचा निवाडा केला. ती ऐतिहासिक ‘सदर’, आदी शिवकालीन वास्तूंचे अवशेष पाण्याबाहेर दिसत आहे. मावळ खोऱ्यातील इतिहास संशोधक व लेखक दत्ताजी नलावडे यांच्या समवेत राजगड परिसर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब धुमाळ, लक्ष्मणअण्णा धुमाळ, हरिभाऊ धुमाळ, किशोर धुमाळ, रुपेश धुमाळ आदींनी या ऐतिहासिक वास्तूंच्या अवशेषांची नुकतीच पाहणी केली.

खडकी, बोपोडीतील रेल्वेच्या कारवाईस स्थगिती
खासदार सुरेश कलमाडी यांची मध्यस्थी
खडकी, १३ जुलै / प्रतिनिधी
खडकी व बोपोडी रेल्वेशेजारील बांधकामांवर पुणे रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात येणारी कारवाई खासदार सुरेश कलमाडी यांच्या मध्यस्थीमुळे स्थगित करण्यात आली. पुणे ते लोणावळा दरम्यान नवीन ट्रॅक उभारण्याकामी रेल्वेशेजारील बांधकामे हटविण्याची मोहीम पुणे रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात येत असून त्याअंतर्गत खडकी व बोपोडी येथील रेल्वेकडेच्या एकूण साधारणपणे दोनशे बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असून रेल्वेच्या वतीने या बांधकामधारकांना रविवार दि. १२ रोजी कारवाई करण्यात येणार असल्याची नोटीस बजावली होती.

पूर्णवाद नागरी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त
प्रशासक नियुक्तीचे सहकार खात्याचे आदेश
पुणे, १३ जुलै / खास प्रतिनिधी
गैरकारभार व गैरव्यवस्थामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला असून या पतसंस्थेवर सहायक निबंधक एन. डी. करे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जप्रकरण मंजूर न करता कोटय़वधी रुपयांचे वितरण, संचालकांच्या नातलगांना कमी दराने कर्ज आणि अत्यल्प कर्जवसुलीचा ठपका संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे.

सीमरन पवार ‘पिंपरी-चिंचवड लिटिल चॅम्प्स’
पिंपरी, १३ जुलै/ प्रतिनिधी

संत तुकारामनगर येथील स्वर्गीय राजेश बहल स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने माजी सत्तारूढ पक्षनेते व विद्यमान नगरसेवक योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेत काळेवाडी येथील सीमरन पवार हिने पिंपरी-चिंचवड लिटिल चॅम्प्स २००९ चा किताब जिंकला शालेय विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक नृत्याच्या या स्पर्धेत प्राथमिक फेरीमध्ये २८० स्पर्धकांची निवड झाली होती. त्यातून २० स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. आचार्य अत्रे रंगमंदिरात अंतिम फेरी पार पडली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोरे यांच्या हस्ते अंतिम फेरीचे उद्घाटन झाले. या वेळी शिक्षण मंडळ सदस्य मायला खत्री उपस्थित होते.

सहा हजार रुपयांची वाढ, मात्र प्रस्ताव अमान्य!
आंदोलन सुरूच ठेवण्याचा मार्डचा निर्णय
पुणे, १३ जुलै / प्रतिनिधी
अन्य राज्यांप्रमाणे विद्यावेतन वाढवून देण्याच्या मागणीसाठी संप पुकारणाऱ्या राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळापुढे सहा हजार रुपये वाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत ठेवण्यात आला असला तरी मार्ड संघटनेने तो अमान्य केला आहे. ही वाढ आम्हाला मंजूर नसल्याचे सांगत यापुढेही आमचा संप सुरुच राहणार असल्याची भूमिका राज्य मार्ड संघटनेने घेतली आहे.

पासवर्ड चोरून सहा लाखांचा अपहार
बँकेचे अध्यक्ष, सीईओ यांच्यासह दहाजण आरोपी
पिंपरी, १३ जुलै / प्रतिनिधी
पिंपरीच्या एचडीएफसी बँकेच्या एका खातेदाराच्या खात्यासाठी राखून ठेवलेल्या पासवर्डची इंटरनेटव्दारे चोरी करून सहा लाख चाळीस हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष, मुख्याधिकारी(सीईओ), व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह दहाजणांना आरोपी बनविण्यात आले आहे.

हत्ती अभ्यासक कॅटलिन ओ’कॉनेल
हत्ती आणि शेतकरी यांच्यातील संघर्षांबद्दल भारतात बरंच काही लिहिलं जातं. हत्ती आणि माणसातील संघर्ष हा खरंतर माणसाच्या भरमसाठ लोकसंख्यावाढीमुळे निर्माण झालेला प्रश्न आहे. किंबहुना पृथ्वीवरील अनेक आपत्तींना मानवी लोकसंख्यावाढच मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहे. आपल्याकडे जसा हत्ती आणि माणूस यांच्यात संघर्ष आहे, तसाच तो आशिया आणि आफ्रिकेतही आहे.इ.स. १९९२ मध्ये हा संघर्ष टाळण्यासाठी काय करता येईल याचा नामिबिया शासनाने अभ्यास करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी सरकारी समिती नेमली.

चार्जरची गरज नसलेला मोबाईल
मोबाईल फोनचा चार्जर विसरला, की काय डोकेदुखी होते हे त्याचा वापर करणाऱ्यांना चांगलेच ठाऊक असेल. याचे कारण म्हणजे सगळ्याच कंपन्यांच्या मोबाईलला चालू शकेल असा चार्जर नाही, त्यामुळे चार्जर जवळ बाळगणे क्रमप्राप्त ठरते. त्याला पर्याय म्हणून काही कंपन्यांनी एक करार करून युनिव्हर्सल चार्जर वापरात आणण्याची कल्पनाही मांडली व युरोपात त्या दिशेने प्रयत्न झाले. पण मुळात असा विचार कुणी केला नाही, की मोबाईल चार्जर हवाच कशासाठी पण तसेही मानायचे कारण नाही.

मॅक्सवेल - भाग १
मायकेल फॅरेडेला गणिताचं तसं वावडंच होतं. अगदी याउलट प्रकार म्हणजे जेम्स क्लार्क मॅक्सवेलच्या (१८३१-१८७९) बाबतीत होता. फॅरेडे प्रात्यक्षिकांचा राजा होता, तर मॅक्सवेल हा सिद्धांतांचा. मॅक्सवेलची फॅरेडेच्या मतांवर आणि त्याच्या कामगिरीवर नितांत श्रद्धा होती खरी. पण फॅरेडेच्या कामाचं सगळं स्वरूप प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकं करून बघायचं होतं, तर मॅक्सवेलचं सगळं काम म्हणजे घरबसल्या आपल्या डोक्यात अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या कल्पना मांडून त्यांच्या आधारे निष्कर्ष काढणं! दस्तुरखुद्द अल्बर्ट आईनस्टाईननं मॅक्सवेलचं वर्णन ‘न्यूटननंतरचा सगळ्यात मोठा भौतिकशास्त्रज्ञ’ अशा अर्थानं केलं होतं!

ब्रिटनच्या शिक्षणाबाबत शुक्रवारी पुण्यात मेळावा
पुणे, १३ जुलै/खास प्रतिनिधी

ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना तेथील व्यवस्था, सुविधा, बंधने इ.ची माहिती करून देण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. १७) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटिश कौन्सिलतर्फे आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम दुपारी दीड ते सहा या कालावधीत बंड गार्डनजवळील सन अ‍ॅण्ड सॅण्ड हॉटेलमध्ये होणार आहे. ब्रिटनची व्हिसाप्रक्रिया, त्यासाठी आवश्यक ठरणारी कागदपत्रे, प्रवासाच्या सुविधा, ब्रिटनमधील वातावरणामध्ये जुळवून घेण्याच्या ‘टिप्स’, अर्धवेळ काम करण्यासाठी देण्यात येणारी सवलत, तेथील आरोग्यविषयक सुविधा आणि विद्यार्थ्यांना घ्यावी लागणारी काळजी इ.विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या संदर्भात पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन ब्रिटिश लायब्ररीच्या संचालिका कजरी मित्रा यांनी केले-४१००५३००, ४१००५३१०. ई-मेल- bl.pune@in.britishcouncil.org

माजी मुख्याध्यापिका सुभद्राबाई वाघ यांचे निधन
हडपसर, १३ जुलै/वार्ताहर
महापालिकेच्या शाळेत ३३ वषार्ंहून अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुभद्राबाई देवराम वाघ (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. नानापेठ, रविवार पेठ, गणेश पेठ हडपसर इ. ठिकाणच्या गोर-गरीब, भटक्या विमुक्त, मागासवर्गीय मुला-मुलींच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहित करण्याचे मोलाचे कार्य केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून त्या महापालिकेच्या अभियंता संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र वाघ यांच्या मातु:श्री होत.

पाण्याच्या नियोजनासाठी कलमाडींकडून निधी
पुणे, १३ जुलै/प्रतिनिधी

पुण्यामधील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पाण्याच्या नियोजनासाठी खासदार सुरेश कलमाडी यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.या निधीमधून पुणे शहरामधील सर्व वॉर्डमध्ये आवश्यकतेनुसार बोअरवेल तयार करणे, विहिरींच्या पाण्याचा वापर, पाणी गळती रोखणे, भूगर्भातील पाण्याची साठवण वाढविणे, पिण्याचे व वापरण्याचे पाणी याचे नियोजन करणे यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार
पुणे, १३ जुलै / प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गेनबा सोपानराव मोझे संस्थेतील विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा जिल्हाधिकारी चंद्रकात दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध शाखांमधील ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तेरा विद्यार्थ्यांना या वेळी प्रशस्तिपत्रके व गौरवचिन्हे व दहा हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच ८० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या १२६ विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे व शालेय समिती अध्यक्षा अलका पाटील यांनी केले.

रिक्षाला धडक दिल्याचा बहाणा करून टेम्पोचालकास लुटले
पुणे, १३ जुलै / प्रतिनिधी

रिक्षाला धडक दिल्याचा बहाणा करत तीन अज्ञात चोरटय़ांनी टेम्पोचालकाला मारहाण करीत त्याच्याकडील पन्नास हजार रुपये चोरून नेले. कोंढव्यातील लुल्लानगर चौकात काल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.सुभाष सोनबा पठारे (वय ३०, रा. तुकाईदर्शन, हडपसर) यांनी याबाबत कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तीन अज्ञात चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसूत्रांनुसार, पठारे हे त्यांचा टेम्पो दूध आणण्यासाठी कात्रज येथे घेऊन चालले होते. ते लुल्लानगर चौकात पोहोचून सिग्नलवर थांबले असता, पाठीमागून रिक्षातून तीन अज्ञात व्यक्ती आल्या. टेम्पोची धडक रिक्षाला बसल्याचा बहाणा करून तिघा चोरटय़ांनी पठारे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. टेम्पोमध्ये ठेवलेले रोख पन्नास हजार रुपये चोरून चोरटय़ांनी तेथून पळ काढला. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. कदम याप्रकरणी तपास करीत आहेत.

‘स्वाइन फ्लू’चा पुण्यात अकरावा रुग्ण
पुणे, १३ जुलै / प्रतिनिधी

युथ एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आणखी एका विद्यार्थिनीला स्वाइन फ्लूच्या लक्षणामुळे नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सायंकाळी ‘स्वाइन फ्लू’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे पुण्यातील हा अकरावा स्वाइन फ्लूचा रुग्ण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.युथ एक्सचेंज कार्यक्रमाद्वारे शिकागोहून दिल्लीमार्गे पुण्यात परतणाऱ्या एका सोळा वर्षांच्या मुलाला याची लागण झाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयासह अन्य तिघांनाही लागण झाल्याने ही संख्या काल दहापर्यंत पोहोचली. याच चाळीस विद्यार्थ्यांच्या गटातील पुण्यातील एक सोळा वर्षांच्या मुलीला स्वाइन फ्लू झाल्याचा संशय आल्याने ती सकाळी नायडू रुग्णालयात दाखल झाली. तिच्या रक्तासह लाळेची तपासणी केल्यानंतर सायंकाळी राष्ट्रीय विषाणू संस्थेने तिला स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती नायडू रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. सुधीर पाठसुटे यांनी दिली.