Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानातील मदरशात स्फोट; १६ ठार
इस्लामाबाद, १३ जुलै/पीटीआय

 

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका छोटय़ा खेडय़ातील मदरशात झालेल्या बॉम्बस्फोटात काही मुलांसह सोळाजण ठार झाले असून, इतर १२० जण जखमी झाले आहेत. या मदरशात बॉम्ब तयार करण्यात येत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण पंजाबमध्ये मियाँ छानू नजीकच्या एका खेडय़ात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजण्याच्या अगोदर हा स्फोट झाला. मदरसा शिक्षक रियाझ अली यांच्या घरात स्फोटके ठेवलेली होती. त्यामुळे हा स्फोट झाला, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या गटाचा अली हा सदस्य होता. पोलीस व मदत सेवा अधिकाऱ्यांनी वार्ताहरांना सांगितले की, सोळाजण या स्फोटात ठार झाले. त्यात काही मुलांचाही समावेश आहे.
खानेवाल जिल्ह्य़ाचे आरोग्य अधिकारी मुहंमद युसूफ सुमरा यांनी सांगितले की, आणखी काही मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला हे लगेच समजू शकले नाही. मदतकार्य करणाऱ्यांना घटनास्थळी तोफगोळे, बॉम्ब व हातबॉम्ब व रॉकेट सापडले आहेत. मदरशात बॉम्ब तयार केले जात होते, असे सांगण्यात येते. स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, १२० जणांना उपचारांसाठी येथे आणण्यात आले. त्यापैकी चाळीसजणांना दाखल करून घेण्यात आले आहे. काहींना प्रथमोपचारानंतर घरी पाठवण्यात आले. मियाँ छानू नजीकच्या सर्व रुग्णालयांत तातडीची सेवा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हरकत अल इस्लामी या दहशतवादी संघटनेच्या काही कॅसेट व प्रचार साहित्य घटनास्थळी सापडले असून, ते सर्व जिहादी साहित्य आहे. या स्फोटामुळे ४० फूट रुंद व आठ फूट खोल खड्डा पडला आहे, तसेच किमान २५ घरे कोसळली आहेत. एक मदरसा व आरोग्य केंद्राची इमारतही कोसळली. घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. ढिगारा उपसण्याची यंत्रे नसल्यानेही अनेक अडचणी आल्या. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी या स्फोटाचा निषेध केला असून, या घटनेची चौकशी करून गुन्हेगारांना शासन करण्याचे आदेश दिले आहेत.