Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पश्चिम विदर्भात दमदार पाऊस
वाशीम, १३ जुलै / वार्ताहर

 

विदर्भातील अकोला, बुलढाणा. अमरावती जिल्ह्य़ासह वाशीम शहरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ात यावर्षी सद्यस्थितीत मागील वर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक असला तरी जिल्ह्य़ातील धरणे, सिंचन तलाव, गावतळी, विहिरी भरण्यासाठी पुरेसा नसल्याने जिल्ह्य़ाच्या काही भागात अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
वाशीम जिल्ह्य़ात मागीलवर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला. वाशीम, मालेगाव, रिसोड तालुक्याच्या तुलनेत मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा (लाड) तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस पडला. विशेषत: कारंजा तालुक्यात तर अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला होता. मागीलवर्षी जिल्ह्य़ातील ६९७ गावांपैकी २४७ गावांमध्ये कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती घोषित करण्यात आली होती. कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील बहुतांश गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती. या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरीचे खोलीकरण करणे, अधिग्रहण करणे व अन्य उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या.
जिल्ह्य़ात यावर्षी मृगनक्षत्र कोरडे गेल्यानंतर आद्र्रा नक्षत्राच्या प्रश्नरंभी मान्सूनचे आगमन झाले. जिल्ह्य़ात मागीलवर्षी १३ जुलैपर्यंत सरासरी १३६.५२ मि.मी. पाऊस पडला होता. त्यामध्ये वाशीम तालुक्यात १८२.४ मि.मी., मालेगाव १२७ मि.मी., रिसोड १५५ मि.मी., मंगरूळपीर ११७.२ मि.मी., मानोरा १३८ मि.मी., कारंजा तालुक्यात ९९.५ मि.मी. पाऊस पडला होता.
यावर्षी जिल्ह्य़ात १३ जुलैपर्यंत १६० मि.मी. सरासरी पाऊस पडला आहे. यामध्ये वाशीम तालुक्यात १४५ मि.मी., मालेगाव १४५ मि.मी., रिसोड १५८.४० मि.मी., मंगरूळपीर १४८.८० मि.मी., मानोरा १३८ मि.मी. आणि कारंजा तालुक्यात २४३.७० मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्य़ात मागीलवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत जास्त पाऊस पडला असला तरी नदी, नाल्यांना पाणी वाहून जाण्यासारखा पाऊस झाला नसल्याने यावर्षी खरीप पिके चांगल्या अवस्थेत आहेत. जिल्ह्य़ातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी धरणे, सिंचन तलाव, विहिरीच्या जलसाठय़ांमध्ये वाढ होण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे.

शेततळ्यात बुडून दोन विद्यार्थिनींसह तिघांचा मृत्यू
अंजनगावसुर्जी, १३ जुलै / वार्ताहर

तालुक्यातील भंडारज येथील शेततळ्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे, तर लगतच्या रामागड येथे रविवारी दोन विद्यार्थिनींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. भंडारज येथील गणेश केळाजी दाणे यांच्या शेतामधील शेततळ्यात फिरोज याकुब (१९) हा युवक आंघोळीसाठी गेला असता तळ्यातील पाण्यात बुडाला. दर्यापूर तालुक्यातील रामागड येथील लोणकर यांच्या शेतातील शेततळ्यात भारती प्रभाकर पेठे व दीपाली राजेश रामागडे या दोन विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात चांगला पाऊस पडत आहे. सोमवापर्यंत १५८.०२ मि.मी. पाऊस झाला असून गेल्यावर्षी आज तारखेस १२२ मि.मी. पाऊस झाला होता. पावसाने गेल्यावर्षीचा पर्जन्यमानाचा आकडा ओलांडला असला तरी येथील शहानूर धरण मात्र अद्याप कोरडेच असून धरणातील जलसाठा केवळ १४.७० एवढाच आहे.