Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

चिमूर मतदारसंघात तीन वर्षात ७५ टक्के शेतजमिनीला बारमाही पाणी -वडेट्टीवार
चंद्रपूर, १३ जुलै/प्रतिनिधी

 

सिंचनाच्या बाबतीत राज्यात सर्वात प्रगत समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये ६५ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. या उद्दिष्टाच्या वर जात चिमूर मतदारसंघात येत्या तीन वर्षात ७५ टक्के शेतजमिनीला बारमाही पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चिमूर तालुक्यात आमडी येथे सांगितले. लालनाला उपसा सिंचन प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
गोसीखुर्द तसेच लालनाला प्रकल्पातील विविध योजनांचे भूमिपूजन आज दुपारी वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या निधनामुळे जलसंपदा मंत्री अजित पवार येऊ न शकल्याने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध योजनांचे भूमिपूजन वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष वामनराव कासावार, हिंगणघाटचे आमदार राजू तिमांडे, भद्रावतीचे आमदार संजय देवतळे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.
भूमिपूजनानंतर आमडी येथे आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवारांनी चिमूर विधानसभा मतदारसंघातील विविध सिंचन प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली. या परिसरातील १२ गावे गेल्या अनेक वर्षापासून पाण्यावाचून वंचित होती. आता या उपसा प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केवळ तीन महिन्याच्या आत या प्रकल्पाचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळवली. आता येत्या काही महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.
राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यामुळेच केवळ काही महिन्यात ५०० कोटींच्या योजना मार्गी लागू शकल्या, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांवर मागे लष्करी अळीचे संकट आले तेव्हा आमच्या प्रयत्नामुळे या क्षेत्राला ८५ कोटींची मदत मिळाली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बारामती लोकसभा मतदारसंघात ६५ टक्के शेतीला पाणी मिळते.
या भागातील शेतकऱ्यांच्या ७५ टक्के शेतीला येत्या तीन वर्षात पाणी मिळवून देऊ व त्यामुळे शेतकरी बारमाही पिके घेऊ शकतील, असे वडेट्टीवार म्हणाले. गेल्या वेळी जनतेने वीस हजाराच्या मताधिक्याने निवडून दिले होते. यामुळे जनता जोवर नाकारत नाही तोवर आपल्या विकास कामाचा धडाका सुरूच राहील, असे वडेट्टीवार म्हणाले. यावेळी आमदार देवतळे, तिमांडे व महामंडळाचे उपाध्यक्ष कासावार यांचीही भाषणे झाली.
लालनाला प्रकल्प हा चिमूर, वरोरा व हिंगणघाट या तीन विधानसभा मतदारसंघांना एकत्र जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे, असे तिमांडे म्हणाले. यावेळी महामंडळाचे मुख्य अभियंता ना.भा. घुगे यांनी प्रश्नस्ताविकातून या प्रकल्पाबाबतची माहिती दिली. व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवी शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप गड्डमवार, राजू पाटील झाडे, गडचिरोलीच्या नगराध्यक्षा शोभा समर्थ, बाळा चापले, अधीक्षक अभियंता संजय खानापूरकर हजर होते.