Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

‘रेड सिग्नल’ला अडकलाय कल्याण रेल्वे टर्मिनस
अजून नाही सरल्या आशा..
भगवान मंडलिक
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील सुमारे साडे तीनशे एकर जमीन गेल्या ६०-७० वर्षापासून सडत पडली आहे. या ठिकाणी सुसज्ज कल्याण रेल्वे टर्मिनस उभे करावे, लाखो प्रवाशांची सोय करावी असे एकाही रेल्वेमंत्र्याला, अधिकाऱ्याला अजून वाटत नाही. कल्याण रेल्वे टर्मिनससाठी पाच-सहा वर्षापासून राजकीय मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत, पण त्यांच्याही प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. कल्याण पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला सलग सुमारे साडे तीनशे एकर जमीन आहे.

विधिमंडळ अंदाज समितीकडून आज ठाणे-कल्याण पालिकांची झाडाझडती
संजय बापट

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प उभारणाऱ्या ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने या निधीचा खरोखरच चांगल्या प्रकारे विनियोग केला आहे का, याची खातरजमा करण्याबरोबरच या दोन्ही महापालिकांच्या कारभाराची झाडाझडती घेण्यासाठी विधिमंडळ अंदाज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, उद्या आणि परवा ही समिती दोन्ही महापालिकांतील कामकाजाची तपासणी करणार आहे. यामुळे महापालिकांमध्ये खळबळ उडाली असून, गेले दोन दिवस सुट्टी असूनही सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र दिसत होते.

अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ - डॉ. पटवर्धन
ठाणे/प्रतिनिधी

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात मांडलेली उद्दिष्टे आणि अर्थसंकल्पापूर्वी सादर झालेला आर्थिक आढावा यांच्या आधारावर प्रसारमाध्यमांनी अर्थसंकल्पाबाबत जनसामान्यांच्या वाढलेल्या अपेक्षांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात पाहायला मिळत नाही, असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन यांनी व्यक्त केले.ठाणे भारत सहकारी बँकेच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प २००९-१०’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले होते.

विज्ञान व गणित परीक्षांत डोंबिवलीकर विद्यार्थी चमकले
डोंबिवली / प्रतिनिधी

पुणेस्थित सेंटर फॉर दि पॉप्युलरायझेशन ऑफ सायन्स व इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर स्टडीज इन मॅथेमॅटिक्स या संस्थांनी २००९ मध्ये घेतलेल्या अनुक्रमे विज्ञान व गणित विषयांच्या परीक्षांच्या निकालावर डोंबिवलीकर विद्यार्थ्यांनी आपल्या चांगल्या कामगिरीची छाप पाडली आहे. नुकतेच या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.यंदाच्या गुणवत्ता यादीत डोंबिवलीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविले आहेत.

रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महिला बचत भवनाचे लोकार्पण
ठाणे/प्रतिनिधी

महिला बचत गटांना एकाच छताखाली प्रशिक्षण देऊन उद्योगधंद्यांसाठी सक्षम बनविण्याकरिता ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने साकारलेल्या राज्यातील पहिल्याच महिला बचत भवनाचे लोकार्पण रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले.महिला बचत गटांसाठी पालिकेने खासगी सहभागाच्या माध्यमातून लक्ष्मी पार्क येथे दोन मजली भव्य बचत भवन उभारले आहे.

४२ हजार विद्यार्थी पाठय़पुस्तकांपासून वंचित
मनसेने दिली प्रशासनाला मुदत

ठाणे/प्रतिनिधी

ठाणे शिक्षण मंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पालिका शाळांमधील ४२ हजार विद्यार्थ्यांना महिनाभरापासून पाठय़पुस्तकांविना शाळेत जावे लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन मनसे स्टाइलने आंदोलन छेडण्यापूर्वी आठवडाभराची मुदत दिली आहे.

प्रस्तावित महापालिकेमुळे ठाणे जि.प. सदस्यांवरही संक्रांत!
राजीव कुळकर्णी

वसई, विरार, नवघर-माणिकपूर व नालासोपारा या चार नगर परिषदा बरखास्त करून वसई-विरार महापालिका स्थापन करण्याच्या निर्णयामुळे पंचायत समितीच्या १४, तर ठाणे जिल्हा परिषदेतील ६८ पैकी सात जणांचे सदस्यत्वही रद्द झाले आहे. तसेच यातील दोन जण जिल्हा नियोजन समितीवर निवडून गेल्याने तेथील पदही त्यांना गमवावे लागणार आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्याने अध्यक्षांसह विविध समित्यांचे सभापती लवकरच बदलेले जाणार होते,

गरिबांना केवळ १५ रुपयांत वीजजोडणी
ठाणे/प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या सहकार्याने महावितरणच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत दारिद्रय़ रेषेखालील व्यक्तींना आता केवळ १५ रुपयात वीजजोडणी मिळणार आहे. या १५ रुपयात केवळ वीजजोडणीच नव्हे, तर सोबत प्रत्येकी १६ व्ॉटचा एक सीएफएल दिवा आणि घरातील दीड पॉइंटची वीज फिटिंगही मिळणार आहे. या योजनेचा लाभ कल्याण परिमंडलातील एक लाखापेक्षा अधिक लोकांना होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता बी. बी. पाटील यांनी दिली.टर्न की बेसिसवर करण्यात येणाऱ्या सदर योजनेंतर्गत कल्याण परिमंडलात सुमारे ५६ कोटीची कामे होणार आहेत. या योजनेत कल्याण मंडल २ मध्ये २०१ वितरण रोहित्रे, ६३ किमी लांबीची लघुदाब सिंगल फेज वाहिनी तर १८२ किमी लांबीची लघुदाब थ्री फेज वाहिनी उभारण्यात येणार असून दारिद्रय़ रेषेखालील २९३९८ लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

श्रमजीवींचा तहसील कार्यालयावर मोर्चा
वाडा/वार्ताहर
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या मजुरांना काम दिले जात नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो मजुरांनी वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा आणून हल्लाबोल केला. ‘काम द्या, नाहीतर रोजगार द्या’ ही मागणी घेऊन चार तास वाडा तहसीलदार संतोष शिंदे यांना घेराव घातला.तालुक्यात ५३ हजार मजुरांची नोंदणी करण्यात आली असून, प्रत्येक मजुराला किमान १०० दिवस रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तालुक्यातील मांगरुळ, खोडदे, घोडमाळ, जामघर, आबंढे येथील आदिवासी मजुरांनी सरकारकडे प्रत्यक्ष कामाची मागणी केली होती.कामांची मागणी करून महिना उलटला तरी स्थानिक प्रशासनाने या मजुरांना काम दिले नाही. काम न मिळालेल्या मजुरांना बेकारी भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. नोंदणी केलेल्या व कामाची मागणी केलेल्या मजुरांना येत्या २० जुलैपर्यंत बेकार भत्ता देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन तहसीलदार शिंदे यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश धोडी, कार्याध्यक्ष केशव नानकर, जिल्हा चिटणीस विजय जाधव यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या अध्यक्षपदी सतीश जगताप
बदलापूर/वार्ताहर
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष म्हणून सतीश जगताप यांची अलीकडेच नियुक्ती झाली.क्लबचे यंदा ५१ वे वर्ष आहे. जिल्हा प्रश्नंतपाल जयंत कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये वडवली येथील रोटरी सभागृहात झालेल्या क्लबच्या शपथग्रहण सोहळ्यात क्लबचे माजी अध्यक्ष अजय दालमिया यांच्याकडून जगताप यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. गणेश केळुस्कर सरचिटणीस म्हणून, तर संजय पानसे खजिनदार म्हणून काम पाहणार आहेत.क्लबतर्फे राबविण्यात येत असलेली इको फ्रेंडली गणेश दर्शन स्पर्धा यंदाही पुढे राबविण्यात येणार आहे. याशिवाय पाण्याच्या ज्वलंत समस्येवर तोडगा निघावा यासाठी नागरिकांमध्ये पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत क्लब कार्यरत राहणार असून, आदिवासी वाडय़ांमध्ये आरोग्य चिकित्सा राबविणे आदी उपक्रम आगामी वर्षात करण्याचा मनोदय जगताप यांनी व्यक्त केला.

टाटा सुमो मालकाची हत्या
भिवंडी/वार्ताहर: गाडीला भाडे असल्याचे सांगून सकाळी घरातून निघालेल्या टाटा सुमाचे चालक-मालक असलेल्या इसमाची गळा आवळून हत्या केल्याची घटना सांपे-तळवली गावच्या हद्दीत गुरुवारी उघडकीस आली. टेमघर येथील सलीम मोहम्मद अन्सारी (३५) हा त्याच्या मालकीची टाटा सुमो भाडय़ावर चालवित असे. बुधवारी त्यास भाडे असल्याचे सांगून तो घरातून गाडी घेऊन निघाला होता. सुमो गाडी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांपे गावाशेजारी कल्याण- पडघा रोडच्या बाजूला दोन दिवसांपासून उभी होती