Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

संग्रामपूर तालुक्यातील ५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता
बुलढाणा, १३ जुलै / प्रतिनिधी

 

संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा, सोनाळा, वानखेड, जस्तगाव, पिंप्री, आडगाव या पाच गावांमधील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासनाने कोटय़वधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे.
सुधारित अंदाजपत्रकानुसार भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ही मान्यता मिळाली आहे. जिल्हा परिषदेने पाणी गुणवत्ता बाधित कार्यक्रमांर्तगत अंदाजपत्रक राज्य समितीसमोर सादर केले होते. ते अंदाजपत्रक २००६-०७ नुसार असल्यामुळे आता या गावांचे सर्वेक्षण करून सुधारित अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. यात सोनाळा येथील योजनेस १ कोटी ४२ लाख ३४ हजार रुपये मंजूर झाले आहेत. पातुर्डा येथे १ कोटी १५ लाख २४ हजार, वानखेड ४५ लाख ४२ हजार, जस्तगाव २४ लाख ५४ हजार आणि पिंप्री अडगावसाठी २५ लाख ५८ हजार रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे. याबाबतचे शासनाचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना प्रश्नप्त झाले आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या आहे. काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होतो. सध्याच्या योजना कुचकामी ठरत आहेत. या गावांमध्ये पाणी योजनेसाठी जनभावना तीव्र झाल्या होत्या.सध्याच्या अपुऱ्या योजना व गावातील मागणी लक्षात घेता जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत या गावांना प्रश्नधान्याने योजना मिळण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून प्रयत्न केले होते.