Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचा मेट्रो रेल्वेवर दबाव नाही : रेड्डी
नवी दिल्ली, १३ जुलै/खास प्रतिनिधी

 

पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी दिल्ली मेट्रो रेल्वेचे जाळे पसरण्यासाठी कोणतीही घाई करण्यात येत नसून सुरक्षेलाच सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे आज केंद्रीय नगरविकास मंत्री जयपाल रेड्डी यांनी लोकसभेत जाहीर केले. पण लोकसभेत निवेदन करण्यापूर्वीच लाजपतनगर बाजारपेठेत कालच्याच ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला पुन्हा अपघात घडून सहा जण जखमी झाले.
दरम्यान, मेट्रो रेल्वेच्या कामगिरीला कलंकित करणाऱ्या रविवारच्या अपघातानंतर दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या प्रमुखपदाचा दिलेला राजीनामा आज ई. श्रीधरन यांनी मागे घेतला. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी ७७ वर्षीय श्रीधरन यांचा राजीनामा नामंजूर करताना त्यांनी या पदावर कायम राहावे, अशी विनंती केली होती. श्रीधरन यांनी राजीनामा मागे घेत लाजपतनगरच्या जमरुदपूरच्या अपघातग्रस्त स्थळाला भेट दिली आणि मदतकार्याचा आढावा घेतला. पण श्रीधरन परत गेल्यानंतर मदतकार्यात जुंपलेल्या चार क्रेननी संतुलन गमावल्याने लाँचर कोसळून त्याच ठिकाणी पुन्हा अपघात झाला. आजच्या अपघातात दोन अभियंत्यांसह सहा जण जखमी झाले. रविवारी पहाटे याच ठिकाणी मेट्रो रेल्वेचा पूल कोसळून एका अभियंत्यासह सहा जण ठार झाले होते, तर ३० जण जखमी झाले. रविवारच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र व दिल्ली सरकारने चार तज्ज्ञ सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून ही समिती येत्या २२ जुलैपर्यंत आपला अहवाल सादर करणार असल्याचे जयपाल रेड्डी यांनी आज लोकसभेत सांगितले. भाकपनेते गुरुदास दासगुप्ता यांनी हा मुद्दा उपस्थित करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदतीचे दडपण टाकले जात असल्याचा आरोप केला. पण दासगुप्ता यांचा आरोप फेटाळून लावताना मेट्रो रेल्वे प्रकल्पावर असे कोणतेही मुदतीचे दडपण नसल्याची ग्वाही रेड्डी यांनी दिली. रविवारच्या अपघातासाठी कंत्राटदार कंपनी गॅमन इंडियाने दाखविलेला निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचे म्हटले जात असले तरी या प्रकल्पातून गॅमन इंडियाची हकालपट्टी होणार नसल्याचे संकेत डीएमआरसीच्या सूत्रांनी दिले आहेत. यापूर्वी १९ ऑक्टोबर २००८ रोजी पूर्व दिल्लीतील विकासमार्ग, लक्ष्मीनगर येथे झालेल्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या अ‍ॅफकॉन या कंपनीचेही कंत्राट रद्द करण्यात आले नव्हते. जगभरात मेट्रो रेल्वेच्या निर्माण कार्यात घडलेल्या अपघातांमध्ये लंडन मेट्रोचा निर्देशांक ०.३२, तर सिंगापूर मेट्रोचा निर्देशांक १.१ इतका आहे. सिंगापूरच्या तुलनेत डीएमआरसीचा निर्देशांक ०.४ इतका असून हे प्रमाण निश्चितच समाधानकारक आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.