Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

विषारी दारू दुर्घटना
दारूत मिथेनॉलचे प्रमाण जास्त असल्याने मृतांची संख्या वाढली
अहमदाबाद १३ जुलै/पीटीआय

 

अहमदाबाद येथील विषारी दारू दुर्घटनेत १३० पेक्षा अधिक लोक मरण पावले असून या देशी दारूत मेथिल अल्कोहोल व मिथेनॉल मिसळल्याने प्राणहानी जास्त प्रमाणात झाली, असे सरकारी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
सरकारी रूग्णालयाचे सहाय्यक प्रशासक डॉ.गौतम शर्मा यांनी सांगितले की, मिथेनॉल हे मानवी पचनासाठी घातक असते व अनेक रूग्णांच्या शवविच्छेदनात ते सापडले आहे.
इतर रूग्णालयातून शवविच्छेदनाचे अहवाल सरकारी रूग्णालयात आणण्यात आले. त्यात मेथॅनॉलचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. दारू दुर्घटनेनंतर गांधीनगर येथील फोरेन्सिक सायन्स संचालनालयात रूग्णांचा व्हिसेरा आणण्यात आला होता तसेच विषारी दारूही तपासणीसाठी आणण्यात आली होती त्याचे अहवाल अजून देण्यात आलेले नाहीत. फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजचे संचालक डॉ.जे.एम.व्यास यांनी सांगितले की, रूग्णांच्या व्हिसेऱ्याचे जे नमुने आणले होते त्यांचा तपासणी अहवाल लवकरच दिला जाईल. मेथॅनॉल हा रंगहीन द्रव असून त्याला अल्कोहोलसारखा सौम्य वास असतो. मानवी पचनास ते अपायकारक असते. अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये या मेथॅनॉलचा वापर केलेला असतो. विंडशिल्ड वॉशर फ्लुईडमध्येही ते वापरले जाते दारूत इथॅनॉल वेगवेगळ्या मात्रेत वापरले जाते. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस दारू विक्रेत्यांनी मेथॅनॉल कुठून आणले याचा शोध घेत आहेत. खुल्या बाजारात हे मेथॅनॉल मिळत नाही. विषारी दारू दुर्घटनेत एकूण २०० पेक्षा अधिक लोकांना बाधा झाली असून त्यात १३० जण मरण पावले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर छापे टाकले होते. मजूर गाम व ओढाव या दोन गावांत ही घटना घडली होती, तेथे दारू विक्री करणाऱ्या तीन महिलांना तसेच इतर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या विषारी दारूचे उत्पादन करणारा खेडा जिल्ह्य़ातील महेमदाबाद येथील रहिवासी विनोद चौहान उर्फ डागरी याला ताब्यात घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात अहमदाबादच्या सहा तर महेमबादच्या चार पोलीस अधिकाऱ्यांना सरकारने निलंबित केले आहे.