Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्रात समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार -अबु आझमी
अकोला, १३ जुलै / प्रतिनिधी

 

विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्षाने स्बळावर मोठय़ा संख्येने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमासाठी अबु आझमी अकोल्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेस सरकारवर टीका केली. ते म्हणाले, महागाई, भारनियमन, पाणी टंचाई हे प्रश्न सोडविण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली आहे. महागाईवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आले नाही. त्यामुळे देशातील सामान्य माणसाला दोन वेळचे पोट भरणे कठीण झाले आहे. अल्पसंख्यांकांच्या विरोधात काँग्रेस सरकारने निर्णय घेतले आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोटाची झळ पोहचलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी केवळ एक लाख तर अन्य ठिकाणी अशा घटनांमध्ये पाच लाखाहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. हा भेदभाव योग्य नाही. दहशतवादाची कारणे शोधून त्यावर उपाय करण्याऐवजी तो संपविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पातळीवरही सरकारचे अपयश स्पष्ट झाले आहे.
सिमी या संघटनेवरील बंदी न्यायालयाने उठवली असताना, सरकारने सर्वोच्च न्यायालयातून पुन्हा स्थगिती मिळवली. हे प्रकार अल्पसंख्यांकांवर अन्याय क रणारे आहेत, जातीयवादी संघटनांवर बंदी आणण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. अशा संघटनांवरही बंदी यायला हवी, असे ते म्हणाले.
काँग्रेससोबत कोणत्याही परिस्थितीत युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठय़ा संख्येने समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे अबु आझमी यांनी सांगितले. यावेळी अण्णासाहेब खंदारे, परवेज सिद्धीकी, अफजल फारुख, माया चौरे, डॉ. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते.