Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

दिल्ली मेट्रो पुलाच्या ठिकाणी पुन्हा क्रेन कोसळली
सहा जखमी
नवी दिल्ली, १३ जुलै/पीटीआय

 

दिल्ली मेट्रोचा पूल काल ज्या ठिकाणी कोसळला त्याच ठिकाणी आज क्रेन कोसळण्याची दुर्घटना घडली. त्यात सहाजण जखमी झाले आहेत. मेट्रोचा पूल कोसळल्याच्या ठिकाणी ढिगारा उपसण्याचे काम ही क्रेन करीत होती, त्यावेळी ही क्रेन कोसळली. काल दक्षिण दिल्लीतील जमरूदपूर येथे झालेल्या दुर्घटनेत बांधकाम चालू असलेला पूल कोसळून सहाजण ठार झाले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रेन कोसळण्याची ही घटना यांत्रिक चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे यापुढे अधिक चांगल्या क्रेन वापरल्या जातील याची दक्षता घेण्यात येईल.
दरम्यान, दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष ई.श्रीधरन यांनी काल राजीनामा दिला होता, पण तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आज ही दुसरी दुर्घटना घडल्यानंतर ते लगेचच घटनास्थळी पोहोचले. दुपारच्या सुमारास ही क्रेन कोसळली. एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, ट्रॉमा सेंटरमध्ये सहा जखमी लोकांना दाखल करण्यात आले असून, ते किरकोळ जखमी आहेत. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी मात्र कुणीही जखमी झाले नसल्याचे म्हटले आहे. एकूण चार क्रेन घटनास्थळी होत्या. त्यातील एक क्रेन गर्डर उचलून दुसरीकडे देत असताना कोसळली.
क्रेन ऑपरेटरला लाँचरच्या वजनाचा अंदाज आला नाही व त्यामुळे हा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षाकडे केले आहे. अपघातानंतर लाँचरही दोन क्रेनसह कोसळला. त्याच्या वायर्सही तुटल्या, असे प्रत्यक्ष ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले. क्रेन कोसळल्यानंतर तेथे काम करणारे कर्मचारी भीतीने सैरावैरा पळाले.