Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आरोग्य सेवेतील औषध निर्मात्यांचे धरणे
भंडारा, १३ जुलै / वार्ताहर

 

पाचव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील तफावत दूर करून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे औषध निर्मात्यांना वेतनश्रेणी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्य़ातील ५४ औषधनिर्मात्यांनी येथे धरणे धरले.
शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटनेच्या वतीने या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर धरणे देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
सहसंचालक (आरोग्य सेवा) यांच्या पत्रानुसार औषधीनिर्मात्यांना पाचव्या वेतन आयोगातील प्रश्नरंभिक वेतनश्रेणी ५५००-१७५-९००० रुपये लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सन २००९मध्ये हकीम यांच्या नेतृत्वाखाली स्थापन वेतन सुधारणा समितीने औषधी निर्मात्यांना पाचव्या वेतन आयोगातील ५५००-९००० रुपये वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता परंतु, सहाव्या वेतन आयोगात शासनाने औषधी निर्मात्यांना ९३००-३४,८०० रुपये ही वेतनश्रेणी न देता ५२००-२०,२०० ही वेतनश्रेणी देऊन अन्याय केला असल्याचे औषधी निर्मात्यांचे म्हणणे आहे. आरोग्यमंत्री, संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेत मंत्र्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देश दिले होते परंतु, अजूनपर्यंत मागण्यांवर गंभीरतेने विचार करण्यात आलेला नाही. परिणामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.
शासनाच्या या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय सेवेतील औषध निर्माते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी ५४ औषधनिर्माते हजर होते. यानंतर १५ जुलैपर्यंत मुंबई येथे एक दिवसाचे धरणे देण्यात येणार आहे. या आंदोलनात आर.के. फुलझेले, एम.एफ. रोकडे, एम.एच. धावडे, बी.डी. फुलसुंगे, ए.आर. डुंभरे, ए.आय. शेख, वाय.एस. पडोळे, जी.एस. इंगोले, आर.ए. बावनकुळे, एस.एस. तुरस्कर, बी.एम. शेंडे, गणेश भुयार सहभागी झाले होते.