Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

क्रीडा

आलमच्या शतकाने पाकिस्तानला आघाडी
कोलंबो, १३ जुलै/ वृत्तसंस्था

पहिल्या डावात ९० धावांमध्ये खुर्दा उडालेला असला तरी दुसऱ्या डावात मात्र सलामीवीर फवाद आलमच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर २८ धावांची आघाडी घेतलेली आहे. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या उमर गुल आणि फिरकीपटू सईद अजमल यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला श्रीलंकेला अडीचशे धावांच्या आतमध्ये रोखण्यात यश आले.

अ‍ॅशेस क्रिकेट मालिका
इंग्लंडच्या वेळकाढू धोरणावर पॉन्टिंग संतप्त
कार्डिफ, १३ जुलै/पीटीआय
पहिल्या अ‍ॅशेस कसोटीतील शेवटच्या दिवसातील नाटय़मय घटनांच्या खेळात इंग्लंड संघाच्या वेळकाढू धोरणामुळे खेळभावनेला तडा गेल्याची संतप्त प्रतिक्रिय ऑस्ट्रलियन संघाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग याने व्यक्त केली आहे. जेम्स अ‍ॅन्डर्सन आणि मॉन्टी पनेसार या इंग्लंडच्या शेवटच्या जोडीने ४० मिनिटे खेळून काढली आणि पराभव डोळ्यासमोर दिसत असतानाही कसोटी अनिर्णित राखण्याची किमया केली.

ब्रिटिश प्रसारमाध्यमांची इंग्लंडवर स्तुतीसुमने
लंडन, १३ जुलै/पीटीआय

जेम्स अ‍ॅन्डर्सन आणि मॉन्टी पनेसार या शेवटच्या जोडीने झुंजार फलंदाजी करून इंग्लंडला पराभवाच्या जबडय़ातून बाहेर काढत कसोटी अनिर्णित राखण्याची करामत केल्यानंतर ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी इंग्लंड संघाचे कौतुक केले आहे. ‘ग्रेट अ‍ॅशकेप’ अशा शब्दांत या पराक्रमाचे वर्णन करताना ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी याची तुलना दुसऱ्या महायुद्धातील ‘ऑपरेशन डायनामो’शी केली आहे. कॉलिंगवूडच्या मॅरेथॉन अर्धशतकी खेळीने ही कसोटी वाचविता येईल असा आशेचा किरण दाखविला आणि अ‍ॅन्डर्सन-पनेसार जोडीने ४० मिनिटे किल्ला लढवून त्याची मेहनत वाया जाऊ दिली नाही असे ‘द सन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

कसोटी अनिर्णीतावस्थेकडे वेस्ट इडिंज वि. बांगलादेश
किंग्सटाऊन, १३ जुलै / वृत्तसंस्था

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा शेवटचा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. बांगलादेशचे पाच विकेट्स झटपट तंबूत परतल्याने वेस्ट इंडिजपुढे सामना जिंकण्यासाठी २७७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. बांगलादेशच्या महमुदुल्लाने झटपट तीन विकेट्स घेतल्याने वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा मावळल्या. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्ट इंडिजची ५ बाद ११५ अशी अवस्था होती. त्यावेळी जिंकण्यासाठी त्यांना ४१ षटकांत १६० धावांची गरज होती.

पाकिस्तान संघात अंतर्गत गटबाजीला उधाण
इन्झमाम- उल- हकचा आरोप
कराची, १३ जुलै / पीटीआय
पाकिस्तान क्रिकेट संघात अंतर्गत गटबाजीला उधाण आले असल्याची खंत माजी कर्णधार इन्झमाम- उल- हक यांनी व्यक्त केली आहे. यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सुमार कामगिरी झाली, असेही तो म्हणाला.कर्णधार युनूस खान याला अजूनही सहकारी खेळाडूंमध्ये समन्वय साधता आला नाही , असा आरोपही त्याने केला. जर एखादा खेळाडू संघात स्वत:चा दबावगट निर्माण करीत असेल तर ही गंभीर बाब आहे. अशा खेळाडूवर क्रिकेट मंडळाने, संघव्यवस्थापनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही इन्झमामने ‘जंग’ शी बोलताना केली. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विजयाची संधी असूनही पाकिस्तानच्या फलंदाजांनी ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याने त्यांना हातातोंडाशी आलेला घास गमवावा लागला होता. यावर इन्झमाम म्हणाला, आमच्या संघात भरपूर क्षमता आहे. दीर्घकाळ खेळपट्टीवर राहणारे खेळाडूही आमच्याकडे आहेत. पण खेळात जीव ओतल्यास विजय सहज साध्य होतो.

विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करता आला नसल्याची आफ्रिदीला खंत
कराची, १३ जुलै/ पीटीआय
टे्वन्टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर लगेचच श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका सुरु झाल्याने विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करता आला नसल्याची खंत पाकिस्तानचा स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदी याने व्यक् त केली आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर किमान एक महिना तरी आम्हाला विश्रांतीासाठी मिळायला हवा होता , अशी भावनाही त्याने व्यक्त केली. पण लगेचच सामने असल्याने विश्रांती तर सोडाच पण विजयाचा आनंदही आम्हाला साजरा करता आला नाही. कदाचित सततच्या खेळामुळेच श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामध्ये आमची दमछाक झाली. नेहमीच चांगला खेळ करणे शक्य नसते. सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेशा विश्रांतीचीही गरज असते, असे आफ्रिदीने सांगितले.

उद्याचा बॉक्सिंग विश्वातला भारत ‘दादा’ - मनप्रीत सिंग
नवी दिल्ली, १३ जुलै/ पीटीआय
बॉक्सिंग विश्वात भारताने यंदाच्या विश्वात नेत्रदीपक कामगिरी केली असून ती आश्वासक वाटत आहे. त्यामुळेच उद्याच्या बॉक्सिंग विश्वातला भारत दादा बनेल असे मत भारताचा बॉक्सिंगपटू मनदीप सिंग याने व्यक्त केले आहे. यंदाच्या वर्षांत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील भारताची कामगिरी अन्य राष्ट्रांनी दखल घेण्यासारखी झालेली आहे. त्यामुळे अन्य देशांच्या नजरेत भारताचे चित्र पुरते पालटलेले असून ते आता पुरेसा मानसन्मान भारतीय बॉक्सिंगपटूंना देत आहेत आणि त्यामुळेच भारताचे भवितव्य उज्वल आहे, असे मनप्रीतने यावेळी सांगितले.मनप्रीतसह अमनदीप सिंग आणि अक्षय कुमार आज रशिया येथून पदक पटकावून भारतात परतले आहेत. मनप्रीतला ९१ वजनीगटात सुवर्णपदक गमवावे लागले. अंतिम फेरीत दुखापतीमुळे खेळू न शकल्याने मी फार नाराज आहे. त्यामुळे प्रतिस्पध्र्याला काहीही मेहनत न घेता पदक पटकाविता आले. जर मी पूर्णपणे फिट असलो असतो तर नक्कीच सुवर्ण पदक पटकाविले असते, असे मनप्रीतने सांगितले.

टेनिस मानांकनात अमृतराजची घसरण
नवी दिल्ली, १३ जुलै/ पीटीआय
न्यूपोर्ट येथील हॉल ऑफ फेम टेनिस स्पर्धेतील पराभवामुळे भारताच्या प्रकाश अमृतराज याची जागतिक क्रमवारीत २५४ व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली.अमृतराज याने गतवर्षी या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. यंदा तो दुसऱ्याच फेरीत पराभूत झाला. सोमदेव देववर्मन हा १३२ क्रमांकावरून १३५ व्या क्रमांकापर्यंत घसरला. युकी भांब्री हा ५३१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या लिएन्डर पेस हा सहाव्या क्रमांकावर असून, महेश भूपती हा आठव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या मानांकनात कोणताही बदल झालेला नाही. महिला गटात सानिया मिर्झा ८६ व्या क्रमांकावरून ८५ व्या क्रमांकावर सरकली आहे. मात्र दुहेरीत ती ४१ व्या स्थानावरून ४२ व्या क्रमांकावर आली आहे.

कनिष्ठ आशियाई स्पर्धेत राहुल आवारेला सुवर्ण
पुणे, १३ जुलै / प्रतिनिधी
मनिला (फिलिपिन्स) येथे ९ ते १२ जुलै दरम्यान झालेल्या कनिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत येथील गोकुळ वस्ताद तालमीतील पैलवान राहुल आवारे याने ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. फ्रीस्टाईल वजनी गटात मंगोलियाच्या खेळाडूला सलग दोन फे ऱ्याजिंकून पारभूत केले. त्यानंतर त्याने इराणच्या खेळाडूला ३ पैकी २ फे ऱ्या जिंकत अस्मान दाखविले. अंतिम फेरीत जपानच्या मल्लाला सलग दोन्ही फे ऱ्या जिंकून चीतपट करीत राहुलने सुवर्णपदक निश्चित केले. तो रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार याच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

५० मीटर बटरफ्लायमध्ये वीरधवल खाडेला रौप्यपदक
नवी दिल्ली, १३ जुलै/ पीटीआय
भारताच्या वीरधवल खाडे याने जर्मनीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील ५० मीटर बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक जिंकले.काल त्याने ५० मी.फ्रीस्टाईलमध्ये विक्रमासह सुवर्णपदकाचा वेध घेतला होता. खाडे याचे आजच्या शर्यतीमधील सुवर्णपदक एक शतांश सेकंदांनी हुकले. त्याने ही शर्यत २४.२८ सेकंदात पार केली. २००८ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत त्याने २४.२५ सेकंद वेळ नोंदवित राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आजची त्याची कामगिरी या वेळेपेक्षाही खराब झाली.खाडे याच्यासह भारताचे तीन खेळाडू २६ जुलै रोजी रोम येथे होणाऱ्या जागतिक जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

विकीज फिटनेस ट्रेनर कोर्स
मुंबई, १३ जुलै/क्री.प्र.
राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू विकी गोरक्ष यांच्या विकीज फिटनेस ट्रेनर्स बेसिक्स अ‍ॅन्ड स्पेशलायझेशन यांच्या मराठीतील फिटनेस ट्रेनर कोर्सच्या पुढील बॅचला जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रारंभ होत आहे. या कोर्सचा कालावधी दोन महिन्यांचा असून आठवडय़ातून दोन दिवस थिअरी तर रविवारी प्रॅक्टिकल्स असतील. अधिक माहितीसाठी ९८२०२५९५९३ येथे संपर्क साधावा.

पाकिस्तान निवड समितीच्या अध्यक्षपदी इक्बाल कासिम
कराची, १३ जुलै/ पीटीआय

पाकिस्तान क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदातची धुरा माजी कसोटीपटू इक्बाल कासिम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांना कनिष्ठ व वरिष्ठ संघ निवडीचे अधिकार सोपवण्यात आले आहेत. या समितीमध्ये सालेम जाफर, इजाज अहमद, अझहर खान, मोहम्मद इलिस यांच्यासह आसिफ बालोचा व फारुक खान यांचा समावेश करण्यात आला आहे.