Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

राज्य


मुरुडपासून २० कि.मी. अंतरावर असलेला फणसाड धबधबा पावसामुळे ओसंडून वाहत आहे.
या खळखळत्या धबधब्याचा पर्यटकही आनंद लुटत आहेत. (छाया: सुधीर नाझरे)

बंगालच्या उपसागरात हंगामातील पहिलेच कमी दाबाचे क्षेत्र
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
पुणे, १३ जुलै / खास प्रतिनिधी
या पावसाळ्यात सुमारे दीड महिने हुलकावणी दिल्यानंतर आता पहिल्यांदाच बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याचशा भागातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र पश्चिमेच्या दिशेने सरकले तर राज्यात किमान आठवडाभर मोठा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात ५३ टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या
पुणे, १३ जुलै / खास प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ांकडे पावसाने पाठ फिरविली असली तरी कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातील पेरणी ५३ टक्क्य़ांवर पोहोचली आहे. पुणे विभागातील दहा तालुक्यांसह राज्यात २२ तालुक्यांत अद्याप पुरेसा पाऊसच पडलेला नाही तर ११७ तालुक्यांत मध्यम पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने राज्यातील धरणांत १३ टक्के जलसाठा झाला आहे.

सीबीआयने आम्हाला माहिती दिलीच नाही -जयंत पाटील
उस्मानाबाद, १३ जुलै/वार्ताहर

पवन राजे हत्याकांडातील आरोपी जेव्हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात होते, तेव्हा आरोपी पारसमल जैन याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मारण्याची सुपारी दिल्याचा कबुलीजबाब दिला नव्हता. आरोपींना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी. बी.आय.) ताब्यात दिल्यानंतर अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट वृत्तपत्रांतूनच समजला.

‘या उपचाराहून रोग परवडला!’
प्रदीप नणंदकर, लातूर, १३ जुलै

‘मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह, भटके-विमुक्त यांच्याप्रमाणेच एड्सबाधितांसाठी वसतिगृह आणि शिक्षण याची स्वतंत्र सोय करण्यासंबंधी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत,’ असे धक्कादायक विधान जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप देशमुख यांनी केले. त्यांचे हे विधान म्हणजे ‘रोग परवडला पण उपचार नको’ या पठडीतलेच आहे. लातूरजवळील हासेगाव येथे सेवालय या वसतिगृहातील एड्सबाधित मुलांच्या शाळा प्रवेशाचा विषय गाजतो आहे. ‘ही मुले शाळेत आली तर आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही,’ असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.

आजचे शिक्षण ही धनिकांची मक्तेदारी - बोराडे
परभणी, १३ जुलै/वार्ताहर

आजची शिक्षण पद्धती अर्थकारणाशी निगडीत असून आता शिक्षण ही केवळ धनिकांची मक्तेदारी बनत आहे. त्यामुळे अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केली. कै. रावसाहेब विद्यालयात आयोजित बापूसाहेब जामकर स्मृती व्याख्यानमालेत बोराडे यांचे व्याख्यान झाले. संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बाळासाहेब जामकर यांनी केले.

निवसर रेल्वे स्थानकाला धोका कायम
सतीश कामत, रत्नागिरी, १३ जुलै

पाऊस कमी झाल्यामुळे निवसर स्थानकाच्या परिसरातील जमीन आणखी खचण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता असली तरी, मूळ दुखण्यावरील उपाय अद्याप न सापडल्यामुळे निवसर स्थानकास असलेला धोका कायमच आहे. कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी ते राजापूर या दरम्यान रत्नागिरीपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर निवसर रेल्वे स्थानक आहे. येथील भूगर्भीय रचनेमुळे जमिनीला भेगा पडून रेल्वे मार्ग खचण्याचे प्रकार गेली चार वर्षे कमी-जास्त प्रमाणात चालू आहेत. त्यावर उपाययोजनेसाठी कोकण रेल्वे महामंडळाचे आतापर्यंत सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले असले तरी याही वर्षी गेल्या आठवडय़ात जोरदार पाऊस सुरू झाल्यावर गेल्या बुधवारपासून (८ जुलै) रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमार्गालगत भेगा पडल्याचे

इमारतीचा भाग कोसळून पाच जण गंभीर जखमी
भिवंडी, १३ जुलै/वार्ताहर
कल्याण रोड परिसरातील शास्त्रीनगर येथील एका इमारतीचा पुढील गच्चीचा भाग व भिंत कोसळून दुर्घटना घडली. यात दोन अल्पवयीन मुले ढिगाऱ्याखाली अडकली असून महापालिकेची अग्निशमन व मदतयंत्रणा पोहोचण्यास उशीर झाल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना काढण्यात विलंब झाला. भिवंडी शहरातील शास्त्रीनगर भागात आज रात्रौ ८.४५ सुमारास इमारतीचा भाग कोसळून खाली उभे असलेली दोन मुले त्याखाली अडकली. परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने मदतकार्य पोहोचण्यास विलंब झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र अरुंद रस्ते यामुळे पालिकेचे बंब घटनास्थळी पोहचू शकत नाही. या घटनेत सुमारे ५ लोक जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोकणात पावसाची विश्रांती
रत्नागिरी, १३ जुलै/ खास प्रतिनिधी

सलग सुमारे १० दिवस अगोदर जोरदार बरसल्यानंतर कोकणात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण सरासरी २०.५ मिलीमीटर, तर सिंधुदुर्गामध्ये सरासरी २०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात फक्त दोन वेळा हजेरी लावलेल्या मान्सूनच्या पावसाने या महिन्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार पुनरागमन केले आणि त्यानंतर गेल्या शुक्रवापर्यंत (१० जुलै) या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जणू त्याने ठाणच मांडले. त्यामुळे गेल्या महिन्यातील कसर भरून काढली गेली. एवढेच नव्हे, तर आज अखेर गेल्या वर्षी झालेल्या सरासरी पावसापेक्षा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरासरी जास्त पाऊस पडला आहे. भातपिकांच्या लावणीच्या कामांना या पावसामुळे चांगला वेग आला असून, बहुतेक ठिकाणी या आठवडय़ाअखेपर्यंत लावण्यांची कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील नदी-नाले दुथडी भरून वाहात असून, चारा आणि पिण्याच्या पाण्याचीही टंचाई मिटली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तारापूर रस्त्यावरील बाणगंगा पुलास धोका
पालघर, १३ जुलै/ वार्ताहर

बोईसर- तारापूर रस्त्यावरचा बाणगंगा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष न घातल्यास अपघात होऊन जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे.
बोईसर-तारापूर या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. तारापूर अणुशक्ती केंद्राकडे जाणारा हा एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर पर्नाळी व पास्थळदरम्यान वाहणाऱ्या बाणगंगा नदीवरील पुलाचे कठडे तुटलेले असून, पुलाच्या खालच्या बाजूने लोखंड उघडे पडले आहे व त्या लोखंडाला गंजही चढला आहे. त्यातच हा पूल अरुंदही आहे. साहजिकच अवजड वाहनांसाठी हा पूल धोकादायक बनला असून, कठडे तुटल्याने पुलावरून वाहन नेणे धोक्याचे बनले आहे.
हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून पावसाळ्यापूर्वी या पुलाची पाहणी केल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. मात्र पुन्हा एकदा पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल, अशी माहिती येथील उपविभागीय अभियंत्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महाडमध्ये ‘जागतिक लोकसंख्यादिन’ साजरा
महाड, १३ जुलै/ वार्ताहर

शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या आदर्श विद्यालयात विश्वजनसंख्या दिन साजरा करण्यात आला. लोकसंख्यावाढीची कारणे आणि दुष्परिणाम या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. अभ्यासाबरोबर त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचप्रमाणे भारताचे विकसित राष्ट्रात रूपांतर घडवून आणण्यासाठी आपल्यासमोर कोणते ज्वलंत प्रश्न आहेत, याची कल्पना विद्यार्थीदशेतच त्यांना व्हावी, यासाठी ‘लोकसंख्यावाढीची कारणे व दुष्परिणाम’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसंख्यावाढीच्या कारणापेक्षा त्याच्या परिणामाचा प्रथम विचार करावा. लोकसंख्यावाढीचा नैसर्गिक साधनसंपत्तीवर आणि राष्ट्राच्या प्रगतीवर फार मोठा परिणाम होत असल्याचे प्रा. जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्रथम क्रमांक सागर पवार (दहावी), द्वितीय अक्षय महाडिक (नववी), तिसरा अंकुश बटे (आठवी) यांनी मिळविला.

चिपळूणच्या स्टेट बँकेत बनावट नोटांचा भरणा
चिपळूण, १३ जुलै/ वार्ताहर
चिपळूण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येथील शाखेत ११ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. ५०० च्या तीन आणि एक हजाराच्या १० नोटांचा त्यात समावेश आहे. अज्ञात ग्राहकाने या बनावट नोटा बँकेत जमा करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १ जानेवारी ०७ ते २१ मे ०९ या कालावधीत या नोटा बँकेत जमा झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बँकेचे त्यावेळचे कॅश ऑफिसर हरिभाऊ जाधव यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या कालावधीत अज्ञात ग्राहकाने या नोटा नकली असल्याची माहिती असूनही त्या खऱ्या आहेत असे भासवत चलनात आणून बँकेत भरणा करून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. २१ मे २००९ रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चिपळूण शाखेचे ऑडिट केले. त्यावेळी ५०० च्या तीन व एक हजारच्या १० नोटा बनावट असल्याचे दिसून आले. याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांनी पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहाराने संपर्क साधला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार येथील पोलिसांनी त्या अज्ञात ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रायगड जिल्ह्यातील मतदारयाद्यांचे पुनरीक्षण
अलिबाग, १३ जुलै / प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत छायाचित्र मतदारयाद्यांचे विशेष पुनरीक्षण करण्याचा कार्यक्रम सुरू झाला असून त्यानुसार विशेष मोहीम कार्यक्रम २२ जुलैपर्यंत होणार आह़े यासंदर्भात जिल्हाधिकारी सुभाष सोनवणे म्हणाले, पुनरीक्षण कार्यक्रमाची माहितीगावागावात देण्यात येत आह़े मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही,याची दक्षता घेण्यात येत आहे. दावे व हरकती स्विकारण्यासाठी १८ व १९ जुलै रोजी विशेष मोहीम होईल .

विद्यापीठ आयोगाकडून ‘उमवि’ला ६.९ कोटींचे अनुदान
जळगाव, १३ जुलै / वार्ताहर

विद्यापीठ अनुदान आयोगाकरवी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अकराव्या पंचवार्षिक योजनेर्तगत तब्बल ६ कोटी ९० लाखाचे अनुदान मंजूर झाले आहे. त्या संबंधीचे एक पत्र अलीकडेच उमविला प्राप्त झाले आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येथे प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली. नवी दिल्लीस्थित विद्यापीठ अनुदान आयोगाकरवी नेमलेल्या एका समितीने या संदर्भात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला गतवर्षांमध्ये भेट देवून पाहणी केली होती. त्याच समितीने केलेल्या शिफारशीअन्वये उमविला उपरोक्त अनुदान मंजूर झाले आहे. विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविधांगी विकास योजनांसाठी ६ कोटी ४७ लाख, एकत्रित योजनांच्या समुहासाठी तब्बल ३८ लाख आणि विद्यापीठाची अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.