Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

केळापूरच्या ‘जगदंबे’चा प्रसन्न कायापालट!
यवतमाळ, १३ जुलै / वार्ताहर

 

विदर्भ आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर असलेल्या तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केळापूर (पांढरकवडा)च्या जगदंबा संस्थानचा ‘काया’पालट वेगाने होत असून जगदंबा देवीच्या गाभाऱ्याचे आणि परिसराचे सुशोभिकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहे.
या कामामुळे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी मंदिरातच देवीचा फोटो ठेवण्यात आला असून मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत देवीची गाभाऱ्यातील मुख्य मूर्ती वस्त्रांनी झाकून ठेवण्यात आली आहे.
राजस्थान आणि गुजरातमधून आलेले २५-३० कलाकार कारागीर रात्रंदिन संगमरवरी दगडावर ‘हातोडा छन्नी’ चालवून आकर्षक मंदिर बनवत आहेत. मंदिर परिसरातील ओसाड आणि दगडधोंडय़ांनी पसरलेल्या परिसरात ‘हिरवे हिरवे गार गालीचे’ निर्माण करून भाविकांसाठी आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारे बगिचे निर्माण करण्यात येत असून पूर्वीच्या बगिच्यालाही ‘हिरवेगार’ करण्यात आले आहे. भाविकांसोबत लहान मुलांना खेळण्याचा आनंद घेता यावा, म्हणून एक ‘झुक झुक झुक झुक’ आगिनगाडी सुरू करण्यात आली आहे. बगिच्यातच ‘रेल्वेपूल’ तयार केला आहे. त्यावरून आगिनगाडी जाते, तेव्हा बाल प्रवाशांचा आनंद शब्दातीत असतो.
भक्तांची नवरात्र महोत्सवात अलोट गर्दी होते ही बाब लक्षात घेऊन अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव नीलेश पारवेकर यांच्या पुढाकाराने आणि आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नाने जगदंबा देवस्थान परिसरात ‘भक्त निवास’ बांधण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहोळाही थाटात पार पडला. उल्लेखनीय म्हणजे १९८०-८२ पर्यंत केळापूरचे हे प्रश्नचीन देवस्थान उपेक्षितच होते. वामन सिडाम यांनी देवस्थानचे ‘ट्रस्ट’ व्हावे म्हणून दीर्घ संघर्ष केला. तत्कालीन वनमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रयत्नाने देवस्थानचा कायापालट सुरू झाला. माजी आमदार अण्णासाहेब पारवेकरांपासून तर आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्यापर्यंतच्या सर्व नेत्यांनी ‘जगदंबा देवी’ला आपले दैवत मानले, शिवाजीराम मोघे यांनी तर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा ध्यासच घेतला आणि आज ‘जगदंबा संस्थान’चा सारा परिसर नयनरम्य झाला आहे.
संस्थानचे अध्यक्ष प्रेमराव वखरे, कोषाध्यक्ष वामन सिडाम, सचिव दीपक होले, शंकर बडे, सहसचिव काशिनाथ शिंदे तसेच अण्णासाहेब पारवेकर, दीपक कापर्तीवार, सूर्यभान पाटील या कार्यकारिणीने २५ ते ३० लाख रुपये खर्च करून राजस्थान, गुजरातचे कारागीर बोलावून मंदिरात देवीच्या गाभाऱ्याभोवती संगमरवरी दगडाचे नक्षीदार काम सुरू केले आहे. २०-२२ एकर परिसरात या संस्थानचा ‘पसारा’ पसरलेला आहे. देवीला औरंगाबादच्या नारायण नाम्बीयार या भक्ताने सोन्याचा किरीट (मुकुट) चढवला आहे. आता देवीचा सोन्याचा मुखवटा बनवण्याची संस्थानने योजना हाती घेतली आहे. त्यासाठी ३० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. भाविकांनी उदार हस्ते त्यासाठी अर्थसहाय्य करावे, असे संस्थानचे आवाहन आहे.