Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

आसाममध्ये स्फोटात कर्नलसह दोन ठार
तेझपूर, १३ जुलै/पीटीआय

 

आसाममधील सोनितपूर जिल्ह्य़ात संशयित बोडो अतिरेक्यांनी एक वाहन स्फोटकांनी उडवल्याच्या घटनेत कर्नल दर्जाचा डॉक्टर व एक जवान ठार झाले.
संरक्षण सूत्रांनी सांगितले की, भालुपुंगनजीक चारीद्वार येथे जंगलात सकाळी साडेसहा वाजता हा स्फोट झाला. हे दोन लष्करी अधिकारी लष्कराच्या रुग्णवाहिकेबरोबरअसलेल्या वाहनातून तेझपूर येथून अरुणाचल प्रदेशातील टेंगाकडे जात होते. जवळच्या एका घरात ही स्फोटके उडवण्यात आली त्याचा परिणाम एवढा मोठा होता की, लष्कराचे हे वाहन पूर्ण उद्ध्वस्त झाले. स्फोटाच्या ठिकाणी साडेचार फूट रुंद व दीड फूट खोल खड्डा पडला. मरण पावलेल्या लष्करी अधिकाऱ्याचे नाव कर्नल एस.एम.पेरूमल असे असून ते लष्कराच्या हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर होते. जपान अश्विनी कुमार हे नाईक पदावर काम करीत होते व ते वाहन चालवित होते, असे सूत्रांनी सांगितले.
रुग्णवाहिका मात्र सुरक्षित राहिली असून या स्फोटाची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा स्फोट ज्या घरात झाला त्याचे मालक जिबॉन बसुमतराय व आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून स्फोटानंतर पोलिसी छळाच्या भीतीने बोडो लोक या भागातून पळून गेले आहेत.